चिनी विमानवाहू नौकेच्या हालचालींवर आपले लक्ष असून चीनच्या लष्करी हालचालींचे आपण मूल्यांकन करत असल्याचे तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीन या आठवड्याच्या अखेरीस तैवानच्या आजूबाजूला नवीन युद्धसरावाला सुरूवात करू शकतो.
लोकशाही पद्धत असलेला तैवान हा आपला स्वतःचा प्रदेश असल्याचा दावा करणाऱ्या चीनने या वर्षी आतापर्यंत तैवान बेटाभोवती युद्ध सरावाच्या दोन फेऱ्यांचे आयोजित केले असून चिनी सैन्य जवळपास रोज कुरापती काढत या ठिकाणी आपण कार्यरत असल्याचे दाखवून देते.
तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते चीन विरोधक असल्याने चीन तीव्र स्वरूपात आपली नापसंती व्यक्त करते, त्यांना ते ‘फुटीरतावादी’ म्हणतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आठवड्यात लाई हवाई आणि गुआमच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याच्या निमित्ताने चीनकडून नवीन सरावाला सुरूवात होऊ शकते.
नियमित पत्रकार परिषदेत बोलताना तैवानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सन ली-फांग म्हणाले की, तैवानला चिनी विमानवाहू जहाज लिओनिंग कुठे आहे हे माहित होते, परंतु याबाबतचा अधिक तपशील त्यांनी दिला नाही. ऑक्टोबरमध्ये झालेल्या शेवटच्या चिनी युद्धसरावामध्ये लिओनिंगचा समावेश होता.
“राष्ट्रीय संरक्षण मंत्रालय शत्रूच्या या परिस्थितीकडे गांभीर्याने बघत असून हे प्रकरण अतिशय जबाबदारीने हाताळत आहे. आमचीही खूप ठोस तयारी असून आम्ही कोणत्याही धमक्यांना भीक घालत नाही,” असे ते म्हणाले.
शुक्रवारी उशिरा लाय तैवानला परत आल्याने चिनी युद्धसराव या आठवड्याच्या शेवटी सुरू होऊ शकतो का असे विचारले असता, सन यांनी थेट टिप्पणी करण्याचे नाकारले.
“आमच्याकडे शत्रूच्या परिस्थितीचा खूप सखोल अभ्यास आहे आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी आमच्याकडे असणाऱ्या विविध संकेतांचा आम्ही उपयोग करून घेत आहोत.”
चीनच्या संरक्षण मंत्रालयाने यावर कोणतीही तत्काळ प्रतिक्रिया दिलेली नाही. लाइ यांना भेट देण्याची परवानगी दिल्याबद्दल चीन सरकारने अमेरिकेबाबत आपला संताप व्यक्त केला आहे.
लाई यांनी कायमच चीनच्या सार्वभौमत्वाचे दावे नाकारले आहेत. मात्र आपल्याला बीजिंगबरोबर शांतता हवी आहे आणि आपण वारंवार चर्चेचा प्रस्ताव दिला आहे, परंतु त्याला नकार देण्यात आल्याचे लाई यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन नाव न सांगण्याच्या अटीवर तैपेईमधील तीन सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, ताज्या गुप्त माहितीच्या आधारे, या आठवड्याच्या शेवटी युद्धसराव सुरू होण्याची शक्यता अधिक आहे.
एका स्रोताने तैवानच्या सभोवतालच्या समुद्रात नेहमीपेक्षा “जास्त हालचाली” सुरू असल्याचे वर्णन केले आहे. कदाचित चीनच्या संभाव्य युद्ध सरावातील कवायतींमुळे असे झाले असावे.
तीन युद्धनौका आणि एका पुरवठा जहाजाचा समावेश असलेला उत्तरेकडे जाणारा रशियन नौदलाचा ताफा सोमवारी तैवानच्या आग्नेय किनाऱ्यापासून 24 सागरी मैल (45 कि. मी.) अंतरावर तैवानच्या संलग्न क्षेत्राजवळ पोहोचला आणि त्याने जवळच्या चिनी विध्वंसकासह “परदेशी जहाजे आणि विमानांवर” संयुक्तपणे नकली हल्ले केल्याचे सूत्रांनी सांगितले.
रशियन नौदलाच्या ताफ्याने मंगळवारी पहाटे पूर्व चिनी समुद्रात प्रवेश केला असून उत्तरेकडे जात असताना आपल्या चिनी समकक्षांसोबत संयुक्त लष्करी कवायती सुरू ठेवण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, चीनने या प्रदेशात सुमारे 40 जहाजे तैनात केली आहेत, ज्यात पूर्व चीन समुद्रात लिओनिंगच्या नेतृत्वाखालील चिनी विमानवाहू गट तसेच दक्षिण चीन समुद्रात इतर नौदल आणि तटरक्षक नौकांचा समावेश आहे.
लाई यांच्या पॅसिफिक दौऱ्याचा संदर्भ देत सूत्रांनी सांगितले की, “या भेटीनंतर चीन सरावासाठी कधीही तैनात होऊ शकतो असे एकूण निरीक्षणावरून दिसून आले आहे.
दुसऱ्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या कोणत्याही वेळी गरज भासल्यास तैवानवर हल्ला करण्यास सक्षम होण्यासाठी त्यांना ज्या प्रकारच्या सरावाची आवश्यकता असेल, त्या दृष्टीने चीनच्या सैन्यासाठी हिवाळ्यात केला जाणारा सराव हा असामान्य असेल.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)