हवाईदल प्रमुखांची ‘सी-डॉट’ला भेट

0
हवाईदलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी बुधवारी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स’च्या (सी-डॉट) नवी दिल्ली येथील मुख्यालयाला भेट दिली. छायाचित्र: पीआयबी

भविष्यदर्शी तंत्रज्ञान विकासासाठी सहकार्याचे सुतोवाच

दि. २७ मार्च: हवाईदलाचे प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी बुधवारी ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स’च्या  (सी-डॉट) नवी दिल्ली येथील मुख्यालयाला भेट दिली. ‘सी-डॉट’ ही भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाची एक महत्त्वाची संशोधन व विकास संस्था आहे. या संस्थेच्यावतीने दूरसंचार साधनांच्या सुरक्षित वापरासाठीचे तंत्रज्ञान देशांतर्गत विकसित करण्यासाठी काम केले जाते. तसेच, सायबर सिक्युरिटी व संरक्षण दलांसाठी आवश्यक संचार तंत्रज्ञान निर्मितीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रातही ‘सी-डॉट’ कार्यरत आहे.

‘सी-डॉट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार उपाध्याय यांनी संस्थेच्या संशोधन व विकास प्रक्रियेतील योगदानाचे सादरीकरण या वेळी हवाईदल प्रमुखांसमोर केले. या मध्ये सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (मालवेअर डिटेक्शन), संगणक सुरक्षेच्या विविध प्रणाली आदींचा समावेश होता. या सादरीकरणानंतर त्यांचे प्रात्यक्षिकही दर्शविण्यात आले. त्याचबरोबर त्याचा प्रत्यक्ष वापर कसा केला जातो, याचेही प्रात्यक्षिक हवाईदल प्रमुखांना या वेळी दाखविण्यात आले. एअर चिफ मार्शल चौधरी यांनी या वेळी ‘सी-डॉट’च्या शास्त्रज्ञ व तंत्रज्ञांशी चर्चा केली. भविष्यदर्शी अत्याधुनिक संचार तंत्रज्ञानाच्या संशोधन व विकासासाठी ‘सी-डॉट’ व हवाईदलाने एकत्र काम करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ‘हवाईदलाच्या गरजेनुसार अत्याधुनिक संचार साधनांचे संशोधन व विकास करण्यासाठी ‘सी-डॉट’ वचनबद्ध आहे,’ असे उपाध्याय यांनी या वेळी सांगितले.

 

विनय चाटी

स्रोत: पीआयबी  


Spread the love
Previous article‘आर्मी कमांडर्स कॉन्फरन्स’ गुरुवारपासून
Next articleArmy Commanders’ Conference: Top Brass To Review Security Situation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here