ग्रीसच्या लष्करी शिष्टमंडळाची शत्रुजित ब्रिगेडला भेट
दि. १० एप्रिल: लष्करीबाबतीत परस्पर सहकार्य करण्याबाबत भारत आणि ग्रीसच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी चर्चा करण्यात आली. ग्रीसचे लष्करप्रमुख जनरल दिमित्रीअस चौपीस हे सध्या ग्रीसच्या लष्करी शिष्टमंडळाबरोबर भारताच्या दौऱ्यावर आहेत.
ग्रीसच्या लष्करी शिष्टमंडळाचे सोमवारी भारताच्या दौऱ्यावर आगमन झाले. त्यावेळी जनरल दिमित्रीअस चौपीअस यांना लष्कराच्या साउथ ब्लॉक येथील मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर जनरल चौपीअस यांनी राष्ट्रीय युद्धस्मारकावर जाऊन वीर जवानांना पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली व तेथील संदेश पुस्तिकेत आपला संदेशही लिहिला. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ग्रीसचे पंतप्रधान क्यरीअकोस मिस्तोताकीस यांनी सपत्नीक भारताला भेट दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या चर्चेत त्यांनी संरक्षण, जहाजबांधणी व संज्ञापन या विषयांत भारताशी सहकार्य करण्याची इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार ग्रीसचे लष्करी शिष्टमंडळ भारताच्या भेटीवर आले आहे.
ग्रीसच्या शिष्टमंडळाने या वेळी आग्रा येथील शत्रुजित ब्रिगेडच्या मुख्यालयाला भेट दिली. ब्रिगेड मुख्यालयात त्यांना शत्रुजित ब्रिगेडची हवाई क्षमता व विविध मोहिमांना सज्ज राहण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती देण्यात आली. उभय देशांत संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने ही भेट आयोजित करण्यात आली होती, असे लष्कराच्या माहिती विभागाच्या अतिरिक्त महासंचालकांच्या (एडीजी-पीआय) ‘फेसबुक अकाऊंट’वर म्हटले आहे.
विनय चाटी
स्रोत: ‘एडीजी-पीआय’