भारताचे पहिले सीडीएस दिवंगत बिपीन रावत हे 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झाले आणि त्यांच्या जागी जनरल मनोज नरवणे यांनी पदाची सूत्रे हाती घेतली. मनोज नरवणे हे पुण्याचे असून त्यांचे शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधिनीत झाले. त्यांनी पदभार स्वीकारला खरा, पण अल्पावधीतच त्यांना दोन मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. ‘भारतशक्ती मराठी’चे मुख्य संपादक नितीन गोखले यांनी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्याशी संवाद साधून या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आहे.
पहिले संकट म्हणजे कोरोना. 2020च्या प्रारंभी कोरोनाचा देशात शिरकाव होऊन त्याचा फैलाव झाला होता. पण भारतीय लष्कराने त्याआधीच काळजी घेण्यास सुरुवात केली होती. लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी ‘ऑपरेशन नमस्ते’ सुरू केले होते. त्यावेळी हस्तांदोलन न करता केवळ नमस्कार केला जात असे. शिवाय सैनिकांच्या फिटनेसवर भर देण्यात आला होता. त्यात भारतीय लष्कर यशस्वीही झाले. त्यामुळेच भारतीय सीमेवर तैनात असलेले जवान कोरोना बाधेपासून सुरक्षित राहिले, असे लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच मे 2020 लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनने आगळीक केली. भारत आणि चीनमध्ये अनेक करार झाले असून, त्यात एकमेकांवर बंधने घालण्यात आली आहेत. पण चीनने बेधडकपणे त्यांचे उल्लंघन केले. त्यांच्या प्रत्येक हालचालीची भारताला माहिती होती. त्यामुळे भारतीय जवानांनीही त्याला लगेच सडेतोड उत्तर दिले. चीनसाठी हे अनपेक्षित होते, असे लष्करप्रमुख नरवणे यांनी सांगितले. भारताने अजूनही चीनसमवेत चर्चेची भूमिका सोडलेली नाही. चर्चेतूनच तोडगा निघू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मराठी तरुण-तरुणींनी सैन्यात भरती व्हायला हवे, पण आवड असली तरच लष्करात यायला हवे. नाही तर, नंतर जड जाते. सुरुवातीला सर्व ठीक वाटते, पण नंतर जशी वर्षं पुढे सरकत जातात, तेव्हा का आलो असे वाटू शकते. पण आवड असेल तर, नक्की यावे. कारण याच्यासारखी दुसरी कोणतीही उत्तम सेवा नाही, असे नरवणे म्हणाले.
सविस्तर मुलाखत पाहा –
Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.