26/11 आरोपी तहव्वुर राणाची प्रत्यार्पण टाळण्यासाठी नवीन याचिका

0
भारत
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान अमेरिकी प्रशासनाने मंजुरी दिल्यानंतर तहव्वुर राणाने त्याच्या भारत प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी केली. (प्रतिमा श्रेयः wikipedia.org)

अमेरिकी प्रशासनाने आरोपी तहव्वुर राणाच्या भारताकडील प्रत्यार्पणास मान्यता देऊन काही आठवडे उलटले असले तरी अजूनही ही प्रक्रिया रखडली असल्याचे माध्यमांच्या वृत्तात म्हटले आहे.

पाकिस्तानी वंशाच्या या व्यावसायिकाने आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेत, आरोग्याच्या गंभीर समस्या आणि भारतीय कोठडीत छळ होण्याच्या भीतीचे कारण देत आपल्या प्रत्यार्पणावर आपत्कालीन स्थगितीची मागणी केली आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, राणाने आपल्या याचिकेत भारताचे वर्णन ‘hornet’s nest” (अतिशय धोकादायक) असे केले असून दावा केला आहे की, त्याचे पाकिस्तानी नागरिकत्व, धार्मिक पार्श्वभूमी आणि पाकिस्तानी सैन्याशी असलेला पूर्वीचा संबंध यामुळे त्याचा भारतात छळ होण्याची शक्यता आहे.

धार्मिक अल्पसंख्याकांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबाबत ह्युमन राईट्स वॉचच्या अहवालाचा हवाला देत, भारत सरकार अधिकाधिक निरंकुश होत असल्याचा आरोपही त्याने केला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, त्याच्या याचिकेत विशेषतः नमूद केले आहे की “जर स्थगिती दिली गेली नाही, तर कोणताही फेरविचार होणार नाही आणि अमेरिकन न्यायालये आपली अधिकारक्षेत्र गमावतील आणि याचिकाकर्त्याचा लवकरच मृत्यू होईल.”

याचिकेत आरोग्याच्या गंभीर समस्यांचा उल्लेख

63 वर्षीय राणाने असा युक्तिवाद केला आहे की आपल्या प्रत्यार्पणामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होईल. याचिकेत त्याने आपल्या ग़भीर वैद्यकीय परिस्थितीचा उल्लेख केला आहे. त्यानुसार त्याला पोटाचा विकार असून सोबत पार्किन्सन आजार आणि मूत्राशयाचा कर्करोग होण्याचे संकेत मिळाले असल्याचे नमूद केले आहे.

राणाच्या विरोधात भारतातील खटले

पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा सहकारी म्हणून ओळख असलेल्या राणावर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात मदत केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला.

सरकारी साक्षीदार बनलेल्या हेडलीने अमेरिकेच्या न्यायालयात साक्ष दिली की राणाने त्याला 2007 ते 2008 दरम्यान मुंबईतील प्रमुख ठिकाणांची हेरगिरी करण्यास मदत केली.

2011 मध्ये अमेरिकेत राणाला ’26/11′  हल्ल्यांमध्ये थेट सहभाग असल्याच्या आरोपातून मुक्त करण्यात आले असले तरी, लष्कर-ए-तोयबाला आर्थिक पाठबळ देणे आणि डेन्मार्कमधील दहशतवादी कटाला मदत करणे याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले होते.

ट्रम्प यांची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले होते की त्यांच्या प्रशासनाने राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. ट्रम्प यांनी राणाला “जगातील अत्यंत दुष्ट लोकांपैकी एक” असे म्हटले होते.

“आम्ही एक अतिशय हिंसक माणूस (तहव्वुर राणा) ताबडतोब भारताला परत देत आहोत. पुढे जाण्यासाठी आणखी बरेच काही आहेत कारण आमच्याकडे बऱ्याच विनंत्या आहेत. आम्ही गुन्हेगारीवर भारतासोबत काम करतो आणि आम्हाला भारतासाठी अधिक चांगल्या गोष्टी करायच्या आहेत,” असे ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील सध्याची भागीदारी मान्य करताना म्हटले होते.

मात्र, अमेरिकन सरकारने राणाच्या शरणागतीसाठी कालमर्यादा निश्चित केलेली नाही.

भारत त्याच्या प्रत्यार्पणासाठी दबाव आणत आहे,  हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर चर्चा सुरू असल्याच्या वृत्ताला परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दुजोरा दिला आहे.

26/11 चा मुंबई हल्ला

26 नोव्हेंबर 2008 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ताजमहाल हॉटेलसह मुंबईतील अनेक ठिकाणांवर दहशतवादी हल्ले करण्यात आले, ज्यात 166 लोक ठार झाले. मृतांमध्ये 20 सुरक्षा कर्मचारी आणि 26 परदेशी नागरिकांचा समावेश होता.

अमेरिकेत कायदेशीर लढाई होऊनही, हल्ल्यांमध्ये राणाची भूमिका हा भारत आणि अमेरिका यांच्यातील वादाचा मुद्दा राहिला आहे. प्रत्यार्पण रोखण्याच्या त्याच्या ताज्या याचिकेमुळे त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न अजून काही काळ लांबले आहेत.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleChina Will Work For ‘Reunification’ With Taiwan
Next articleएस. जयशंकर यांच्यावरील हल्ल्याचा, UK परराष्ट्र कार्यालयाकडून तीव्र निषेध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here