नौदल मुख्यालयात स्विकारली पदाची सूत्रे
दि. ०१ मे : भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी बुधवारी सूत्रे स्विकारली. ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन’ युद्धातील तज्ज्ञ मानले जाणाऱ्या व्हाइस ॲडमिरल स्वामीनाथन यांना एक जुलै रोजी नौदलात ‘कमिशन’ मिळाले होते. आपल्या पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांना नौदल मुख्यालयात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर स्वामिनाथन यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन वीर जवान व अधिकाऱ्यांना आदरांजली अर्पण केली. ॲडमिरल डी. के. त्रिपाठी यांची नौदलप्रमुखपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी ॲडमिरल स्वामिनाथन यांची नेमणूक झाली आहे.
ॲडमिरल स्वामिनाथन खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून, त्यांनी इंग्लंडमधील ‘जॉईंट सर्विसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज,’ ‘कॉलेज ऑफ नेवल वॉरफेअर,’ करंजा व अमेरिकेतील ‘नेव्हल वॉर कॉलेज’मधून अत्याधुनिक प्रशिक्षण घेतले आहे. त्यांनी ‘आयएनएस विनाश’ व आयएनएस विद्युत’ ही क्षेपणास्त्रवाहू जहाजे, ‘आयएनएस कुलिश’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका, ‘आयएनएस म्हैसूर’ ही विनाशिका व ‘आयएनएस विक्रमादित्य’ या विमानवाहू नौकेचे प्रमुख म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पडल्या आहेत. रिअर ॲडमिरल म्हणून नौदलाच्या कोची येथील दक्षिण विभाग मुख्यालयात त्याच्याकडे चिफ ऑफ स्टाफ (प्रशिक्षण) ही जबाबदारी होती. नौदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांच्याकडे नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयाचे चिफ ऑफ स्टाफ म्हणून जबादारी होती. नौदलातील उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना अति विशिष्ट सेवा पदक व विशिष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
विनय चाटी