भविष्यातील युद्धनीती: भारत करणार तंत्रज्ञान-सक्षम सशस्त्र दलांची निर्मिती

0

‘भारतीय संरक्षण परिषद 2025’ (India Defence Conclave 2025)च्या दहाव्या आवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात- कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर युद्ध आणि तांत्रिक आत्मनिर्भरता या प्रमुख पैलूंवर भर देण्यात आला, जे भारताचे पारंपरिक प्रतिबंधाकडून, ‘बुद्धिमान संरक्षण क्षमतेकडे’ होणारे परिवर्तन दर्शवतात.

कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा आणि युद्धाचे नवे क्षेत्र

संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव आणि डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत, यांनी आपल्या भाषणात चर्चेची दिशा निश्चित केली.

त्यांनी स्पष्ट केले की, “जोपर्यंत देश सुरक्षित नाही, तोपर्यंत त्याची आर्थिक प्रगती शक्य नाही. आपल्या सशस्त्र दलांमध्ये नवे तांत्रिक बदल आत्मसात करण्याची क्षमता असली पाहिजे, कारण भविष्यातील युद्धे ही संक्रमित आणि बहुविभागीय स्वरूपाची असतील.”

“भविष्यातील संघर्ष एखाद्या क्षेपणास्त्राच्या प्रक्षेपणाआधी, सायबर हल्ल्यांपासून सुरू होऊ शकतात,” असा इशारा त्यांनी यावेळी दिली. “भविष्यात डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि क्वांटम तंत्रज्ञान डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञान युद्धाच्या परिणामांना आकार देतील,” असेही ते म्हणाले.

त्यांनी यावेळी नमूद केले की, “या नव्या युद्धभूमीमध्ये सायबर आणि अवकाश क्षेत्रांचाही समावेश झाला आहे, त्यामुळे भारताचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्याला AI आणि स्वयंचलित प्रणालींपासून ते अत्याधुनिक संसाधने आणि बुद्धिमान तंत्रज्ञानापर्यंत, सर्व उदयोन्मुख तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवावे लागणार आहे.”

‘डीआरडीओ, विविध शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्रांनी मिळून, स्वदेशीकरणांतर्गत महत्त्वाच्या तंत्रज्ञानांची उभारणी करावी’ असे आवाहन कामत यांनी यावेळी केले.

“आता झेप घेण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. “आपल्याला आयात-आधारित संरक्षण अर्थव्यवस्थेतून पूर्णपणे स्वदेशी प्रणालीकडे जावे लागेल, जी डिझाईन, निर्मिती आणि निर्यातही करू शकेल.”

सॅफ्रान: भारताच्या एरोस्पेस इकोसिस्टमची उभारणी

सॅफ्रान इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतातील प्रमुख जे. एस. गवणकर, यांनी सॅफ्रान ही फ्रान्सची दिग्गज एरोस्पेस कंपनी, भारतात कशाप्रकारे आपली उपस्थिती वाढवत आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली.

“सॅफ्रान सध्या भारतातील सात शहरांमध्ये उत्पादन आणि अभियांत्रिकी उपक्रम राबवत आहे. आम्ही दुरुस्ती आणि देखभाल सुविधा उभारत आहोत आणि सशस्त्र दलांप्रती आमचा पाठिंबा वाढवत आहोत,” असे त्यांनी सांगितले.

“सॅफ्रॉनचे धोरण, भारताच्या  ‘मेक इन इंडिया, सस्टेन इन इंडिया’ या दृष्टीकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, “नवोन्मेष हा भारतातच घडला पाहिजे. भारतात एक शाश्वत एरोस्पेस इकोसिस्टम तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे, ज्याद्वारे भारतात फक्त उत्पादनच नाही, तर प्रगत तंत्रज्ञानाचे डिझाईन आणि त्याचा विकासही केला जाईल.”

L&T: भविष्यातील सशस्त्र दलाचे निर्माते

लार्सन अँड टूब्रो (L&T) कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि L&T डिफेन्सचे प्रमुख अरुण रामचंदानी, यांनी सांगितले की: “आता भारताकडे देशांतर्गत जटिल संरक्षण प्रणाली विकसित करण्यासाठीची आवश्यक औद्योगिक आणि संशोधन-विकास क्षमता उपलब्ध आहे.”

“पूर्णपणे स्वदेशी संसाधने आणि संरक्षण प्रणाली विकसित करण्यावर आमचा भर आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. “मोठ्या उद्योगांपासून ते सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांपर्यंत (MSMEs) भारतीय औद्योगिक परिसंस्था, आता एकत्रितपणे कार्य करून भविष्यातील प्रगत प्लॅटफॉर्म विकसित करण्यास सक्षम आहे,” असे ते म्हणाले.

रामचंदानी यांनी पारंपरिक अभियांत्रिकी आणि डिजिटल तंत्रज्ञान- जसे की AI, सिम्युलेशन आणि रिअल-टाइम सिस्टिम इंटिग्रेशन, यांच्या एकत्रीकरणाची गरज अधोरेखित केली.

“आता फक्त भौतिक प्रणाली तयार करणे पुरेसे नाही; तर प्रत्येक संसाधनांमध्ये प्रगत बुद्धिमत्ता समाविष्ट केली गेली पाहिजे,” असे त्यांनी नमूद केले.

