संरक्षण क्षेत्रातील भागीदारी अधिक मजबूत करण्यावर भर
दि. ०१: लष्करी क्षेत्रातील भागीदारी अधिक मजबूत करण्यासह लष्करी साहित्याच्या खरेदीसाठी एक विशेष यंत्रणा उभारण्याबाबत भारत आणि ओमानदरम्यान बुधवारी परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. लष्करी सहकार्याबाबत भारत आणि ओमानने स्थापन केलेल्या संयुक्त समितीच्या मस्कत येथे झालेल्या बैठकीत भारताचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने व ओमानचे संरक्षण सचिव मुहम्मद बिन नसीर बिन अली अल झाबी यांच्या उपस्थित या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. तसेच, उभय देशांदरम्यान सध्या अस्तित्वात असलेल्या संरक्षण संबंधांचा आढावा घेणे व उभय देशांचे सामरिक हित लक्षात घेवून परस्पर सहकार्याच्या अधिक संभावना शोधणे, यावरही या बैठकीत मतैक्य झाल्याचे या वेळी सांगण्यात आले.
संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्याच्या संभावना शोधण्यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. त्याचबरोबर पश्चिम आशियातील परिस्थितीबाबतही चर्चा करण्यात आली. लाल समुद्रात सोमाली चाचांकडून व्यापारी जहाजांवर हौती बंडखोरांकडून होत असलेले हल्ले व जहाजांचे अपहरण या बाबतही उभय देशांनी चिंता व्यक्त केली, असे या वेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. लष्करी सहकार्य, प्रशिक्षण, संयुक्त कवायती, लष्करी माहितीची देवाणघेवाण, महासागर विषयक माहिती, जहाजबांधणी, दुरुस्ती-देखभाल, या क्षेत्रातही दोन्ही देशाच्या लष्करांत परस्पर सहकार्य वृद्धींगत करण्याबाबतही दोन्ही बाजूंनी एकमत झाल्याचे या वेळी सांगण्यात आले. गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्या भारतभेटीत परस्पर लष्करी सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाली होती, त्याच मालिकेत पुढे जात या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
टीम भारतशक्ती