युद्धग्रस्त रशियातील गव्हर्नरपदाच्या निवडणुका जिंकण्यासाठी अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे समर्थक सज्ज झाले आहे. युक्रेनमधील युद्धाचा या निकालावर फारसा मोठा फरक पडला आहे असे म्हणता येणार नाही.
यामध्ये कुर्स्कमधील मतमोजणीचाही समावेश आहे. युक्रेनियन सैन्याने या भागातील काही शहरे आणि प्रदेश यांच्यावर ताबा मिळवला आहे.
रशियातील तीन दिवसांच्या स्थानिक आणि प्रादेशिक निवडणूक प्रक्रिया रविवारी संध्याकाळी संपली.
मतदारांनी सर्व 21 गव्हर्नरपदाच्या शर्यतींमध्ये क्रेमलिन-समर्थित उमेदवार, तसेच 13 प्रदेशांतील विधानसभा सदस्य आणि देशभरातील नगरपरिषदेचे अधिकारी निवडणे अपेक्षित होते.
रशियामध्ये काटेकोरपणे नियंत्रित करण्यात आलेल्या या निवडणुकांच्या निकालांचा अर्थ पुतीन आणि युक्रेनमधील त्यांनी सुरू केलेले युद्ध यांच्यावर जनतेने दाखवलेला विश्वास असा लावला जात आहे. या युद्धाचे हे तिसरे वर्षे आहे.
यंदाच्या मार्चमध्ये झालेल्या निवडणुकीत पुतीन पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवडून आले. 71 वर्षीय पुतीन यांनी 87.97 टक्के मते मिळवून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली होती.
17 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आणि पुढील सहा वर्षांसाठी पुतीन पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदी कायम राहणार या अटकळीवर शिक्कामोर्तब झाले. गेल्या 200 वर्षांमध्ये सर्वाधिक काळ रशियाचे राष्ट्राध्यक्षपद भूषविणारे नेते म्हणून पुतीन यांचे नाव इतिहासात नोंदवले गेले आहे.
“चला प्रामाणिकपणे स्वीकारूया की युद्ध सुरू आहे. त्यात शत्रू राष्ट्राला पराभूत करूया,” असे रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव म्हणाले.
दिमित्री सध्या सत्ताधारी युनायटेड रशिया पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी रविवारी सांगितले की, “या काळात रशियाच्या नागरिकांचा, आपल्या सहकाऱ्यांनी विश्वास न गमावणे अत्यंत महत्वाचे आहे.”
सीमावर्ती कुर्स्क प्रदेशात, अर्ध्याहून अधिक मते मिळवून ॲक्टींग गव्हर्नर या शर्यतीत आघाडीवर आहेत. ऑगस्टमध्ये युक्रेनच्या सैन्याने या भागात जोरदार हल्ला सुरू केल्यामुळे रशियन फौजांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता.
रशियन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, मेपासून या प्रदेशाचे नेतृत्व करणाऱ्या अलेक्सी स्मिरनोव्ह यांना आतापर्यंत सुमारे 66 टक्के मते मिळाली आहेत.
रशियाच्या नैऋत्य भागातील लिपेट्स्क प्रदेशात – जो युक्रेनियन ड्रोन हल्ल्याचे वारंवार लक्ष्य बनत आहे – सध्याचे गव्हर्नर आणि युनायटेड रशियाचे उमेदवार इगोर आर्टामोनोव्ह यांना 80 टक्के मते मिळाली आहेत. या भागातील मतमोजणी जवळपास संपत आली आहे.
माजी क्रीडा मंत्री ओलेग मॅटिट्सिन, जे युनायटेड रशियाचे प्रतिनिधी आहेत, ते सीमावर्ती ब्रायन्स्क प्रदेशातील लोअर हाऊस स्टेट ड्यूमाच्या पोटनिवडणुकीत आघाडीवर आहेत. युक्रेनच्या हवाई हल्ल्यांमुळे हा भागही वारंवार प्रभावित होतो.
तृप्ती नाथ
(रॉयटर्स)