अदानी डिफेन्स: आत्मनिर्भरता आणि व्याप्तीचा निर्माता

भारतातील वेगाने प्रगती करत असलेल्या खाजगी संरक्षण क्षेत्राचा दृष्टिकोन मांडताना, अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आशीष राजवंशी यांनी, डॉ. कामत यांनी सांगितलेल्या ‘हायब्रीड युद्धाच्या’ संकल्पनेशी जुळतील अशा भविष्यासाठी तयार होणाऱ्या युद्ध क्षमतांमध्ये, अदानी गट कशाप्रकारे गुंतवणूक करत आहे हे स्पष्ट केले.

“अदानी डिफेन्समध्ये, आमचे ध्येय एक अशी परिसंस्था तयार करणे आहे जी, अधिक क्षमता आणि आत्मनिर्भरता दोन्ही प्रदान करेल,” असे राजवंशी म्हणाले. भविष्यातील युद्धे डेटा, AI आणि स्वायत्त प्रणालींसह लढली जातील, त्यामुळे या तंत्रज्ञानांना आमच्या उत्पादन आणि संशोधन विकासात एकत्रित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असेही त्यांनी सांगितले.

अदानी समूहाने, कानपूरमध्ये दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या शस्त्रसाहित्य आणि क्षेपणास्त्र उत्पादन संकुलांपैकी एक संकुल उभारले असून, यामध्ये जागतिक तंत्रज्ञान नेत्यांसोबत भागीदारी करून क्षेपणास्त्र प्रणाली, मानवरहित प्लॅटफॉर्म्स, ड्रोन-विरोधी प्रणाली आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध तंत्रज्ञान यांचे स्वदेशीकरण केले आहे.

“आम्ही AI आणि मशीन लर्निंग-आधारित प्रणालींमध्ये, स्वदेशी शस्त्रसाहित्य आणि प्रगत एरोस्पेस क्षमतांमध्ये गुंतवणूक करत आहोत, भारताला केवळ आत्मनिर्भर बनवणे नाही, तर प्रगत संरक्षण तंत्रज्ञानाचा मुख्य निर्यातदार बनवणे हे आमचे ध्येय आहे,” असे राजवंशी यांनी सांगितले.

ते म्हणाले की, “भारताची संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी MSMEs, स्टार्टअप्स आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सहकार्य आवश्यक आहे, जे डीआरडीओच्या एकसंध राष्ट्रीय प्रयत्नांच्या आवाहनाशी सुसंगत असेल.”

“हायब्रिड युद्ध हे हायब्रिड नवोन्मेष मागते,” असे त्यांनी सांगितले. “आपल्याला औद्योगिक सामर्थ्य आणि डिजिटल बुद्धिमत्ता यांचे संयोजन करण्याची आवश्यकता आहे,” असेही त्यांनी अधोरेखित केले.

मानव आणि यंत्र: भविष्यातील रणांगण

TDAC, NIIO चे माजी प्रमुख, कॅमोडोर अरुण गोलाया (निवृत्त), यांनी उपस्थितांना आठवण करून दिली की, “जरी यंत्र युद्धाच्या स्वरूपात बदल घडवत असले तरी, यंत्राच्या पाठीमागे असलेला माणूस हाच अखेरीस निर्णायक ठरतो.”

“हजारो वर्षांपासून माणसांनी प्रत्यक्ष युद्ध  लढली आहेत, जी आता हळूहळू मशीन्सद्वारे लढली जात आहेत, परंतु जोपर्यंत आपण आपल्या सैनिकांना हे तंत्रज्ञान शिकवत नाही आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तयार करत नाही, तोपर्यंत ही यंत्र आपल्यावर नियंत्रण ठेवतील,” असे ते यावेळी म्हणाले.

त्यांनी नमूद केले की, “सैनिकांची पुढील तैनातीची प्रशिक्षण तयारी, सिम्युलेशन आणि संज्ञानात्मक परिवर्तनावर अवलंबून असेल, जी सैनिकांना AI, स्वयंचलन आणि माहिती युद्धाच्या जगात आत्मविश्वासाने कार्य करण्यास सक्षम करेल.”

एकसंध राष्ट्रीय तंत्रज्ञानावर आधारित संरक्षण दृष्टिकोन

डीआरडीओच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानात प्रभुत्व मिळवण्याच्या दृष्टीकोनापासून ते सॅफ्रानचा स्थानिक नवोन्मेष, L&T चे एकात्मिक अभियांत्रिकीकरण आणि अदानी कंपनीचा प्रमाणात्मक उत्पादन आणि AI-आधारित प्रणालींमधील पुढाकार, एकसंधपणे हे स्पष्ट करतो की: भारताचे संरक्षण भविष्य तांत्रिक सार्वभौमत्वावर अवलंबून आहे.

डॉ. कामत आपल्या भाषणाचा शेवट करताना म्हणाले की, “आपल्याला एका नवीन प्रकारच्या युद्धासाठी सज्ज राहावे लागणार आहे- जे बुद्धिमान, हायब्रिड आणि बहु-डोमेन युद्ध असेल. देशाचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्याला तंत्रज्ञानातील नवोप्रक्रम, एकसंधता कायम ठेवण्याची आणि त्यावर प्रभुत्व मिळवण्याची गरज आहे, जे भविष्यातील युद्धाचे स्वरूप ठरवेल.”

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleIndian Air Force Strengthens Technology, Joint Operations and Theatre Readiness
Next articleDefence Ministry Emphasizes Speed, Self-Reliance, and Industry Collaboration in Procurement Reforms

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here