आण्विक सामग्री असल्याचा पाकिस्तानकडून इन्कार
भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरात रोखलेले जहाज मालवाहतूक करणारे असून, त्यात आण्विक सामग्री नाही, असा दावा पाकिस्तानने केला आहे. भारताकडून याबाबत चुकीची माहिती पसरवली जात आहे, असेही पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
चीनकडून पाकिस्तानातील कराची बंदराकडे निघालेले ‘सीएमए सीजीएम अटीला’ हे जहाज २३ जानेवारी रोजी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मुंबईच्या न्हावा-शेवा बंदरात रोखले होते. सीमा शुल्क अधिकाऱ्यांना या जहाजाबाबत संशय आल्यामुळे त्यांनी सुरक्षा यंत्रणांना याची माहिती दिली. त्यानंतर संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पथकाने या जहाजातील सामानाची कसून तपासणी केली. त्यांना या सामानात ‘कम्प्युटर न्यूमेरिकल कंट्रोल मशीन’ (सीएनसी) असल्याचे निदर्शनास आले. या यंत्राचा उपयोग पाकिस्तानला त्यांचा आण्विक कार्यक्रम पुढे चालवण्यासाठी करता येऊ शकतो, असे ‘डीआरडीओ’च्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर हे जहाज न्हावा-शेवा बंदरात रोखून धरण्यात आले आहे. या जहाजाची कसून तपासणी केल्यानंतर काल, रविवारी या बाबतची माहिती जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पत्रक प्रसिद्ध करून या जहाजात आण्विक सामग्री असल्याचा इन्कार केला आहे. ‘हे जहाज मालवाहतूक करणारे एक व्यापारी जहाज असून, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची आण्विक सामग्री नाही. भारताकडून या बाबत हेतुपुरस्सर चुकीची माहिती दिली जात आहे,’ असा दावा या प्रसिद्धीपत्रकात करण्यात आला आहे.
पाकिस्तानातील वाहननिर्मिती (ऑटोमोबाइल) उद्योगासाठी सुटे भाग पुरवणाऱ्या कराचीतील एका कंपनीने हे ‘लेथ मशीन’ आयात केले आहे. या यंत्राचा सर्व तपशील पाहता ते केवळ औद्योगिक कारणासाठी आयात केलेले यंत्र आहे, हे स्पष्ट होते. ते खरेदी करण्यासाठी अतिशय पारदर्शी पद्धतीने बँकेद्वारे आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. व्यवहारची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत, असेही या पत्रकात म्हणण्यात आले आहे. याबाबत संबंधित कंपनी भारतीय यंत्रणांच्या संपर्कात असून, पुढील कारवाई करीत आहे. मात्र, भारताने केलेली जहाज रोखण्याची कारवाई ही चुकीची असून, आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग करणारी आहे, असा दावा पाकिस्तानने केला आहे.
‘काही देश जागतिक पोलीस असल्यासारखा व्यवहार करीत आहेत एका. खाजगी व्यावसायिक संस्थेने मागविलेले यंत्र जप्त करून भारताने अत्यंत चुकीची पावले उचलली आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याचे हे उल्लंघन आहे. मुक्त व खुल्या समुद्री व्यापाराला भारताकडून असलेला हा धोका आहे. अशा पद्धतीने भारत आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करू शकत नाही, अशा शब्दात पाकिस्तानने भारताच्या या कृत्याचा निषेध केला आहे.
विनय चाटी