रॉयल भूतान आर्मीच्या सीओओंचा भारत दौरा, काय आहे विशेष कारण?

0
रॉयल भूतान
रॉयल भूतान आर्मीचे सीओओ, चीफ ऑपरेशन्स ऑफिसर- लेफ्टनंट जनरल बटू शेरिंग यांनी, भारत दौऱ्यादरम्यान ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी OTA Gaya ला भेट दिली

‘रॉयल भूतान आर्मी’चे चीफ ऑपरेशन्स ऑफिसर – लेफ्टनंट जनरल बटू शेरिंग, सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, भूतान आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय लष्करी सहकार्य वाढवणे आणि हे सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने नवीन मार्गांचा शोध घेणे, हे या भेटीमागील मुख्य उद्दिष्ट्य आहे.

लेफ्टनंट जनरल शेरिंग, या दौऱ्यादरम्यान भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांची भेट घेतील आणि त्यांच्यासोबत संरक्षण संबंधांबाबत उच्चस्तरीय चर्चा करतील.

संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनानुसार, लेफ्टनंट जनरल शेरिंग यांनी दौऱ्यातील त्यांचा पहिला दिवस गयामध्ये व्यथित केला, जिथे त्यांनी ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी आणि अनेक महत्त्वपूर्ण बौद्ध सांस्कृतिक स्थळांना भेट दिली. ही भेट भूतान आणि भारत यांच्यातील खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक आणि लष्करी संबंधांवर प्रकाश टाकते. “भेटीदरम्यान, शिष्टमंडळाने OTA गया, येथील ऑफिसर कॅडेट्सचे कठोर प्रशिक्षण आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाचा जवळून आढावा घेतला,” असे भारतीय लष्कराने आपल्या X माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

लेफ्टनंट जनरल शेरिंग, हे 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्लीमध्ये असतील, जिथे ते विविध महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होतील. यावेळी त्यांनी लष्करप्रमुख आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणे अपेक्षित आहे. मानेसरमधील राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG), संरक्षण प्रतिमा प्रक्रिया आणि विश्लेषण केंद्र (DIPAC) यासह अनेक महत्त्वाच्या लष्करी संस्थांनाही ते भेट देतील.

भूतानचे राजे- जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या भारत दौऱ्यानंतर, दोन महिन्यांनी शेरिंग यांची ही भारत भेट होते आहे. यामुळे दोन्ही शेजारी देशांमधील धोरणात्मक संबंध अधोरेखित होत आहेत.

लेफ्टनंट जनरल शेरिंग, धोरणात्मक डोकलाम पठार क्षेत्रातील परिस्थितीबाबत भारतीय अधिकाऱ्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे. 2017 मध्ये, या मुद्द्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले होते, जेव्हा भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये 73 दिवसांसाठी तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. यामागील कारण म्हणजे, चीनने भूतानच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रात रस्ता विस्तार करण्याचा प्रयत्न केला होता. भारताने या तणावाच्यावेळी भूतानच्या दाव्याला पाठिंबा दिला होता, ज्यामुळे या क्षेत्रात व्यापक संघर्ष होण्याची भीती निर्माण झाली होती. गेल्या काही वर्षांत, भूतान आणि चीन यांनी त्यांच्या दीर्घकालीन सीमावादाचे लवकर निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत, ज्यावर भारत लक्ष ठेवून आहे.

“लेफ्टनंट जनरल शेरिंग यांच्या या भारत भेटीमुळे, दोन्ही देशांतील सैन्यांमध्ये सहकार्य सातत्याने सुरु ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,” असे भारतीय निवेदनात म्हटले आहे. शेरिंग यांच्या भारत दौऱ्यामुळे, भूतान आणि भारत यांच्यातील सामायिक संबंध अधिक दृढ होतील तसेच त्यांच्यातील सामायिक प्रादेशिक सुरक्षा आणि परस्पर हितसंबंधांबद्दलची वचनबद्धता अधिक मजबूत होईल, असेही त्यात नमूद केले आहे.


Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here