रशियाच्या बर्फाच्छादित पश्चिमेकडील कुर्स्क भागात या आठवड्यात झालेल्या लढाईनंतर ठार झालेल्या डझनभराहून अधिक उत्तर कोरियाच्या शत्रू सैनिकांचे मृतदेह युक्रेनच्या विशेष सैन्याने शोधून काढले. त्यात एक सैनिक अजूनही जिवंत असल्याचे त्यांना आढळले. मात्र युक्रेनी सैनिक जवळ येताच त्याने ग्रेनेडचा स्फोट करून स्वतःला उडवून दिल्याचे युक्रेनच्या स्पेशल ऑपरेशन्स फोर्सने सोशल मिडियावर सोमवारी पोस्ट केलेल्या वर्णनात म्हटले आहे.
या स्फोटातून युक्रेनचे सैनिक बचावले असल्याचा खुलासा सैन्याने केला आहे.
मात्र युद्धक्षेत्र, गुप्तचर अहवाल आणि पक्षांतर करणाऱ्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर युक्रेनबरोबरच्या रशियाच्या तीन वर्षांच्या युद्धाला पाठिंबा देत असताना उत्तर कोरियाचे काही सैनिक टोकाच्या उपाययोजनांचा अवलंब करत असल्याचे उघड झाले आहे.
“आत्मघातकी हल्ला आणि आत्महत्याः हेच उत्तर कोरियाच्या सैन्याचे वास्तव आहे,” असे उत्तर कोरियाचा 32 वर्षीय माजी सैनिक किम म्हणाला. 2022 मध्ये किम दक्षिण कोरियात स्थलांतरित झाला. उत्तर कोरियात असलेल्या आपल्या उर्वरित कुटुंबाच्या विरोधात सूड उगवला जाईल या भीतीमुळे त्याने केवळ आपल्याला आडनावाने ओळखले जावे अशी विनंती केली.
उत्तर कोरियाच्या एकमेव नेत्याचा संदर्भ देत तो पुढे म्हणाला, “जे सैनिक लढण्यासाठी घर सोडून आले होते, त्यांचे ब्रेनवॉश करण्यात आले आहे आणि आता ते किम जोंग उनसाठी स्वतःचा बळी देण्यास खरोखरच तयार आहेत.”
सेऊल येथील मानवाधिकार गट एन.के. इम्प्रिसनमेंट विक्टिम्स फॅमिली असोसिएशनने रॉयटर्सबरोबर किम याची ओळख करून दिली. किमने सांगितले की, त्याने 2021 पर्यंत सुमारे सात वर्षे रशियात उत्तर कोरियाच्या सैन्यासाठी बांधकाम प्रकल्पांवर काम केले होते आणि राजवटीला परकीय चलन कमावून दिले होते.
युक्रेनियन आणि पाश्चात्य अभ्यासकांच्या मते प्योंगयांगने रशियाच्या पश्चिम कुर्स्क प्रदेशात मॉस्कोच्या सैन्याला पाठिंबा देण्यासाठी सुमारे 11 हजार सैनिक तैनात केले आहेत. युक्रेनने गेल्या वर्षी अचानक घुसखोरी करून हा प्रदेश ताब्यात घेतला होता. कीवच्या म्हणण्यानुसार 3 हजारहून अधिक सैनिक मारले गेले आहेत किंवा जखमी झाले आहेत.
जिनेव्हामधील संयुक्त राष्ट्रांच्या उत्तर कोरिया मिशनने यावर प्रतिक्रिया देण्याच्या विनंतीला त्वरित प्रतिसाद दिला नाही.
मॉस्को आणि प्योंगयांगने सुरुवातीला उत्तर कोरियाच्या सैन्य तैनात करण्यात आल्याच्या बातम्या ‘खोट्या बातम्या’ म्हणून फेटाळून लावल्या. मात्र ऑक्टोबरमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उत्तर कोरियाचे सैनिक सध्या रशियामध्ये असल्याच्या बातमीला दुजोरा दिला. उत्तर कोरियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की अशी कोणतीही सैनिकी तैनाती कायदेशीर आहे.
युक्रेनने या आठवड्यात उत्तर कोरियाच्या ताब्यात घेतलेल्या दोन सैनिकांचे व्हिडिओ जारी केले. एका सैनिकाने युक्रेनमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि दुसऱ्याने उत्तर कोरियात परतण्याची इच्छा व्यक्त केली, असे युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितले.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)