दस्तलिक-२०२४: पाचवी आवृत्ती, १५ ते २८ एप्रिलदरम्यान आयोजन
दि. १२ एप्रिल: ‘दस्तलिक’ या भारत आणि उझबेकिस्तानच्या लष्करादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या द्विपक्षीय लष्करी सरावाला १५ एप्रिलपासून उझबेकिस्तानातील तेर्मेझ या जिल्ह्यात सुरुवात होणार आहे. उभय देशांदरम्यान लष्करी सरावाची ही पाचवी वेळ असून ‘दस्तलिक-२०२४’ असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे. या सरावाची सांगता २८ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती लष्कराच्या माहिती विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांनी (एडीजी-पीआय) दिली आहे. मध्य आशियातील देशांशी सामरिक सहकार्य वाढविण्याच्यादृष्टीने हा द्विपक्षीय लष्करी सराव महत्त्वाचा मानला जात आहे.
भारत आणि उझबेकिस्तान या दोन लोकशाही देशांत परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. या सरावात सहभागी होणाऱ्या दोन्ही देशाच्या सैन्य तुकड्या भविष्यात दोन्ही लष्करातील सहकार्य व लष्करी संवाद वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असे ‘एडीजी-पीआय’ ‘एक्स अकाऊंट’वर म्हटले आहे. या सरावादरम्यान दोन्ही देशांच्या सैन्यतुकड्यांना संयुक्तपणे लष्करी प्रशिक्षण दिले जाईल, तसेच दोन्ही तुकड्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या नियमानुसार उप-पारंपरिक प्रकारच्या युद्धाचाही अभ्यास करतील. या सरावात दोन्ही देशांचे प्रत्येकी ४५ सैनिक व अधिकारी सहभागी होणार आहेत, असेही ‘एडीजी-पीआय’ने म्हटले आहे.
भारताकडून या सरावात गढवाल रायफल्स रेजिमेंटची तुकडी सहभागी होणार आहे. भारत आणि उझबेकिस्तानदरम्यान २०१९ पासून या सरावाचे आयोजन करण्यात येते. उभय देशांदरम्यानच्या या सरावाची चौथी आवृत्ती उत्तराखंड येथील पिठोरागड येथे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात पार पडली होती.
विनय चाटी
स्रोत: ‘एडीजी-पीआय’