‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ साठी जपानचे मोदींकडून कौतुक

0
जपान-भारत

जपान -भारत व्यावसायिक सहकार्य समितीच्या 17 सदस्यीय शिष्टमंडळाने काल बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या उपक्रमासाठी दृढ वचनबद्धतेबद्दल देशाचे कौतुक केले.समितीचे अध्यक्ष तात्सुओ यासुनागा यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

“या शिष्टमंडळात उत्पादन, बँकिंग, विमान वाहतूक, औषधनिर्माण, प्रकल्प अभियांत्रिकी आणि लॉजिस्टिक अशा विविध क्षेत्रांतील जपानमधील आघाडीच्या उद्योग समूहांच्या  वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता,” असे भारत सरकारकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

तात्सुओ यासुनागा यांनी पंतप्रधानांना येत्या 06 मार्च 2025 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या जपान – भारत व्यावसायिक सहकार्य समिती आणि भारत-जपान व्यावसायिक सहकार्य समितीच्या 48व्या  संयुक्त बैठकीची माहिती दिली.

या भेटीत उच्च गुणवत्ता, भारतातील किफायतशीर  उत्पादन, जागतिक बाजारपेठेसाठी विशेषतः आफ्रिका खंडावर लक्ष केंद्रित करून भारताच्या उत्पादन क्षेत्राचा विस्तार तसेच मानवी संसाधनांचा विकास आणि परस्पर हस्तांतरणात वाढ करण्याच्या शक्यता अशा अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा केली गेली.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानी उद्योग समुहाच्या भारतातील विस्तार योजनांची प्रशंसा केली.

मोदी यांनी कौशल्य विकासातील वाढीव सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले, जो भारत-जपान द्विपक्षीय संबंधांचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे.

‘एक्स’वर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये मोदी म्हणालेः “आज तात्सुओ यासुनागा यांच्या नेतृत्वाखालील जपानी व्यावसायिक शिष्टमंडळाला भेटून आनंद झाला. भारतातील त्यांच्या विस्तार योजना आणि ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ च्या दृढ वचनबद्धतेमुळे त्यांना प्रोत्साहन मिळाले. आमचे विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदार जपानबरोबर आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहोत.”

भारत जपान द्विपक्षीय संबंध

2023-24 या आर्थिक वर्षात जपानचा भारताशी एकूण 2 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा द्विपक्षीय व्यापार झाला. जपानमधील भारतीय दूतावासाने सांगितले की, “या काळात जपानमधून भारतात होणारी निर्यात 1 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी होती आणि आयात 5 अब्ज 15 कोटी अमेरिकी डॉलर्स इतकी होती.

आज जपानच्या एकूण व्यापारात भारत 1.4 टक्के वाटा घेऊन 18 व्या क्रमांकावर आहे, तर भारताच्या एकूण व्यापारात जपान 2.1 टक्के वाटा घेऊन 17 व्या क्रमांकावर आहे

जपानच्या एकूण निर्यातीत भारत 2.2 टक्के वाट्यासह 11व्या क्रमांकावर आहे आणि भारताच्या एकूण निर्यातीत 1.2 टक्के वाट्यासह जपान 25व्या क्रमांकावर आहे.

जपानच्या एकूण आयातीमध्ये 0.7 टक्के वाट्यासह भारत 28व्या क्रमांकावर आहे आणि भारताच्या एकूण आयातीमध्ये 2.9 टक्के वाट्यासह जपान 12व्या क्रमांकावर आहे.

“यातून हे अधोरेखित होते की अजूनही व्यापाराच्या दृष्टीने मोठी क्षमता आहे,” असे दूतावासाने म्हटले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(आयबीएनएसच्या इनपुटसह)


Spread the love
Previous articleपाकिस्तानच्या खुजदारमध्ये IED स्फोट; चार ठार तर काही जखमी
Next articleUS Pauses Intelligence Sharing For Ukraine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here