प्रसिद्ध राजकीय शास्त्रज्ञ आणि लेखक- अहमद टी. कुरू, यांनी त्यांच्या बेस्टसेलर पुस्तक “इस्लाम – अधिनायकवाद आणि अपद्रव” च्या हिंदी आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी, मुस्लिम समाजांमधील लोकशाही, बौद्धिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या महत्त्वावर भर दिला.
नवी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळाव्यात, खुसरो फाउंडेशनने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून तर ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक एमजे अकबर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
आपल्या भाषणात, कुरू म्हणाले की, ‘त्यांच्या पुस्तकाचे 15 भाषांमध्ये भाषांतर केले गेले असले, तरी 200 दशलक्ष मुस्लिम लोकसंख्येसह भारताच्या विविध धार्मिक परिदृश्यांमुळे या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीला विशेष महत्त्व आहे’. “इस्लाममधील हुकूमशाही आणि विकासाबाबत चर्चा करण्यासाठी भारत एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे, असेही ते म्हणाले.
कुरू, राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि सॅन डिएगो स्टेट युनिव्हर्सिटीच्या- सेंटर फॉर इस्लामिक अँड अरबी स्टडीजचे संचालक आहेत. त्यांनी इस्लामिक संस्कृतीच्या ऐतिहासिक प्रवासाचा आणि विशेषतः ८ व्या ते १२ व्या शतकातील सुवर्ण युगाचा मागोवा घेतला, ज्यावेळी मुस्लिम समाज विज्ञान आणि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर होते.
“मुस्लिम लोक प्राचीन संस्कृतींमधून खूप काही शिकले – चीनमधून कागदनिर्मिती, भारताकडून गणित, ग्रीसकडून तत्त्वज्ञान आदी गोष्टींचे ज्ञान प्राप्त करुन, नंतर त्यांनी युरोपमध्ये त्याचा प्रसार केला.” असे कुरू त्यांनी यावेळी सांगितले. या कालावधीत, धार्मिक, राजकीय, आर्थिक आणि बौद्धिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात स्वतंत्र राहिले, गतिशीलता आणि नवकल्पना वाढवणारे राहिले, असेही ते म्हणाले.
तथापि, पाश्चात्य साम्राज्यवाद हे मुस्लिम समाजाच्या ऱ्हासाचे एकमेव कारण आहे या कल्पनेला विरोध करत, मुस्लिम समाजांच्या पतनाची सुरुवात वसाहतवादाच्या आधीच झाली, असा दावा कुरू यांनी यावेळी केला. त्याऐवजी, त्यांनी स्थीरतेचे श्रेय उलेमा-राज्य युतीला दिले, ज्यामुळे धार्मिक विद्वानांना राज्य संरचनांमध्ये खोलवर रुतवले गेले आणि बौद्धिक स्वातंत्र्य व आर्थिक उद्योजकतेला गालबोट लागले.
इस्लामिक सुवर्ण युग आणि युरोपच्या ५ व्या ते १२ व्या शतकांतील स्तब्धतेच्या काळाची तुलना त्यांनी केली, ज्यावेळी कॅथलिक चर्च आणि राज्य एकमेकांत खोलवर गुंतले होते. कुरू यांनी याविषयी बोलताना सांगितले की, ‘युरोप फक्त धर्म आणि राज्य यांच्यातील विभाजनानंतरच प्रगती करू लागला, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक आणि बौद्धिक समृद्धीला चालना मिळाली.’
आधुनिक आव्हानांशी तुलना करत, त्यांनी राज्य आणि कॉर्पोरेट शक्तींच्या एकत्रित होण्याविषयी इशारा दिला, ज्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेक अब्जाधीश इलॉन मस्क यांसारख्या व्यक्तींचा हवाला त्यांनी दिला. “जेव्हा राज्य आणि बलशाली कंपन्या एकत्रित होतात, तेव्हा ते भ्रष्टाचार आणि लोकशाहीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरतात,” असा इशारा त्यांनी दिला.
कुरु यांनी तालिबान, सौदी अरेबिया आणि इराणची उदाहरणे देऊन, राजकीय इस्लामच्या उदयावर टीका केली. जिथे धर्म आणि राजकारण हे एकमेकांशी घट्ट जोडलेले असतात, ज्यामुळे अनेकदा सामाजिक आणि आर्थिक संकटे निर्माण होतात. कुरू यांनी प्रस्तावित केले, की मुस्लिम समाजाचे समाधान लोकशाही आणि समान नागरिकत्व यामध्ये आहे, तेही पाश्चात्य आयात म्हणून नाही, तर त्यांच्या स्वतःच्या ऐतिहासिक परंपरेतील बहुलवाद आणि बौद्धिक स्वातंत्र्यांच्या पुनरागमनाच्या रूपात.
