पिनाका रॉकेट संदर्भात EEL, MIL, BEL सोबत, ₹10,147 कोटींचे करार

0

संरक्षण मंत्रालयाने 6 फेब्रुवारीला, संरक्षण सचिव श्री राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत- इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेड, म्युनिशन इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्याशी, 10,147 कोटी रुपयांचा करार केला.

सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS), 29 जानेवारी रोजी अंतिम मंजुरी दिल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी, इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (EEL), मुनिशन इंडिया लिमिटेड (MIL), आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) या कंपन्यांसोबत, प्रगत रॉकेट आणि सॉफ्टवेअर अपग्रेडेशेनसाठी, 10 हजार 147 कोटी रुपयांच्या करारांवर स्वाक्षरी केली.

नागपूरस्थित कंपनी EEL आणि सरकारी कंपनी MIL अनुक्रमे, एरिया डेनिअल म्युनिशन (ADM) टाइप-1 (DPICM) आणि हाय एक्स्प्लोझिव्ह प्री-फ्रॅगमेंटेड (HEPF) Mk-1 (उन्नत) ही रॉकेट संरक्षण दलाला पुरवतील. दरम्यान, BEL SHAKTI कमांड आणि कंट्रोल सॉफ्टवेअर अपग्रेड करतील.

विशेष वारहेड्स असलेली ‘एडीएम टाइप-1 रॉकेट्स’, मोठ्या क्षेत्रांमध्ये उप-म्युनिशन्स तैनात करतात, जे प्रभावीपणे यांत्रिक दलं, वाहनं आणि कर्मचारी यांना लक्ष्य करतात आणि शत्रूंचा महत्त्वपूर्ण क्षेत्रांमधील प्रवेश रोखतात. तर, HEPF Mk-1 (Enhanced) रॉकेट, हे शत्रूच्या प्रदेशात खोल हल्ले करण्यासाठी विस्तारित श्रेणी आणि सुधारित अचूकतेसह अपग्रेड केले गेले आहे.

यामध्ये पिनाका क्षेपणास्त्र प्रणालीचाही समावेश आहे. पिनाका रॉकेट प्रणालीची ओळख, जगातील आघाडीच्या MLRS प्लॅटफॉर्मपैकी एक अशी आहे. हे क्षेपणास्त्र 45 किमीच्या रेंजसह उच्च-स्फोटक दारुगोळा आणि 37 किमीपर्यंत ADM दारूगोळा वितरीत करते. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) द्वारे विकसित केलेले, विस्तारित-श्रेणीतील ही मिसाईल 75 किमी पर्यंतचे लक्ष्य गाठू शकतात, भविष्यात ही श्रेणी 120 किमी आणि पुढे जाऊन 300 किमीपर्यंत वाढवण्याची संरक्षण दलाची योजना आहे.

नवी दिल्लीमध्ये संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत, या व्यवहाराबाबतच्या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. संरक्षण मंत्रालयाने त्यांच्या एका निवेदनात म्हटले आहे की, “एडीएम टाइप-1 (डीपीआयसीएम) आणि एचईपीएफ एमके-1 (ई) रॉकेटची खरेदी आर्टिलरी रॉकेट रेजिमेंटच्या आधुनिकीकरणात महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल. तसेच हे प्रगत ADM (DPICM) आणि HEPF दारुगोळा मिसाईल, अचूक आणि लांब पल्ल्याच्या हल्ल्यांना सक्षम करून भारतीय सैन्याच्या अग्निशक्तीला बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावतील.”

या उपक्रमामुळे, भरीव रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. विशेषत: भारताचे स्वदेशी संरक्षण मजबूत करताना, घटक उत्पादनात गुंतलेल्या MSME ला याचा अधिक फायदा होईल.

भारत त्याच्या संरक्षण निर्यात धोरणाअंतर्गत, पिनाका क्षेपणास्त्र प्रणालीला, ब्राह्मोस क्षेपणास्त्र आणि आकाश हवाई संरक्षण प्रणालीसह, जागतिक स्तरावर प्रोत्साहन देत आहे. आर्मेनियाने आधीच पिनाका आणि आकाश या दोन प्रणालींची खरेदी केली आहे आणि अनेक ASEAN, आफ्रिकन आणि युरोपीय देशांनीही या व्यवहारामध्ये स्वारस्य दाखवले आहे.

रवी शंकर


Spread the love
Previous articleBangladesh Joins Pakistan’s Naval Drill AMAN-25 Signals Shift In China’s IOR Strategy
Next articleपाकिस्तानी नौदल कवायती अमन – 25 मध्ये बांगलादेशचा सहभाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here