अकरा टक्के वाढ: वाढीचा वेग प्रथमच दुहेरी आकड्यांत
दि. ०१ एप्रिल: सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उत्पादन कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’च्या (एचएएल) महसुलात ३१ मार्चअखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत विक्रमी वाढ नोंदविण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीच्या एकूण वाढीचा वेगही ११ टक्के इतका नोंदविण्यात आला असून, कंपनीने प्रथमच दुहेरी आकड्यांत वाढ नोंदवल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीचा महसूल २६ हजार ९२८ कोटी इतका होता, यंदा तो २९ हजार ८१० कोटी इतका आहे. तर, गेल्या वर्षी कंपनीची एकूण वाढ नऊ टक्के नोंदविण्यात आली होती.
सध्याची जागतिक परिस्थिती व भूराजकीय आव्हानांचा विचार करता व त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत आलेल्या विस्कळीतपणाच्या पार्श्वभूमीवर यंदा ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षांत हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड’ने (एचएएल) प्रभावशाली कामगिरी करीत महसूलप्राप्तीचे उद्दिष्ट साध्य केले आहे. कंपनीकडे सध्या असलेली कामे व भविष्यात २०२४-२५ या आर्थिक वर्षांत येणाऱ्या कामाचा विचार करता कंपनीच्या आय-व्यय पत्रकात सध्या ९४ हजार कोटींची शिल्लक दिसत आहे, असे ‘एचएएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सी. बी. अनंतकृष्णन यांनी सांगितले. कंपनीकडे गेल्या, २०२३-२४ आर्थिक वर्षांत विमान उत्पादनाचे सुमारे १९ हजार कोटींचे प्रकल्प होते, तर दुरुस्ती-देखभालीची १६ हजार कोटींची होती, असे ‘एचएएल’च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या वर्षांत कंपनीने गयानाच्या संरक्षणदलाबरोबर दोन २२८ विमाने देण्याचा करार केला होता. कंपनीच्या पुढाकार घेऊन काम करण्याच्या धोरणामुळे करार झाल्यापासून एका महिन्यात ही विमाने गयानाला देण्यात आली, वेगात काम करण्याचा हा एक विक्रम आहे, असेही ‘एचएएल’ने म्हटले आहे.
कंपनीच्या एकूण कामगिरीत प्रभावी वाढ झाली असून, ही वाढ कायम राखण्यातही कंपनीला यश आले आहे. तेजस मार्क-१ए या विमानाची पहिली यशस्वी चाचणी हे यंदाचे महत्त्वाचे यश होते. या वर्षांत अनेक मान्यवरांनी कंपनीला भेट दिली. ग्राहकांना संतोष मिळेल अशी सेवा देता आली, नवीन करार करण्यात आले. त्यात एलसीए मार्क २ विमानासाठी जीई-४१४ या एरो इंजिनाच्या निर्मितीबाबत जनरल इलेक्ट्रिकल या कंपनीबरोबर झालेला करार महत्त्वाचा होता. हेलिकॉप्टर निर्मितीबाबत फ्रान्सच्या साफ्रान हेलिकॉप्टर इंजिन्स या कंपनीबरोबर करार झाला. एअरबसबरोबर करार करण्यात आला. येत्या काळात भारतीय संरक्षणदलांना आवश्यक बाबींच्या निर्मितीसाठी ‘एचएएल’कडून अधिक जोमाने प्रयत्न करण्यात येतील, असे ‘एचएएल’च्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
रविशंकर