तरुणांमधील नावीन्यपूर्ण निर्मितीला प्रोत्साहन देण्याबरोबरच स्वदेशीकरणाला चालना देण्याच्या दृष्टीने भारतीय नौदलाने बुधवारी (23 मार्च 2022) BharatShakti.in आणि सोसायटी फॉर इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स (SIDM) यांच्याशी ज्ञान भागीदारीसंदर्भात करार केला.
राजधानी दिल्लीत नेव्हल इनोव्हेशन अॅण्ड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशनची (NIIO) शिखर संस्था असलेल्या नेव्हल टेक्नॉलॉजी एक्सलरेशन काऊंसिलच्या (NTAC) दुसऱ्या बैठकीत व्हाइस चीफ ऑफ नेव्हल स्टाफ (VCNS) व्हाइस अॅडमिरल एस. एन. घोरमडे, BhartatShakti.inचे संस्थापक आणि मुख्य संपादक नितीन अ. गोखले तसेच SIDMचे महासंचालक सुनील मिश्रा यांच्यादरम्यान हा करार झाला. या भागीदारी करारामुळे आगामी लढाऊ तंत्रज्ञानातील नावीन्यपूर्णता आणि संशोधनाला चालना मिळून भारतीय नौदलाला आणखी बळकटी मिळू शकेल. प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील तरुणाईसाठी ‘इंडियन नेव्हल स्टुडंट्स टेक्निकल एंगेजमेन्ट प्रोग्रॅम’अंतर्गत (IN STEP) ‘ओपन चॅलेन्ज’चीही घोषणा करण्यात आली. BharatShakti.in आणि SIDM यांच्या सहकार्याने याचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्वदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याच्या ‘भारतशक्ती’च्या भूमिकेचे व्हाइस अॅडमिरल एस. एन. घोरमडे यांनी कौतुक केले. भारतीय नौदल ही केवळ तंत्रज्ञान केंद्रीत नाही तर, तंत्रज्ञानभिमुख सेना आहे. म्हणूनच शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून त्यात नावीन्यता आणता येईल, पूर्णपणे उद्योगांवर भार टाकावा लागणार नाही, असे ते म्हणाले.
BharatShaktiच्या सहकार्याने भारतीय नौदलातर्फे वेळोवेळी ‘इंडियन नेव्हल स्टुडंट्स टेक्निकल एंगेजमेन्ट प्रोग्रॅम’अंतर्गत (IN STEP) ‘ओपन चॅलेन्ज’ स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरून अत्याधुनिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देऊन भविष्यातील आव्हानांना तोंड देण्याच्या दृष्टीने नौदलाला आणखी सक्षम बनवता येऊ शकेल. IN STEPचा एक भाग म्हणून आयोजित केल्या जाणाऱ्या ओपन चॅलेन्ज स्पर्धेची माहिती प्रसिद्धी माध्यमांमार्फत सर्वांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी BharatShakti.inकडे असेल. नौदलातील समस्यांच्या दृष्टीने कार्य करण्यासाठी प्रमुख शैक्षणिक संस्थांमधील तरुणाईला IN STEPकडून पाच महिन्यांची ऑनलाइन इंटर्नशिप देण्यात येणार आहे. शिवाय, स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भरता केंद्र (CISR) स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे.
डायरेक्टोरेट ऑफ इंडिजनायझेशनचे काम जोरात सुरू असून स्वदेशीकरणात भारतीय नौदल आघाडीवर आहे. याशिवाय, नावीन्यपूर्णतेवर भर देण्यासाठी NIIOअंतर्गत टेक्नॉलॉजी डेव्हलपमेन्ट अक्सलरेशन सेल (TDAC) स्थापन करण्यात आला आहे. NTACमध्ये अक्सलरेशन हा शब्द मुद्दामहून वापरण्यात आला आहे, जेणेकरून उद्या येणारच नाही, अशा रीतीने नौदल काम करेल, असे नौदलाच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
संरक्षणमंत्र्यांकडून 13 ऑगस्ट 2020 रोजी NIIOला प्रारंभ झाल्यापासून प्रत्येक महिन्याला सरासरी दोनहून अधिक आयपीआर अर्ज नौदल कर्मचाऱ्यांकडून सादर केले जात आहेत. केवळ लष्करासाठी तसेच दुहेरी वापरासाठी पेटंट अर्ज सादर करण्यात आले आहेत. राष्ट्रीय संशोधन आणि विकास महामंडळ (NRDC) तसेच राष्ट्रीय रक्षा विद्यापीठ, गुजरात यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी दुहेरी-वापरासाठीची अनेक उत्पादने एमएसएमईंकडे यापूर्वीच सोपविण्यात आली आहेत, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली.
नौदलाअंतर्गत नावीन्यपूर्णतेला आकार देण्याबरोबरच टीडीएसी शैक्षणिक संस्था तसेच उद्योगांशीही संपर्क साधून आहे. सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सच्या (SIDM) समन्वयाने दर महिन्याला उद्योगांशी ऑनलाइन संवाद देखील साधण्यात येतो. तंत्रज्ञानावर भर देणाऱ्या स्टार्टअप्सना ‘इनोव्हेशन इंडस्ट्री पार्टनर्स’ म्हणून ओळखले जाते आणि त्यांना नौदलाच्या गरजा चांगल्या प्रकारे समजून घेऊन तसा पुरवठा केला जातो.
(अनुवाद : मनोज जोशी)