भारताच्या पाणबुडीविरोधी युद्धक्षमतेत वाढ
दि. ०१ मे: संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) देशांतर्गत तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केलेल्या ‘सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टोर्पेडो’ (स्मार्ट) या पाणबुडीविरोधी यंत्रणेची ओडीशातील डॉ. एपीजे अब्दुल कलम बेटांवरून बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास यशस्वी चाचणी घेण्यात आली, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे. ‘स्मार्ट’ ही वजनाला अतिशय हलकी व क्षेपणास्त्राच्या मदतीने डागता येणारी पाणबुडीविरोधी पाणतीर यंत्रणा आहे. या यशस्वी चाचणीमुळे भारतीय नौदलाच्या पाणबुडीविरोधी युद्ध क्षमतेत वाढ होणार आहे.
‘स्मार्ट’ ही टोर्पेडो यंत्रणा एका सिलेंडरच्या आकाराच्या प्रक्षेपकाच्या मदतीने डागता येऊ शकते. या यंत्रणेत घनरूप इंधनावर आधारित व दोन टप्प्यांत प्रज्वलीत होणारी ‘प्रोपल्शन’ यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, इलेक्ट्रो- मेकॅनिकल प्रेरक यंत्रणा (ॲक्यूएटर सिस्टीम), अचूक नेव्हिगेशन प्रणाली ही याची वैशिष्ट्ये आहेत. ही यंत्रणा हलक्या पाणतीराला वाहून नेऊ शकते आणि पॅराशुटच्या मदतीने ती लक्ष्यावर टाकता येते. ही यंत्रणा जमिनीवर स्थिर प्रक्षेपकाच्या मदतीने प्रक्षेपित करता येऊ शकते.
‘स्मार्ट’च्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथसिंग, संरक्षण विभागाचे संशोधन व विकास सचिव आणि ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. समीर व्ही कामत यांनी ‘डीआरडीओ’ व इतर सहभागी उद्योगांचे अभिनंदन केले आहे. या चाचणीमुळे नौदलाच्या पाणबुडीविरोधी युद्धक्षमतेत वाढ होणार आहे, असेही राजनाथसिंग यांनी म्हटले आहे.
विनय चाटी