इस्रायली सैन्याने रविवारी ताब्यात घेतलेल्या वेस्ट बँकमधील जेनिन निर्वासित छावणीत मोठ्या प्रमाणात विध्वंस घडवून आणला. पॅलेस्टिनी राज्य वृत्तसंस्थेने सुमारे 20 इमारती उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त दिले.
विध्वंस टिपणाऱ्या फुटेजमध्ये दाट लोकवस्तीच्या छावणीत एकाच वेळी झालेल्या स्फोटांची मालिका दिसून आली.
या स्फोटांमुळे पॅलेस्टिनी शहराच्यावर धुराचे दाट ढग निर्माण झाले होते. पॅलेस्टिनी अतिरेक्यांना लक्ष्य करत असल्याचे आणि शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करत असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे. इस्रायली सैन्य जवळजवळ दोन आठवड्यांपासून मोठी लष्करी कारवाई करत आहे.
पॅलेस्टाईनचे अध्यक्ष महमूद अब्बास यांनी एका निवेदनात अमेरिकेला इस्रायलची लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन केले आणि “पॅलेस्टाईन लोकांविरुद्ध सुरू असलेले इस्रायली आक्रमण थांबवण्यासाठी” संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावण्याची विनंती केली.
23 इमारती “उद्ध्वस्त”
इस्रायली सैन्याने सांगितले की स्फोटक प्रयोगशाळा, शस्त्रसाठे आणि निरीक्षण चौक्या असल्याचे उघड झाल्यानंतर उत्तर वेस्ट बँकमध्ये 23 इमारती “उद्ध्वस्त” करण्यात आल्या आहेत.
रविवारी दिलेल्या आधीच्या निवेदनात, लष्कराने बंदुका, दारूगोळा आणि गॅस डब्यांसारख्या दिसणाऱ्या वस्तूंचे फोटो शेअर केले. ही छायाचित्रे नेमकी कुठे घेतली गेली हे मात्र त्यात नमूद केलेले नाही.
जेनिन रुग्णालयाचे ‘नुकसान’
जेनिन सरकारी रुग्णालयाचे संचालक विसम बेकर यांनी पॅलेस्टिनी राज्य वृत्तसंस्थेला सांगितले की स्फोटांमुळे रुग्णालयाच्या काही भागाचे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
1948 च्या युद्धात, जेव्हा इस्रायल राज्याची स्थापना झाली, तेव्हा पॅलेस्टिनी नागरिकांना, ज्यांना बाहेर काढण्यात आले होते किंवा त्यांना घरे सोडून पलायन करावे लागले होते, त्यांनी जेनिनमध्ये आश्रय घेतला आणि तेव्हापासून निर्वासितांचे जेनिन हे घर आहे. तेथील निर्वासित छावणी अनेक दशकांपासून दहशतवादी कारवायांचे केंद्र आहे आणि इस्रायली सुरक्षा दलांच्या वारंवार हल्ल्यांचे लक्ष्य आहे.
इस्रायलचा जेनिनवरचा हल्ला
इस्रायल आणि दहशतवादी गट हमास यांच्यात गाझामध्ये युद्धविराम लागू झाल्यानंतर दोन दिवसांनी, हेलिकॉप्टर आणि चिलखती बुलडोझरच्या मदतीने इस्रायली सैन्याने 21 जानेवारीपासून शहरावर हल्ला सुरू केला.
गाझापासून लेबनॉनपर्यंत आणि येमेनमधील हुतींसह आपल्या सीमेभोवती स्थापन झालेल्या इराणी समर्थित गटांविरुद्धच्या बहु-आघाडीच्या युद्धाचा एक भाग म्हणून इस्रायल वेस्ट बँककडे बघतो. त्यामुळे गाझामधील लढाई थांबल्यानंतर लगेचच त्याने या क्षेत्राकडे आपले लक्ष वळवले.
20 हजार निर्वासित विस्थापित
पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी असणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थेने म्हटले आहे की, जेनिन छावणीतील जवळजवळ सर्व म्हणजे 20 हजार रहिवासी गेल्या दोन महिन्यांत s झाले आहेत.
जेनिनमधील इमारती पाडल्या गेल्यानंतर हमासने रविवारी इस्रायलविरुद्ध “प्रतिकार वाढवण्याचे” आवाहन केले.
हमास प्रतिस्पर्धी असलेल्या पॅलेस्टिनी प्राधिकरणाद्वारे वेस्ट बँकवर मर्यादित प्रशासन चालवते जाते. तिथे सुमारे 30 लाख पॅलेस्टिनी राहतात आणि त्यांच्यावर इस्रायलचे लष्करी नियंत्रण आहे.
संघर्षामुळे माघार घेण्यास विलंब
कारवाई सुरू झाल्यापासून इस्रायली सैन्याचा स्थानिक दहशतवाद्यांशी संघर्ष सुरू झाला आहे. ही कारवाई पूर्ण करूनच सुरक्षा दले थांबतील असे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी बुधवारी सांगितले. मात्र ते कधी होईल हे सांगितले नाही.
पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जेनिनमध्ये इस्रायली लष्करी कारवाई सुरू झाल्यापासून किमान 25 पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, ज्यात सशस्त्र गटांचे नऊ सदस्य, एक 73 वर्षीय पुरुष आणि दोन वर्षीय मुलीचा समावेश आहे. इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे की त्यांनी किमान 35 दहशतवाद्यांना ठार केले आहे आणि 100 हून अधिक वॉन्टेड व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
पॅलेस्टिनी राज्य वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, इस्रायली सैन्याने रविवारी हेब्रोनजवळच्या निर्वासित छावणीवर छापा टाकून एका 27 वर्षीय व्यक्तीला ठार केले.
टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्स)