चीनच्या माजी एरोस्पेस संरक्षण कार्यकारी अधिकाऱ्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षातून काढून टाकण्यात आल्याचे चीनच्या भ्रष्टाचारविरोधी निरीक्षकाने सोमवारी जाहीर केले. ही हकालपट्टी चीनच्या लष्करी-औद्योगिक संकुलातील व्यापक भ्रष्टाचारविरोधी शुध्दीकरणाचा एक भाग आहे.
सेंट्रल कमिशन फॉर डिसिप्लिन इन्स्पेक्शनच्या निवेदनात म्हटले आहे की, चीनच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशनचे माजी अध्यक्ष टॅन रुइसोंग यांनी “लष्करी क्षेत्रातून” मोठ्या प्रमाणात लाच घेतली.
आकार आणि संख्या या दोन्ही बाबत जगातील सर्वात मोठ्या असणाऱ्या चिनी लष्करातील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी गेल्या दोन वर्षांत 14 लष्करी प्रतिनिधींना चीनच्या राष्ट्रीय विधिमंडळातून काढून टाकल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
यामध्ये चार जनरल, आठ लेफ्टनंट जनरल आणि दोन मेजर जनरल यांचा समावेश आहे. चीनच्या सर्वोच्च राजकीय सल्लागार मंडळातून किमान आणखी तीन एरोस्पेस संरक्षण अधिकाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.
टॅन यांनी “आपला आदर्श आणि विश्वास गमावला होता, आपल्या मूळ महत्त्वाकांक्षांचा विश्वासघात केला होता, पक्षाच्या नियमांचे उल्लंघन करून” मेजवान्यांची आमंत्रणे स्वीकारली होती,” “लैंगिक व्यवहारांसाठी सत्तेचा वापर केला होता “आणि” उद्योग पुनर्रचनेमध्ये आणि अभियांत्रिकी प्रकल्पांचे कंत्राट देताना आपल्या मर्जीतील लोकांचा लाभ व्हावा यासाठी “आपल्या पदाचा वापर केला होता,” असे अतिशय तपशीलवार वर्णन निवेदनात केले आहे.
हे प्रकरण सरकारी वकिलांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
या निर्णयावरील प्रतिक्रियेसाठी रॉयटर्सने टॅन यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. चीनच्या सरकारी मालकीच्या एव्हिएशन इंडस्ट्री कॉर्पोरेशननेही याप्रकरणी मौन बाळगणे पसंत केले आहे.
“शिस्तीचे गंभीर उल्लंघन” केल्याबद्दल चिनी लष्करी वरिष्ठ अधिकारी मियाओ हुआ यांची चौकशी झाल्यानंतर तीन महिन्यांनी टॅन यांचे प्रकरण समोर आले आहे.
मियाओ हे पीपल्स लिबरेशन आर्मीचे प्रमुख राजकीय अधिकारी होते आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय केंद्रीय लष्करी आयोगाचे सदस्य देखील होते.
चीनचे पूर्वीचे दोन संरक्षण मंत्री, ली शांगफू आणि वेई फेंघे यांनाही जूनमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कम्युनिस्ट पक्षातून काढून टाकण्यात आले होते. विशेषतः ली यांचे प्रकरण लष्करी उपकरणांच्या भ्रष्ट खरेदीशी संबंधित होते, असे रॉयटर्सने म्हटले आहे.
यापूर्वी हकालपट्टी झालेल्यांपैकी बरेच जण पीएलए रॉकेट फोर्सशी संबंधित होते-पीएलएची एक अभिजात शाखा जी त्याच्या सर्वात प्रगत पारंपरिक आणि आण्विक क्षेपणास्त्रांवर देखरेख ठेवते.
विश्लेषकांच्या मते ही खोलवर रुजलेली भ्रष्टाचाराची पाळेमुळे उघड होण्यास वेळ लागू शकतो आणि शी जिनपिंग यांच्या दीर्घकाळ चाललेल्या लष्करी आधुनिकीकरणाच्या योजनांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
टीम भारतशक्ती
(रॉयटर्स)