मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मी शिवरायांच्या चरणांवर डोके ठेवून माफी मागतो,” अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. देशातील सर्वाधिक खोलीच्या म्हणजे 20.20 मीटर अशा वाढवण बंदराचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते 30 ऑगस्टला पालघर येथे करण्यात आले. त्यावेळी बोलताना मोदी यांनी जाहीर माफी मागत या प्रकरणातील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्राच्या भूमीवर येताक्षणीच मी आज सर्वप्रथम माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मस्तक झुकवून क्षमा मागितली. गेल्या काही दिवसात सिंधुदुर्गात जे झाले त्यासाठी मी त्यांची देखील क्षमा मागतो जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करतात. pic.twitter.com/mlhBdZDoPs
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2024
पंतप्रधानांनी सुमारे 1 हजार 560 कोटी रुपयांच्या 218 मत्स्यव्यवसाय प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीदेखील केली ज्याचा उद्देश देशभरातील या क्षेत्राच्या पायाभूत सुविधा आणि उत्पादकता वाढवणे हा आहे. या उपक्रमांमुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्रात पाच लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय मासेमारी बंदरे, मासे ठेवण्याची केंद्रे यांचा विकास, अद्यायावतीकरण आणि आधुनिकीकरण तसेच मासळी बाजारांचे बांधकाम यांसह महत्त्वाच्या मत्स्यव्यवसाय संबंधी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी देखील करण्यात आली.
वाढवण बंदर, भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असेल आणि आंतरराष्ट्रीय नौवहन मार्गांना थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करेल,वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी करेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज अशा या बंदरात डीप बर्थ, कार्यक्षम कार्गो हाताळणी सुविधा आणि आधुनिक बंदर व्यवस्थापन प्रणाली असतील. या बंदरामुळे रोजगाराच्या संधीत लक्षणीय वाढ होईल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल आणि प्रदेशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला मदत होईल अशी अपेक्षा आहे. वाढवण बंदर प्रकल्पामध्ये शाश्वत विकास पद्धतींचा समावेश करण्यात आला असून पर्यावरणीय प्रभाव कमी करणे आणि कठोर पर्यावरणीय मानकांचे पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. हे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर, भारताची सागरी कनेक्टिव्हिटी वाढेल आणि जागतिक व्यापार केंद्र म्हणून त्याचे स्थान आणखी मजबूत होईल.
याखेरीज पंतप्रधानांच्या हस्ते सुमारे 360 कोटी रुपये खर्चाच्या नॅशनल रोल आउट ऑफ व्हेसल कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टीमचा म्हणजेच जहाजांच्या दरम्यान संपर्क आणि मदत यंत्रणा उभारण्याचा प्रारंभ करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत देशातील 13 किनारपट्टीवरील राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश यांच्यात कार्यरत यांत्रिकी तसेच मोटर बसवलेल्या जहाजांवर टप्प्याटप्प्याने 1 लाख ट्रान्सपाँडर बसवण्यात येणार आहेत. व्हेसल कम्युनिकेशन अँड सपोर्ट सिस्टीम ही इस्रोद्वारे विकसित स्वदेशी तंत्रज्ञान प्रणाली असून मच्छिमारांना समुद्रात असताना दोन्ही बाजूंनी परस्परांशी संपर्क स्थापित करण्यात मदत करेल तसेच बचाव कार्यात मदत करून आपल्या मच्छिमारांची सुरक्षितता देखील सुनिश्चित करेल.
आराधना जोशी