Sudan: ‘मारा’ पर्वतरांगांमध्ये मोठे भूस्खलन; 1,000 नागरिकांचा मृत्यू

0

सुदानच्या मारा पर्वतरांगांमध्ये झालेल्या विनाशकारी भूस्खलनात संपूर्ण खेडे नष्ट झाले, ज्यात किमान 1,000 लोकांचा मृत्यू झाला असून, केवळ एकच व्यक्ती जिवंत राहिली असल्याची माहिती, Sudan लिबरेशन मूव्हमेंट/आर्मीने सोमवारी दिली.

भूस्खलनापूर्वी अनेक दिवस या भागात सतत मुसळधार पाऊस पडत होता, असे अब्देलवाहिद मोहम्मद नूर यांच्या नेतृत्वाखालील या गटाने त्यांच्या निवेदनात सांगितले आहे.

मदतीसाठी आवाहन

डारफुर प्रदेशात असलेला हा बाधित भाग ‘सुदान लिबरेशन गटाच्या’ नियंत्रणात असून, त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय मदत संस्थांना मदतीचे आवाहन केले आहे, विशेषतः ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पुरुष, महिला आणि लहान मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी.

“भूस्खलनाच्या कचाट्यात सापडलेले संपूर्ण खेडे आता जमीनदोस्त झाले असल्याचे,” लिबरशेन ग्रुपने सांगितले.

युद्धातून पळणारे नागरिक

उत्तर डारफुर राज्यात, सुदानची राष्ट्रीय सेना आणि पॅरामिलिटरी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (RSF) यांच्यात सुरू असलेल्या युद्धातून बचावासाठी, अनेक नागरिकांनी मारा पर्वतरांगांमध्ये आसरा घेतला होता. मात्र, आता तिथे अन्न आणि औषधांची तीव्र कमतरता आहे.

गेली दोन वर्षे सुरु असलेल्या गृहयुद्धामुळे, निम्मे लोक उपासमारीच्या संकटात सापडले आहेत आणि लाखो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत, तर उत्तर दारफुर राज्याची राजधानी, अल-फाशिर, सतत हल्ल्याखाली आहे.

दोन्ही सैन्याच्या बालेकिल्ल्यांदरम्यान असलेल्या विशाल कोर्डोफान प्रदेशात, आजही छोट्या गावांवर हल्ले आणि लढाया सुरू आहेत.

युद्धाची किंमत

UNICEF ने ऑगस्ट महिन्यात सांगितले की, “हवाई, तोफखाना आणि थेट जमिनीवरून झालेल्या हल्ल्यांमध्ये 1,000 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला किंवा ते जखमी झाले आहेत.” RSF चा दावा आहे की, त्यांनी नागरिकांना निघून जाण्यासाठी पुरेसा वेळ दिला होता.

मात्र, येल ह्युमॅनिटेरियन लॅबने सांगितले की, “उपग्रह प्रतिमांमध्ये हे दिसून आले आहे की, RSF ने लोकांना बाहेर पडू नये म्हणून अडथळे उभारले होते. जे काही लोक पळून जाण्यात यशस्वी झाले, त्यांनी RSF सैनिकांकडून झालेल्या हिंसक हल्ल्यांची आणि लुटीची माहिती दिली आहे.”

सुदानच्या सैन्याने, देशाच्या मध्य आणि पूर्व भागांवर पुन्हा नियंत्रण मिळवले असून, युद्धानंतरच्या पहिल्या सरकारची स्थापना केली आहे. काही दिवसांपूर्वी या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली.

हेमेदती यांचा शपथविधी

RSF चे प्रमुख मोहम्मद हमदान डगालो, ज्यांना हेमेदती म्हणून ओळखले जाते, त्यांनी 31 ऑगस्ट रोजी सुदानच्या प्रतिस्पर्धी सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतली. सरकारने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली असून, यामुळे देशातील वास्तविक विभाजनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे.

हेमेदती, मागील 28 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धानंतर क्वचितच सुदानमध्ये दिसून आले होते. मात्र, या निवेदनात सांगण्यात आले आहे की, त्यांनी न्याला या सुदानी शहरात प्रमुखपदाची शपथ घेतली. दरम्यान, रॉयटर्सने त्यांच्या ठिकाणाची स्वतंत्रपणे पुष्टी केलेली नाही.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleModi’s China Visit: Exercise in Strategic Signalling, Not a Transformative Shift
Next articleIndia–US Seal First Civil Nuclear Tech Transfer Amid Tariff War

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here