नौदलासाठी ११ गस्तीनौका बांधण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचा करार
दि. ०४ मे: नौदलासाठी देशांतर्गत तंत्रज्ञानाने निर्मित नव्या पिढीची पहिली किनारपट्टी गस्ती नौका बांधणीच्या कामाला शुक्रवारी गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे सुरुवात झाली. नौदलाच्या युद्धनौका उत्पादन आणि संपादन विभागाचे नियंत्रक व्हाइस ॲडमिरल बी. शिवकुमार आणि गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बी. के. उपाध्याय व वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
भारतीय नौदलासाठी नव्या पिढीच्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त अशा ११ किनारपट्टी गस्ती नौकांचे आरेखन आणि त्यांच्या बांधणीबाबत संरक्षण मंत्रालय, गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स यांच्यात २३ मार्च रोजी करार करण्यात आला होता. या ११ नौकांपैकी सात नौका गोवा शिपयार्ड, तर चार नौका गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स बांधणार आहे. या युद्धनौकानाचा उपयोग चाचेविरोधी कारवाई, किनारपट्टीची सुरक्षा आणि टेहेळणी, शोध आणि बचावकार्य, किनारपट्टीवरील महत्त्वाच्या गोष्टींचे रक्षण आदी कामांसाठी उपयोग होणार आहे.
जहाजबांधणीच्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी व सरकारच्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या धोरणाच्या अनुषंगाने या नोकंची बांधणी करण्यात येत आहे. या नौकांचा उपयोग भारताला नौदलाची युद्धक्षमता वाढविण्यासाठी आणि हिंदी महासागर क्षेत्रातील आपले सामरिक आणि आर्थिकहित जपण्यासाठी होणार आहे.
विनय चाटी
स्रोत: पीआयबी