थिएटर कमांड: चर्चेचे नुसतेच गुऱ्हाळ?

0
थिएटर
27 ऑगस्ट 2025 रोजी महू येथे झालेल्या रण संवाद चर्चासत्रात सी. डी. एस. जनरल अनिल चौहान आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्यासमवेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. 

या आठवड्याच्या सुरुवातीला (26-27 ऑगस्ट) महू येथे “रण संवाद” या नावाने भारतीय लष्कराच्या पहिल्याच त्रि-सेवा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. उपलब्ध माहितीनुसार हे चर्चासत्र म्हणजे एक संस्मरणीय कार्यक्रम ठरला, याचे मुख्य कारण म्हणजे तीनही सशस्त्र दलांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विचार प्रक्रियेत, विशेषतः जॉईंट थिएटर कमांड तयार करण्याच्या प्रक्रियेत असणारी विसंगती यावेळी स्पष्टपणे दिसून आली.

सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या परिषदेचे लक्ष युद्ध, युद्धतंत्र आणि प्रत्यक्ष युद्धलढतींवर केंद्रित होते. मात्र  समारोपाचा शेवट करताना, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग आणि नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी सीडीएस यांच्या उपस्थितीत सार्वजनिकरित्या व्यक्त केलेल्या थिएटरायझेशनच्या  समजुतींमध्ये असणाऱ्या भिन्नत्वाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

लढाऊ कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी भारताने कोणते मॉडेल स्वीकारावे यावर चर्चा पुन्हा सुरू करत, सिंग यांनी हे स्पष्ट केले की हवाई दल अनेक संयुक्त आदेशांऐवजी एकात्मता आणि संयुक्तता सुनिश्चित करण्यासाठी केंद्रीय संयुक्त नियोजन आणि समन्वयाला प्राधान्य देते.

“OODA (निरीक्षण, दिशा, निर्णय, कृती) लूप लांबवत नसलेला कोणताही संरचनात्मक बदल फायदेशीर आहे. परंतु त्यात अचानक येणारा व्यत्यय योग्य नाही. एकात्मिकतेला चालना देण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय राजधानीत संयुक्त नियोजन आणि समन्वय केंद्राची आवश्यकता आहे,” असे त्यांनी सुचवले.

ॲडमिरल त्रिपाठी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, नौदल आपल्या आदेश आणि नियंत्रण, दळणवळण आणि लढाऊ क्षमता लष्कर तसेच हवाई दल यांच्याशी एकत्रितपणे काम करण्यासाठी वचनबद्ध आहे. आपल्या समारोप भाषणात जनरल चौहान यांनी तिन्ही सैन्यांमध्ये असणाऱ्या मतभेदांची कबुली दिली. “त्यामुळे, जर तुम्हाला काही विसंगती जाणवली असेल, तर मी तुम्हाला खात्री देतो की आम्ही देशाच्या हितासाठी त्यावर तोडगा काढू”, असे जनरल चौहान म्हणाले.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न पुन्हा सार्वजनिक वादाकडे वळतो की ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय सशस्त्र दले थिएटरायझेशन करण्यासाठी किती वचनबद्ध आहे? याचे उत्तर नेहमीप्रमाणेच अवघड आहे.

 

थिएटर कमांडच्या निर्मितीकडे परत जाणे

मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) आवश्यकतांसह सर्व प्रकारच्या धोक्यांना आणि आव्हानांना  कार्यक्षमतेने तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणात तडीस नेता येतील असे व्यवहार्य उपाय शोधणे हे भारतीय सशस्त्र दल आणि भारतीय संरक्षण आस्थापनेसाठी अत्यावश्यक झाले आहे, यात काही शंका नाही. भारतीय सशस्त्र दलांची भूमिका आणि संघटनात्मक मूल्ये लक्षात घेऊन अद्वितीय भारतीय दृष्टीकोनातून थिएटर कमांडच्या संकल्पनेची व्यवहार्यता शोधण्याचे आवाहन यात केले आहे. एकात्मिकरणाच्या प्रतिमानावर परिणाम करणाऱ्या समस्यांचा शोध घेण्यापूर्वी या चर्चेशी संबंधित संरक्षण सुधारणांच्या पार्श्वभूमीचे सगळ्यात आधी संक्षिप्त सर्वेक्षण करणे योग्य ठरेल.

जगभरातील प्रमुख लष्करी शक्तींनी कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि संरक्षण खर्च तर्कसंगत करण्यासाठी त्यांच्या सैन्याचे सातत्याने एकात्मिकरण केले आहे. जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना चालवणाऱ्या अमेरिकेत 1947 पासून जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफची संस्था अस्तित्वात आहे. मात्र, 1986 मध्ये, संरक्षण सुधारणांबद्दल चिंतित असलेल्या काँग्रेस सदस्य गोल्डवॉटर आणि निकोल्स यांच्या प्रयत्नांनंतर, अमेरिकन सैन्याचे अधिक जवळचे एकात्मिकरण सुनिश्चित करण्यासाठी नवीन कायदा (त्यांच्या नावावर) मंजूर करण्यात आला, ज्यामुळे सध्याच्या संरचनेची उत्क्रांती एकीकृत आदेशांवर आधारित झाली.

1998 च्या धोरणात्मक संरक्षण आढाव्यानंतर ब्रिटनमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफला सशस्त्र दलांचे व्यावसायिक प्रमुख आणि सरकारचे प्रधान सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

कॅनडामध्ये, 1964 ते 1967 दरम्यान माजी संरक्षण मंत्री पॉल हेलियर यांनी कॅनेडियन संरक्षण दलांचे एकात्मिकरण साध्य केले, ज्यांनी सुरुवातीला वादग्रस्त असलेल्या सुधारणांची सुरुवात करण्यासाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्ती, कायदेविषयक पाठबळ, संस्थात्मक साधनसामग्री आणि सशस्त्र दलांची संमती एकत्रित केली.

ऑस्ट्रेलियामध्ये, 1997 मध्ये चीफ ऑफ डिफेन्स फोर्सच्या नेतृत्वाखाली मुख्यालय ऑस्ट्रेलियन थिएटरच्या (AST) स्थापनेसह थिएटर कमांड संकल्पना सुरू करण्यात आली. ऑस्ट्रेलियन राजकीय धोरणात्मक पातळीला युद्धलढ्यांपासून वेगळे करणे, ऑपरेशन्सचे समन्वय आणि ऑपरेशन्सच्या नियंत्रणासाठी स्वीकारण्यात येणारे तात्पुरता दृष्टीकोन बंद करणे, ऑपरेशनल स्तरावर कमांडची एकता स्थापित करणे आणि मोहिमा, ऑपरेशन्स आणि इतर क्रियांच्या नियोजनासाठी स्थायी क्षमता प्रदान करणे हे उद्दीष्ट होते.

रशियामध्ये, 2010 मध्ये राष्ट्रपतींच्या हुकुमाद्वारे चार स्ट्रॅटेजिक कमांडची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये तीन सेवा आणि केंद्राच्या थेट अंतर्गत स्वतंत्र शाखा, म्हणजे क्षेपणास्त्र, अंतराळ आणि हवाई दल यांच्या संसाधनांचे योग्य वाटप करण्यात आले.

प्रादेशिक कमांडरच्या नेतृत्वाखाली सात लष्करी क्षेत्रांच्या पुनर्रचनेसह चिनी मॉडेल देखील अशाच प्रकारे विकसित झाल्याचे दिसते, जे तीन सेवांना वाटप केलेल्या संसाधनांवर आणि ऑपरेशन्ससाठी लॉजिस्टिक्स आणि शस्त्रास्त्र विभागांवर नियंत्रण ठेवतो.

 

भारत हा एक इंडो-पॅसिफिकमधील लोकशाही असलेला देश आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने संदर्भ म्हणून योग्य असलेल्या मॉडेलचे मूल्यांकन करण्यासाठी, थिएटर कमांडसाठी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियन दृष्टिकोनांचा बारकाईने विचार करणे योग्य ठरेल, जे काळाच्या ओघात टिकून राहिले आहेत आणि विकसितही झाले असून त्यात देशांतर्गत आणि परदेशी अशा दोन्ही ठिकाणी करण्यात आलेल्या विविध कामगिऱ्यांचा अनुभव आहे.

यूएस रीजनल कॉम्बॅटंट कमांडकडे भौगोलिक क्षेत्राची जबाबदारी आहे, ते एकाच कमांडरच्या अंतर्गत काम करतात जो दोन किंवा अधिक सेवांचे निरीक्षण करतो. ते त्यांच्या नियुक्त केलेल्या AOR मध्ये सर्व अमेरिकन लष्करी ऑपरेशन्सचे धोरणात्मक दिशानिर्देश प्रदान करतात. पाच प्रादेशिक एकत्रित कमांड म्हणजे यूएस अटलांटिक कमांड, सेंट्रल कमांड, युरोपियन कमांड, इंडो-पॅसिफिक कमांड आणि सदर्न कमांड.

