दि. १० एप्रिल: भारतीय तटरक्षक दलाच्या समुद्र पहेरेदार या समुद्री प्रदूषण नियंत्रक जहाजाने ब्रुनेई येथील मुआरा या मंगळवारी बंदरला भेट दिली. आग्नेय आशियाई देशांबरोबर (आसियान) भारत संयुक्तपणे राबवीत असलेल्या सागरी प्रदूषण नियंत्रण मोहिमेचा भाग म्हणून ही भेट आयोजित करण्यात आली आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंग कंबोडिया येथे २०२२ मध्ये झालेल्या आसियानच्या संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेत या संयुक्त मोहिमेची घोषणा केली होती.
समुद्र पहरेदार ही सागरी प्रदूषण नियंत्रण नौका ब्रुनेई येथील मुआरा बंदरावर तीन दिवस राहणार आहे. या कालावधीत या नौकेवरील अधिकारी व कर्मचारी ब्रुनेइच्या सागरी सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांबरोबर विविध विषयांवर चर्चा, तसेच सागरी प्रदूषण नियंत्रण विषयक कार्यक्रम राबवणार आहेत. त्याचबरोबर सागरी शोध व बचाव कार्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक, सागरी नियमांची अंमलबजावणी, परस्पर देशांच्या जहाजांवर प्रशिक्षण, विषय तज्ञांची व्याख्याने व क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. भारतीय तटरक्षक दलाची ब्रुनेइच्या तटरक्षक दलाबरोबर व नौदलाबरोबर सामरिक भागीदारी वाढवणे, हा या भेटीचा उद्देश आहे. त्याचबरोबर जहाजबांधणीच्या क्षेत्रातील भारताची क्षमता दर्शविण्यासाठी व आत्मनिर्भर भारत, ‘मेक इन इंडिया’च्या प्रसारासाठीही या भेटीचे आयोजन करण्यात आले आहे. या बोटीवर राष्ट्रीय छात्रसेनेतील छात्रही सहभागी झाले असून, सरकारच्या पुनीत सागर अभियानांतर्गत हे छात्र स्थानिक नागरिकांबरोबर किनारपट्टी स्वच्छता अभियान राबविणार आहेत.
समुद्र पहेरेदार या जहाजाची परदेशी बंदरांना भेट भारतीय तटरक्षक दलाची मित्रदेशांशी द्विपक्षीय संबंध व आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढविण्याची वचनबद्धता सिद्ध करणारी आहे. बृनेईला येण्याआधी या जहाजाने व्हिएतनाम व फिलिपिन्स या देशांनाही भेट दिली होती. आसियान देशांबरोबर सहकार्य वाढविण्याची भूमिकाच यातून स्पष्ट होते, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. आसियान भेटीतून सागरी प्रदूषण रोखणे व आंतरराष्ट्रीय सागरी सहकार्याच्या माध्यमातून सागरी सुरक्षा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची भारताची वचनबद्धता स्पष्ट होते. ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फोर ऑल इन द रीजन’ (सागर), ‘लूक ईस्ट’ धोरण व ‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्राबद्दल भारताच्या दृष्टीकोनाशी हे सुसंगत असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी