दि. ०३ मार्च : सोशल मीडियाच्या अनावश्यक प्रभावात देशातील बहुसंख्य तरुण अडकले असून, त्यांच्याकडून पाकिस्तानच्या सांस्कृतिक आणि राजकीय परिस्थितीबाबत विपरीत टिप्पणी केली जात आहे. त्यामुळे जागतिक मंचावर पाकिस्तानची बेअब्रू होत आहे. हे टाळण्यासाठी व तरुण पिढीला या प्रभावातून बाहेर काढण्यासाठी देशात सोशल मीडियावर कायमस्वरूपी बंदी घालावी असा प्रस्ताव पाकिस्तान पीपल्स पार्टीचे निष्कासित सदस्य बहरामंद खान तांगी यांनी पाकिस्तानी सिनेटसमोर ठेवला आहे. त्यांच्या या प्रस्तावावर उद्या, सोमवारी सभागृहात चर्चा होणार आहे, अशी माहिती डॉन या पाकिस्तानातील वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
पाकिस्तानी तरुण ‘एक्स’ (ट्विटर), टिक टॉक, फेसबुक, युट्युब,इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या चक्रात अडकले आहेत. या सोशल मीडियाचा वापर करून त्यांच्याकडून देशाच्या संस्कृती, धर्म, राजकीय व्यवस्था, लष्कर अशा सर्वच बाबींवर टीका केली जाते ब या सर्व संस्थांची बदनामी केली जाते. अशा बदनामीकारक मजकुरामुळे देशाच्या सार्वभौमत्त्वाला धक्का बसतो, त्यामुळे हे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तातडीने आणि कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, असा प्रस्ताव तांगी यांनी मांडला आहे. तांगी हे मूळ पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सदस्य आहेत, मात्र त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना पक्षाने अद्याप सदस्यत्व सोडण्यास सांगितले नसल्यामुळे ते सिनेट सदस्य म्हणून अजूनही कार्यरत आहेत.
पाकिस्तानातील तरुण पिढी सोशल मीडियाचा वापर करून देशातील राजकीय, सामाजिक स्थितीवर भाष्य करीत आहे. लष्कराकडून राजकीय व्यवस्थेत सातत्याने करण्यात येत असलेल्या हस्तक्षेपाबद्दलही तरुणांनी नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानात नुकतीच झालेली ‘नॅशनल असेंब्ली’ची निवडणुकही लष्कराच्या हस्तक्षेपाच्या आरोपांमुळे शंकास्पद ठरली आहे. पाकिस्तानात सध्या सरकारने ‘एक्स’वर बंदी घातली आहे. मात्र, तरीही ‘व्हीपीएन’च्या माध्यमातून ते वापरले जात आहे. त्यामुळे इंटरनेटच्या ओपन एक्सेसवर बंदी घालून ते खंडित स्वरूपात सुरू ठेवण्याचा विचार पाकिस्तानचे सरकार करीत आहे.
पाकिस्तानातील निवडून न आलेले कठपुतली सरकार सोशल मीडियावरील बंदी उठविण्यास तयार नाही. त्यांना नागरिकांची मुस्कटदाबी करायची आहे. त्यामुळेच इंटरनेटवर नियंत्रण आणण्याचा विचार केला जात आहे. निवडणूक होऊन दोन आठवडे उलटून गेल्यानंतरही इंटरनेटवरील बंदी उठविण्यात येत नाही, असा आरोप पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केला आहे. एकीकडे नागरिकांना इंटरनेट बंदी असतान सरकारी अधिकाऱ्यांची ‘सोशल मीडिया अकाऊंट’ मात्र व्यवस्थित सुरु आहेत, हा भेदभाव का केला जात आहे, असा सवालही त्याने केला आहे.
विनय चाटी