भ्रष्टाचारावरही प्रहार: चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याचा इशारा
दि. ०९ मार्च: चिनी लष्कराच्या आभासी युद्धक्षमतेवर (फेक कॉम्बॅट कपॅबिलिटी) कारवाई गरजेची असल्याचे मत चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाचे (सेन्ट्रल मिलिटरी कमिशन-सीएमसी) द्वितीय उपाध्यक्ष जनरल हे वेई डॉंग यांनी व्यक्त केले आहे. चिनी लष्कराच्या (पीपल्स लिबरेशन आर्मी-पीएलए) प्रतिनिधीमंडळाबरोबर झालेल्या चर्चेत त्यांनी हा इशारा दिला.
सध्या बीजिंग येथे सुरु असलेल्या ‘नॅशनल पीपल्स कॉंग्रेस’ (एनपीसी) व ‘चायनीज पीपल्स पॉलिटिकल कन्सल्टेटिव्ह कॉन्फरन्स’ (सीपीपीसीसी) या चीनच्या दोन महत्त्वाच्या कायदेमंडळांच्या संयुक्त अधिवेशनप्रसंगी ‘टू सेशन्स’ ‘पीएलए’च्या प्रतिनिधीमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी प्रतिनिधीमंडळाशी झालेल्या चर्चेत जनरल वेई डॉंग यांनी ‘पीएलए’च्या आभासी युद्धक्षमतेबद्दल चिंता व्यक्त करीत त्याच्यावर कारवाई करणे गरजेचे असल्याचे सांगितले. लष्करातील भ्रष्टाचारही कळीचा मुद्दा असून त्याची गय करण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, वेई डॉंग यांचा रोख युद्धक्षमतेकडे नसून, लष्करासाठी दुय्यम दर्जाची शस्त्रखरेदी व त्यात झालेल्या गैरव्यवहारांकडे आहे, असे मत चीनमधील काही जाणकारांनी व्यक्त केले.
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळात चिनी कम्युनिस्ट पक्ष व लष्करातील संबंध ताणले गेल्याचे चित्र दिसत आहे. प्रथम चिनी रॉकेट फोर्सच्या प्रमुखांची हकालपट्टी व त्यांची आत्महत्या, त्यानंतर संरक्षणमंत्री ली शांगफु यांची हकालपट्टी, वरिष्ठ अधिकाऱ्यांत झालेले बदल व ते करताना ‘पीएलए’मधील भ्रष्टाचाराची करणे देणे, या मुळे हे संबंध बिघडल्याचे म्हटले जाते. जिनपिंग यांनी त्यानंतर आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची ‘पीएलए’तील वरिष्ठ पदांवर वर्णी लावली होती. त्यामुळे वेई डॉंग यांचे ताजे वक्तव्य जिनपिंग विरोधी गटाला दिलेला इशाराही मानला जात आहे.
सिंगापूर येथील ‘नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी’च्या ‘एस. राजरत्न स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’मधील संशोधक जेम्स चार यांनीही शस्त्रखरेदीतील गैरव्यवहारांकडेच वेई डॉंग यांचा रोख असल्याचे मत व्यक्त केले. ‘या गैरव्यवहारामुळे लष्कराच्या हातात दुय्यम दर्जाची शस्त्रे आली आहेत. त्याचा परिणाम लष्कराच्या प्रत्यक्ष रणभूमीवरील कारवाई करण्याच्या क्षमतेवर होण्याची शक्यता आहे,’ असे मत चार यांनी व्यक्त केले. ‘शस्त्रे आणि इतर सामग्री तांत्रिकदृष्ट्या उत्तमच असली पाहिजे. बनावट किंवा कमी दर्जाचे शस्त्र नक्कीच ‘पीएलए’च्या कार्यक्षमतेवर व युद्धक्षमतेवर परिणाम करील,’ असे ‘पीएलए’तील निवृत्त तज्ज्ञ फु क्वीआनशाओ यांनी स्पष्ट केले.
विनय चाटी