नौदलप्रमुखांची उपस्थिती: निवासी प्रकल्पाचेही उद्घाटन
दि. १० एप्रिल: नौदलाच्या कारवार येथील नौदलतळावरील नव्या धक्क्याचे (पायर) व गृहप्रकल्पाचे नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कारवार येथील सी-बर्ड या नौदलतळाच्या विस्तारीकरणाच्या २-ए या टप्प्यातील कामाचा हे दोन्ही प्रकल्प भाग आहेत.
नौदलप्रमुखांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला नवा नौदल धक्का ३५० मीटर लांब असून, तेथे किनारपट्टी गस्ती नौका उभी राहू शकते. त्याचबरोबर सर्वेक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या मोठ्या नौका, पाणसुरुंग शोधणाऱ्या नौका, पाणसुरुंगविरोधी नौकाही या नव्या पायर ३ येथे उभ्या राहू शकतात. त्याव्यतिरिक्त धक्क्यावर आलेल्या नौकांना वीजपुरवठा करणे, पिण्याचे पाणी पुरविणे, एअरकंडीशनिंगसाठी थंड पाण्याचा पुरवठा करणे, तीस टन वजनाची क्रेन व इतर सेवा पुरविण्याची तरतूदही येथे करण्यात आली आहे. त्याचबरोबर लेफ्टनंट कमांडर ते कॅप्टन दर्जाच्या विवाहित अधिकाऱ्यांसाठी व अविवाहित अधिकाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या नव्या निवासी प्रकल्पाचे उद्घाटनही नौदलप्रमुखांनी केले. विवाहित अधिकाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीत ८० सदनिका असून, अविवाहित अधिकाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या इमारतीत १४९ सदनिका आहेत. तसेच, नौदलातील मुलकी कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या टाईप-२ प्रकल्पातील सहा इमारतींचे उद्घाटनही नौदलप्रमुखांनी केले. या इमारतींमध्ये ३६० सदनिका आहेत.
कारवारयेथील सी-बर्ड या नौदलतळाच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरु आहे. या कामातील प्रकल्प २-ए अंतर्गत हे काम करण्यात आले आहे. या प्रकल्पात एकूण ३२ जहाजे व पाणबुड्या, २३ यार्ड क्राफ्ट्स, नौदलच्या वापरासाठी एक परिपूर्ण नौदल गोदी, जहाजे आणि विमानांच्या दुरुस्ती व देखभालीची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर या कारवार येथे सध्या नौदलाचे दहा हजार कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. त्यामुळे या भागातील औद्योगिक प्रगती व अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली आहे. नौदलाच्या हवाईतळामुळे उत्तर कर्नाटक व दक्षिण गोवा या भागात पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. या मुळे सात हजार प्रत्यक्ष व २० अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. आत्मनिर्भर भारत या उद्दिष्टाला अनुसरून या ठिकाणी ९० टक्के स्वदेशी वस्तू व तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
विनय चाटी
स्रोत:पीआयबी