पुणे भेटीत घेतले तोफखाना युद्धाचे (आर्टिलरी) प्रशिक्षण
दि. २२ एप्रिल: भारतीय लष्कराच्या तोफखाना दलातील (कोअर ऑफ आर्टिलरी) ‘लॉंग गनरी स्टाफ कोर्स-फिल्ड २०२६’ च्या ५२ प्रशिक्षणार्थी गोलंदाजांनी (गनर्स) पुण्यातील ‘अग्निबाज डिव्हिजन’ला भेट देऊन अत्याधुनिक तोफखाना युद्धाबाबत प्रशिक्षण घेतले, लष्कराच्या दक्षिण विभाग मुख्यालयाच्यावतीने ‘एक्स’ या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.
‘लॉंग गनरी स्टाफ कोर्स’ हा भारतीय लष्कराच्या तोफखाना दलातील जवान व कर्मचाऱ्यांसाठी (ऑफिसर्स अँड परसोनल बिलो ऑफिसर रँक) चालविण्यात येणारा अतिशय महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाद्वारे या प्रशिक्षणार्थींना तोफखाना युद्धातील बारकावे, आधुनिक युद्धातील तोफखान्याचे महत्त्व या बरोबरच युद्धप्रसंगी आवश्यक असलेली ‘क्लोज सपोर्ट’ क्षमता, तोफगोळ्यांची हाताळणी, तोफांचा अचूक मारा व हवाई सुरक्षा यंत्रणा यांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणामुळे त्यांच्या क्षमतांमध्ये वाढ होते व तोफखाना दलातील विविध तांत्रिक व प्रशिक्षण विषयक जबाबदाऱ्या घेण्यासाठी ते सिद्ध होतात, असे संकेतस्थळावर दिलेल्या माहितीत म्हटले आहे.
‘अग्निबाज डिव्हिजन’ला दिलेल्या भेटीत या प्रशिक्षणार्थी गोलंदाजांना तोफखाना युद्धात होत असलेले बदल आणि प्रत्यक्ष युद्धात त्याचा वापर करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. ‘अग्निबाज डिव्हिजन’चे प्रमुख मेजर जनरल एपीएस चहल यांनी या प्रशिक्षणार्थी गोलंदाजांचे व त्याच्या प्रशिक्षकांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
विनय चाटी