बांगलादेशात 13 पोलिसांसह 91 ठार, अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू

0
बांगलादेशात
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आरक्षणविरोधी निदर्शक आणि सुरक्षा दलांमधील चकमकीत मरण पावलेल्या पीडिताचे नातेवाईक 4 ऑगस्ट 2024 रोजी ढाका, बांगलादेश येथील ढाका वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शोक व्यक्त करताना (रॉयटर्स)

बांगलादेशात पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या हजारो निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि रबरी गोळ्यांचा मारा केल्याने रविवारी झालेल्या संघर्षात किमान 91 लोक ठार आणि शेकडो जखमी झाले.

मृतांची संख्या, ज्यात किमान 13 पोलिसांचा समावेश आहे, ही बांगलादेशच्या अलीकडील इतिहासातील कोणत्याही निदर्शनांच्या तुलनेत एका दिवसात ठार झालेल्यांची सर्वाधिक संख्या होती. त्याआधी 19 जुलै रोजी 67जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली गेली होती. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले  आहेत.

सरकारने रविवारी संध्याकाळी 6 वाजता (1200 जीएमटी) अनिश्चित काळासाठी देशव्यापी संचारबंदी जाहीर केली. गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या या निदर्शनांदरम्यान पहिल्यांदाच असे पाऊल उचलले आहे. त्याशिवाय सोमवारपासून तीन दिवसांची सामान्य सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे.

अशांततेच्या या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवाही बंद करण्याचा  सरकारने निर्णय घेतला. मुख्य विरोधी पक्ष बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीने बहिष्कार घातलेल्या निवडणुकांमध्ये सलग चौथ्यांदा विजय मिळवल्यानंतर शेख हसीना यांची त्यांच्या 20 वर्षांच्या राजवटीतील ही सर्वात मोठी परीक्षा आहे.

सरकारने निदर्शकांवर अतिरेकी बळाचा वापर केल्याचा आरोप मानवाधिकार संघटनांसोबत हसीना यांच्या टीकाकारांनी केला आहे. हा आरोप हसीना आणि त्यांच्या मंत्र्यांनी फेटाळून लावला आहे. विद्यार्थी आंदोलकांनी सरकारने राजीनामा द्यावा यासाठी असहकार कार्यक्रम सुरू केला असून देशभरात हिंसाचार पसरल्याने निदर्शकांनी रविवारी मुख्य महामार्ग रोखून धरले.

लष्कर, नौदल, हवाई दल, पोलीस आणि इतर संस्था प्रमुखांच्या उपस्थितीत झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर हसीना म्हणाल्या, “जे हिंसाचार करत आहेत ते विद्यार्थी नाहीत तर देश अस्थिर करण्यासाठी बाहेर पडलेले दहशतवादी आहेत. “मी आपल्या देशवासियांना आवाहन करते की, या दहशतवाद्यांना बळकट हातांनी दडपून टाका.”

17 कोटी लोकसंख्या असलेल्या बांगलादेशात हिंसाचार उसळल्याने पोलीस ठाणी आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयांना लक्ष्य करण्यात आले.

सिराजगंजच्या वायव्य जिल्ह्यात तेरा पोलिसांना मारहाण करून ठार मारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय जिल्ह्यात इतर नऊ जणांचा मृत्यू झाला, तर दोन आमदारांच्या घरांना आग लावण्यात आली.

राजधानी ढाका येथे अनेक ठिकाणी झालेल्या भीषण चकमकीत दोन विद्यार्थी आणि सत्ताधारी पक्षाच्या नेत्यासह किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून डझनभर लोक जखमी झाले, असे पोलीस आणि प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत बांगलादेशला न जाण्याचे आवाहन केले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, मुन्सीगंज जिल्ह्यात निदर्शक, पोलीस आणि सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या  चकमकीत कामावर जात असताना दोन बांधकाम कामगारांचा मृत्यू झाला तर 30जण जखमी झाले.

जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक अबू हेना मोहम्मद जमाल यांनी सांगितले की,”गोळी लागलेल्या अवस्थेत त्यांना रुग्णालयात आणण्यात आले. मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला होता.”

पोलिसांनी मात्र आपण कोणत्याही प्रकारचा गोळीबार केला नसल्याचे स्पष्ट केले.

ईशान्येकडील पबना जिल्ह्यात निदर्शक आणि सत्ताधारी अवामी लीग पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या चकमकीत किमान तीन जणांचा मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

फेनी आणि लक्ष्मीपूरमध्ये प्रत्येकी आठ, नरसिंगडीमध्ये सहा, रंगपूरमध्ये पाच, मागुरामध्ये चार आणि उर्वरित इतर अनेक जिल्ह्यांमध्ये मृत्यूच्या घटनांची नोंद झाल्याचे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आंदोलनकर्त्यांच्या एका गटाने ढाका येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयाची तोडफोड केल्यानंतर आणि रुग्णवाहिकेसह वाहनांना आग लावल्यानंतर आरोग्यमंत्री सामंत लाल सेन म्हणाले की, रुग्णालयावरील हल्ल्याचे कोणतेही समर्थन करता येणार नाही.

ढाकाच्या बाहेरील आशुलियामध्ये किमान चार कपड्यांच्या कारखान्यांना आग लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

अलीकडे सुरू झालेल्या या निदर्शनांदरम्यान सरकारने दुसऱ्यांदा हाय-स्पीड इंटरनेट सेवा बंद केल्या, असे मोबाईल ऑपरेटरनी सांगितले. ब्रॉडबँड कनेक्शनद्वारेही फेसबुक आणि व्हॉटसअप ही सोशल माध्यमे उपलब्ध होत नव्हती.

रॉयटर्सने पाहिलेल्या गोपनीय सरकारी कागदपत्रांनुसार, बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी रविवारी देशातील दूरसंचार प्रदात्यांना 4 जी सेवा बंद करण्याचे निर्देश दिले, ज्यामुळे इंटरनेट सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली.

दूरसंचार कंपन्यांनी सरकारी आदेशांचे पालन केले नाही तर त्यांचे परवाने रद्द केले जातील, असे सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले.

गेल्या महिन्यात, सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी संघटनांनी केलेल्या हिंसाचारात किमान 150 लोक मारले गेले आणि हजारो जखमी झाले.

सर्वोच्च न्यायालयाने बहुतांश आरक्षणे रद्द केल्यानंतर ही निदर्शने थांबली, परंतु मारल्या गेलेल्या लोकांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी गेल्या आठवड्यापासून परत एकदा निदर्शनांना सुरूवात केली.

जहांगीरनगर विद्यापीठातील सरकार आणि राजकारण या विषयाचे सहयोगी प्राध्यापक शकील अहमद म्हणाले, “मला वाटते की जिन बाटलीतून बाहेर पडला आहे आणि हसीना कदाचित तो पुन्हा बाटलीत ठेवू शकणार नाहीत.”

कोणत्याही परिस्थितीत लोकांचे जीवन, मालमत्ता आणि महत्त्वाच्या सरकारी आस्थापनांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे निर्देश लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांनी शनिवारी आपल्या अधिकाऱ्यांना दिले. झमान सोमवारी माध्यमांना अधिक माहिती देतील, असे लष्करी प्रवक्त्याने सांगितले.

रामानंद सेनगुप्ता
(रॉयटर्स)


Spread the love
Previous articleट्रम्प – हॅरिस सप्टेंबरमध्ये आमनेसामने, फॉक्स न्यूजचा प्रस्ताव स्वीकारला
Next articleभारतीय हवाई दलाकडून 200 अस्र मार्क1 क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला मंजुरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here