कुरू पुढे म्हणाले की, “मुस्लिम समाजाचे लोकशाहीकरण हा अमेरिकन किंवा युरोपियन अजेंडा नाही. त्याचे मूळ मुस्लिम इतिहासात आहे.” त्यांनी यावेळी मुस्लिम बहुसंख्य राष्ट्रांना, धर्माची पर्वा न करता सर्व नागरिकांसाठी समान हक्क स्वीकारण्याचे आणि जगभरातील मुस्लिम अल्पसंख्याकांना त्यांच्या संबंधित समाजात सकारात्मकतेने सहभागी होण्याचे आवाहन केले.
बौद्धिक स्वातंत्र्याचे महत्त्व स्पष्ट करण्यासाठी, कुरू यांनी अबू हनीफा, या 8व्या शतकातील इस्लामिक विद्वान व्यापाऱ्याचा संदर्भ दिला, ज्याने राजकीय नियंत्रणावर विद्वान आणि आर्थिक स्वायत्ततेचे मूल्यवान राज्य संरक्षण नाकारले होते. कुरू यांनी तरुण मुस्लिम वर्गाला त्यांच्या प्रगतीशील भविष्यासाठी आदर्श म्हणून अबू हनीफासारख्या व्यक्तींकडे पाहण्याचा सल्ला दिला.
अजित डोवाल: संघर्ष निराकरण आणि सामाजिक प्रगती
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA)- अजीत डोवाल, यांनी आपल्या भाषणात राज्य-धर्म संबंधांवर एक व्यापक ऐतिहासिक आणि तात्त्विक दृष्टिकोन मांडला. त्यांनी असे म्हटले की, ‘धर्म आणि राज्य यातील संबंध फक्त इस्लामापुरतेच मर्यादित नाहीत, तर ते सर्व संस्कृतींमध्ये विकसित झाले आहेत.’
डोवाल यांनी, भारतीय परंपरेत ऐतिहासिकदृष्ट्या विचारधारात्मक आणि धार्मिक संघर्ष कशाप्रकारे संवाद आणि तर्कवादाद्वारे निराकृत केले जातात, यावरही भाष्य केले आणि त्याच्याशी संबंधित काही विरोधाभास दर्शवले, जेथे समाजांनी बळकटीकरणाचा वापर केला आहे. डोवाल यांनी यावेळी भारतीय तर्क वादाचा उल्लेख केला, जसे की मंदन मिश्र आणि आदि शंकराचार्य यामधील ऐतिहासिक संवाद, जो कुठलाही दबाव न ठेवता बौद्धिक संवादाचे उत्तम उदाहरण म्हणून पाहिला जाऊ शकतो.
त्यांनी असे सांगितले की, जेव्हा धर्म आणि राज्याची सत्ता एकत्रित होतात, तेव्हा नवे विचार आणि प्रगती निर्माण करण्याची क्षमता ठप्प होते. त्यांनी विशेषत: काही इस्लामी समाजांची उदाहरणे दिली, ज्यांनी त्याकाळी प्रिंटिंग प्रेस स्विकारण्यास विरोध केला, ज्यामुळे त्यांची बौद्धिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगती धीम्या गतीने झाली.
डोवाल यांनी, वसाहतवादाला- मुस्लिम समाजांना सामोरे जावे लागणाऱ्या सर्व आव्हानांचे मुख्य कारण ठरवण्याच्या प्रवृत्तीवरही टीका केली. “वसाहतवाद हा फॅक्टर काही अंशी एखाद्या समाजाच्या शोषणास कारणीभूत ठरला असला, तरी त्याव्यतिरिक्त काही अंतर्गत कारणांमुळेही मुस्लिम समजांचा विकास मंदावला,” असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजासाठी आत्मचिंतनाची असलेली आवश्यकता अधोरेखित केली आणि बाह्य घटकांना दोष देत बसण्यापेक्षा, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या कमतरतेचा टीकात्मकपणे अभ्यास करण्याचे आवाहन केले.
“जग कधीच स्थिर राहत नाही. आपल्याला आपले विचार, आपले शासन आणि आपले समाज विकसित करावे लागतील. जे समाज लोकशाही आणि बौद्धिक प्रगतीशी जुळवून घेण्यास विलंब करतातआणि नेहमीच मागे राहतात, त्यांच्या उत्कर्षासाठी आपण स्वत: प्रयत्न केले पाहिजेत” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
दुसरीकडे ‘एम.जे. अकबर’, ज्यांनी डोवाल यांच्याआधी भाषण केले, त्यांनी कुरु यांच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक केले आणि कुरू जटिल ऐतिहासिक तसेच राजकीय प्रश्नांना शिस्तबद्ध आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने हाताळल्याचे म्हणत त्यांची प्रशंसा केली. अकबर यांनी या पुस्तकाला मुस्लिम समाजांच्या उदय, ह्रास आणि संभाव्य पुनर्निर्माणाचे एक प्रभावी अध्ययन मानले आणि ऐतिहासिक परिवर्तनांमध्ये ‘असाबिय्याह’ किंवा सामाजिक एकतेच्या केंद्रीय भूमिकेवर लक्ष केंद्रित केले.