याशिवाय, अमेरिकेकडे यूएस स्पेस कमांड, स्पेशल ऑपरेशन्स कमांड आणि स्ट्रॅटेजिक कमांड यासह कार्यात्मक कमांड आहेत. विशेष ऑपरेशन्ससाठी, त्यांच्या भौगोलिक स्थानाची पर्वा न करता ऑपरेशन्सचे नियोजन, रिहर्सल आणि अंमलात आणण्यासाठी संयुक्त विशेष ऑपरेशन्स टास्क फोर्सची (JSOTF) स्थापना केली जाते.

अमेरिकन फील्ड मॅन्युअलमध्ये ‘ऑपरेशन थिएटर’ ही संकल्पना आक्रमण करण्यासाठी किंवा बचाव करण्यासाठी जमीन आणि समुद्र या क्षेत्रांसारखी परिभाषित केली आहे, ज्यामध्ये लष्करी ऑपरेशन्सशी संबंधित प्रशासकीय क्रियांसाठी आवश्यक असलेले क्षेत्र समाविष्ट आहे. पाश्चात्य संकल्पनेत, युरोपियन थिएटर ऑफ ऑपरेशन्सचा वापर युरोपमधील सर्व लष्करी क्रियांंसाठी केला जात असे, तर पॅसिफिक थिएटर ऑफ ऑपरेशन्स पॅसिफिक महासागराशी संबंधित होते.

म्हणूनच, थिएटर ऑफ ऑपरेशन्सचा मूळ अर्थ मोठ्या संलग्न जमीन किंवा समुद्री क्षेत्रांशी संबंधित आहे जिथे समन्वयित ऑपरेशन्स होतात. ऑस्ट्रेलियन संदर्भात, मुख्यालय संयुक्त ऑपरेशन्स कमांड (HQJOC), जे मुख्यालय AST ची उत्तराधिकारी संस्था आहे, त्याच्याकडे कायम स्वरूपी कोणतेही सैन्य नियुक्त केलेले नाही. विशिष्ट ऑपरेशन्ससाठी संरक्षण दल प्रमुखांद्वारे (CDF) संयुक्त ऑपरेशन्स प्रमुखांना (CJOPS)  योग्य सैन्य नियुक्त केले जाते. CDF ऑस्ट्रेलियन संरक्षण दलांवर (ADF) पूर्ण कमांड राखते.

मात्र, सेवा प्रमुख त्यांच्या संबंधित सेवांचे नेतृत्व करतात. जेव्हा CDF एखादी कारवाई किंवा मोहीम राबविण्याचे आदेश देते, तेव्हा ते सेवा प्रमुखांना CJOPS ला विशिष्ट क्षमतेच्या पातळीवर योग्य सैन्य नियुक्त करण्याचे निर्देश देतात. प्रत्येक सेवा प्रमुख त्यांच्या सेवेच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांशी संबंधित बाबींवर CDF चा प्रमुख सल्लागार देखील असतो. CDF सेवा प्रमुख समितीचे अध्यक्षपद भूदलप्रमुख, संरक्षण दलाचे उपप्रमुख आणि CJOPS यांचा समावेश करते. मुख्यालय JOC मध्ये घटक कमांडर आणि पुरेशा संख्येने कायमस्वरूपी कर्मचारी असतात. ते नियुक्त केलेल्या सैन्याच्या ऑपरेशनल कामगिरीबाबत CJOPS ला तज्ञ सल्ला देतात. ही संघटना ऑस्ट्रेलियन CDF ला कायमस्वरूपी उपलब्ध आहे.

प्रश्न असा आहे: ही मॉडेल्स भारतीय सैन्यासाठी योग्य आहेत किंवा लागू आहेत का? याचे साधे उत्तर असे आहे की भारताला त्याच्या विशिष्ट भू-सामरिक वातावरणावर आणि त्याच्या आव्हानांच्या विविधतेवर आधारित स्वतःची अद्वितीय व्यवस्था उभारणे आवश्यक आहे. कदाचित एक अद्वितीय भारतीय मॉडेल विकसित करण्यासाठी काही संकल्पना परदेशी संरचनांकडून घेतल्या जाऊ शकतात.

(Tomorrow: Towards a Unique Indian Model inspired by Global Best Practices)

नितीन अ. गोखले

+ posts
Previous articleविशेष दलांच्या भूमिकेची पुनर्व्याख्या करणाऱ्या सिद्धांतांसह रण संवादाची सांगता
Next articleट्रम्प यांच्या टॅरिफ समस्येवर मोदी आणि इशिबा यांचा मात करण्याचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here