मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यामध्ये नुकतीच एक भेट झाली. या भेटीच्या दोन आठवड्यांनंतर, Meta कंपनीकडून नवनिर्वाचित US President फंडासाठी $1 दशलक्ष डॉलर्सची (10 लाख) देणगी दिली असल्याचे वृत्त समोर आले आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने रॉयटर्सच्या ईमेलला दिलेल्या प्रतिसादात याविषयी नमूद केले आहे.
‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ (Wall Street Journal) या वृत्तसंस्थेने याविषयी सर्वप्रथम बातमी दिली होती. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ‘10 लाख डॉलर्सची ही देणगी Meta चे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि मेटा यांनी त्यांच्या नेहमीच्या सरावातून दिली आहे. म्हणजेच मेटाने याआधीही अशा प्रकारच्या देणग्या नवनिर्वाचीत अध्यक्षांना देऊ केल्या आहेत. अशा देणग्यांचा वापर नवनिर्वाचित अध्यक्ष पद स्विकारणाऱ्या त्या नेत्याच्या विविध कार्यक्रमांसाठी केला जातो. अमेरिकेमध्ये याकडे नवीन रुजू झालेल्या नेत्याची मर्जी राखण्याचा एक मार्ग म्हणून देखील पाहिले जाते.
झुकरबर्गने या वर्षीच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प किंवा जो बायडन यांच्यापैकी एकाला पाठिंबा देण्यास नकार दिला होता. बायडन हे डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून पायउतार होण्यापूर्वी झालेल्या एका मीडिया मुलाखतीदरम्यान, त्यांच्या जागी कमला हॅरिस यांची नियुक्ती झाली होती.
अमेरिकेत नोव्हेंबरच्या उत्तरार्धात झालेल्या निवडणुकांनंतर, मार्क झुकेरबर्गने ट्रम्प यांची भेट घेतली होती. न्यूयॉर्क टाईम्सच्या म्हणण्यानुसार, Meta च्या बॉसने डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशातून केलेला हा एक सफल प्रयत्न होता. या भेटीनंतर काही आठवड्यातच, Meta कंपनीने Donald Trump यांच्या निधी फंडासाठी १० लाख डॉलर्सची रक्कम देऊ केली. यामुळे झुकरबर्ग आणि ट्रम्प यांच्यातील व्यावसायिक संबंध भविष्यात अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे विश्लेषणकर्त्यांचे म्हणणे आहे.
2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर ट्रम्प आणि झुकेरबर्गच्या Meta शी निगडीत व्यवहाराचे संबंध ताणले गेले होते. 2020 च्या निवडणुकीत जो बायडन यांना दुखावणारा किंवा त्यांची प्रतिमा मलिन करणारा कॉन्टेन्ट दडपल्याचा आरोप Meta वर केला गेला होता. तसेच निवडणूक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी झुकरबर्गने देऊ केलेल्या देणग्यांवरही टीका करण्यात आली होती.
जानेवारी २०२१ च्या कॅपिटल दंगलीनंतर, मेटाने ट्रम्पची फेसबुक आणि इंस्टाग्राम खाती सुमारे दोन वर्षांसाठी निलंबित केली होती. या वर्षाच्या सुरुवातीला, ट्रम्प यांनी त्यावेळेच्या फेसबुकला “Enemy of the people” असे संबोधले होते आणि ‘TikTok ला त्याच्या मूळ फर्म ByteDance द्वारे विकल्याशिवाय त्यावर बंदी घातली जावी असा कायदा आणण्याची मागणी करण्यामध्ये Facebook चा स्वार्थ आणि आर्थिक फायदा आहे’ असा आरोपही केला होता.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)
अनुवाद- वेद बर्वे