इस्लामिक सभ्यतेच्या ऐतिहासिक आरोहणावर चर्चा करताना, अकबर यांनी अरबी समाजाच्या 7व्या शतकातील परिवर्तनाचा संदर्भ दिला आणि असा युक्तिवाद केला की, इस्लामच्या जलद विस्तारामागील प्रेरक शक्ती ही केवळ लष्करी शक्ती नसून एक नवीन सामूहिक भावना आहे. तथापि, त्यांनी असे निरीक्षण केले की, असाबियाने सुरुवातीला एकता आणि प्रगतीला चालना दिली होती, मात्र नंतर त्याचे रॉयल्टीशी असलेले संबंध, आधुनिक राष्ट्र-राज्याच्या संक्रमणाला अडथळा आणणारे ठरले.
सुफीवादाच्या विषयाकडे वळताना अकबर यांनी असा युक्तिवाद केला की, त्यांचे यश केवळ आध्यात्मिक व्यावहारिकतेऐवजी त्याच्या खऱ्या व्यावहारिकतेमध्ये आहे. “सुफीवाद यशस्वी ठरतो कारण तो आपल्याला सामायिक कसे करावे, शत्रुत्वाऐवजी परस्पर फायद्यावर आधारित संबंध कसे निर्माण करावे हे शिकवतो,” असे ते म्हणाला.
त्यांनी सरंजामशाही आणि धर्म यांच्यातील ऐतिहासिक संबंधांवरही आपले मत मांडले. यावेळी त्यांनी असे सुचवले की, विविध धर्मातील सत्ताधारी वर्ग त्यांचे अधिकार सुरक्षित करण्यासाठी धार्मिक वैधतेचा वापर करतात. ”आजही, ब्रिटीश सम्राट चर्च ऑफ इंग्लंडचे प्रमुख आहेत,” ज्यांनी राज्यकारभार आणि धर्म यांच्यातील चिरस्थायी दुव्यावर प्रकाश टाकला आहे.
”भारतीय मुसलमान आणि इंडोनेशियाई लोक, लोकशाही स्वातंत्र्याचा उपभोग घेत असतानाही, इतर अनेक मुस्लिम समाज अधिनायकवादी शासनाखाली राहत आहेत”, हे स्पष्ट करताना ते म्हणाले की, सुमारे पाचशे दशलक्ष मुसलमान स्वतंत्र आणि निर्बंध लोकशाहीत राहतात आणि त्यांनी चीनच्या ऐतिहासिक लोकशाहीच्या अभावाशी याची तुलना केली.
यावेळी ते म्हणाले की, लोकशाहीच्या पलीकडे जाऊन, मुस्लिम समाजांसमोरील खरे आव्हान हे ज्ञानावर आधारित संस्कृतीचे पुनरुज्जीवन हे आहे. इस्लामिक विद्वानांनी अफाट ग्रंथालये आणि शिक्षण केंद्रे निर्माण केल्याच्या ऐतिहासिक उदाहरणाचा दाखला देत, त्याकाळी सत्ताधारी उच्चभ्रूंनी ज्ञानाच्या प्रवेशास प्रतिबंध केल्यामुळे झालेल्या बौद्धिक घसरणीबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला. मुस्लीम समाजांनी छापखान्याचा अवलंब करण्यास विलंब कसा झाला याकडेही त्यांनी लक्ष वेधले, ज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याच्या अनिच्छेचे हे दीर्घकालीन परिणाम होते, असा युक्तिवाद त्यांनी केला.
पाकिस्तान आणि आधुनिक राष्ट्र-राज्याचा मुद्दा
अकबर यांनी यावेळी, पाकिस्तानच्या स्थापनेच्या विचारधारेवर विस्तृत दृष्टिकोन मांडला. ते म्हणाले की, पाकिस्तान मुस्लिमांसाठी नाही, तर इस्लामला एक राजकीय प्रकल्प म्हणून तयार करण्यात आला होता. तथापि, “इस्लाम धोक्यात आहे” यासारख्या राजकीय घोषणांनी लोकांची दिशाभूल केली आहे. ते पुढे म्हणाले की, “इस्लाम कधीच धोक्यात नव्हता, जगात फक्त एक मुस्लिम असतानाही नाही आणि आजही नाही.”
मुस्लिम समाजांना आधुनिकतेला स्विकारावी लागेल आणि वर्तमानकालीन वास्तवाशी जुळवून घेऊन राजकीय संरचनाचा देखील स्विकार करावा लागेल, असेही ते म्हणाले. “सरंजामशाही हे कुठल्याच गोष्टीचे उत्तर नाही. राष्ट्र-राज्य ही एक आधुनिक गरज आहे आणि भविष्यातील प्रगतीसाठी त्याच्या मागण्या समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
हा कार्यक्रम खूजरो फाउंडेशनचे संयोजक डॉ. हफिजुर रहमान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला, ज्यामध्ये अनेक वरिष्ठ ब्युरोक्रॅट्स आणि इतर अधिकारी तसेच पुस्तक मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आलेले लोक उपस्थित होते.