दि. ०३ मार्च : भारत-प्रशांत महासागर क्षेत्रातील (इंडो-पॅसिफिक) नाविक व समुद्री सुरक्षा बळकट करण्यासाठी व या क्षेत्राच्या आर्थिक उन्नतीसाठी फिलिपिन्स, भारत आणि जपान यांनी त्रिपक्षीय सहकार्य करण्याचे ठरविले आहे. या त्रिपक्षीय सहकार्यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात व्यापार पर्यटन आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
फिलिपिन्स, भारत आणि जपान यांचे हे प्रस्तावित त्रिपक्षीय सहकार्य ‘मुक्त व खुले भारत-प्रशांत महासागर क्षेत्र,’ या जपानच्या धोरणाला अनुसरून केले जात आहे. या सहकार्यामुळे भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात चीनचा वाढता वावर आणि दादागिरीला आळा बसून त्यांच्या वाढत्या प्रभावालाही वेसण बसेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. परस्पर सहकार्य वाढविणे, पुरवठा साखळी सुरळीत करणे व वातावरणातील बदलाला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करणे, हे या सहकार्यामागचे उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. पर्यावरण पूरक आर्थिक विकास, क्षेत्रीय आर्थिक सहकार्य, पर्यावरणाचा शाश्वत विकास यासाठी तांत्रिक व बौद्धिक सहकार्य करणे तसेच परस्परांच्या आर्थिक विकासासाठी भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात पूरक वातावरण तयार करणे, या उद्देशाने हे सहकार्य करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
भारत-प्रशांत महासागर क्षेत्राच्या विकासासाठी परस्पर संपर्काच्या पायाभूत सुविधांचा विकास करणे गरजेचे आहे. तसेच, वाहतुकीच्या संसाधनांचा विकासही कळीचा आहे. या सहकार्यामुळे या विकासाच्या वेगाला चालना मिळेल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला. दक्षिण चीन समुद्रात सुरू असलेले क्षेत्रीय वाद आणि भारत-प्रशांत महासागर क्षेत्रातील चीन- अमेरिका संघर्ष पाहता या क्षेत्रातील सागरी-नाविक सुरक्षाही वाढविण्याची गरज आहे. या त्रिपक्षीय सहकार्याच्या माध्यमातून क्षेत्रीय सुरक्षेसाठी संयुक्त प्रयत्न करण्यासाठी प्राधान्य मिळेल. भारताने नुकतीच फिलिपिन्सला नौदलासाठी उपयुक्त ब्रह्मोस क्षेपणास्त्रे पुरवली आहेत. त्याचबरोबर भारताकडून फिलिपिन्सच्या नौदलाला प्रशिक्षणही दिले जात आहे. उभय देशातील नाविक सहकार्य या त्रिपक्षीय कराराच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे.
विनय चाटी
स्त्रोत: एएफआय