सुरक्षिततेच्या मुद्द्यांचा हवाला देत तैवानचा नवीन चिनी विमानतळावर आक्षेप

0
पुढील वर्षी तैवानच्या सुविधेपासून 10 किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर सुरू होणाऱ्या नवीन विमानतळाबद्दल चीनने कोणतीही माहिती दिलेली नसल्याचा खुलासा तैवानच्या नागरी विमान वाहतूक प्रशासनाने बुधवारी केला. यामुळे उड्डाण सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे.

चीनच्या झियामेन शहरातील नवीन झियांग’आन विमानतळ तैवानच्या नियंत्रणाखालील किनमेन बेटांपासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे जिथे तैवानच्या बाजूने बांधकामविषयक घडामोडी स्पष्टपणे बघता आणि ऐकता येत आहेत.

तैवानने माहिती मागितली

रॉयटर्सला पाठवलेल्या लेखी निवेदनात, तैवानच्या नागरी विमान वाहतूक प्रशासनाने म्हटले आहे की एकमेकांच्या इतक्या जवळ असलेल्या विमानतळांना सुरळीतपणे कामकाज आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सविस्तर प्रगत नियोजन आणि समन्वय आवश्यक आहे.

प्रशासनाने चीनला विद्यमान संपर्क माध्यमांद्वारे शियांग’आन विमानतळाचा किनमेन विमानतळावर होणाऱ्या परिणामाचे मूल्यांकन करण्यासाठी नियोजन माहिती देण्याची विनंती केली असल्याचे त्यात म्हटले आहे. मात्र चीनच्या नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. नवीन विमानतळ त्याच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करत नाही किंवा त्यावर परिणाम करत नाही याची खात्री करणे चीनचे कर्तव्य आहे यावर तैवानने भर दिला.

किनमेन विमानतळावरून बहुतेकदआ देशांतर्गत उड्डाणे केली जातात, अर्थात कधीकधी आंतरराष्ट्रीय चार्टरही असतात.

चीनचे सरकार तैवानचे अध्यक्ष लाई चिंग-ते यांच्याशी बोलण्यास नकार देत आहे, कारण ते त्यांच्या दृष्टीने “अलिप्ततावादी” आहेत.

हवाई सुरक्षेसाठी समन्वयाचे आवाहन

तैवानच्या अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे की पुढील वर्षाच्या सुरुवातीला राबविल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या विकास योजनेअंतर्गत चीन किनमेनवर आर्थिक नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करू शकतो आणि त्या योजनेचा संभाव्य भाग म्हणून झियामेनच्या या विमानतळाचा उपयोग करून घेऊ शकतो.

तैवान आणि चीनमध्ये तैवानच्या किनाऱ्यावरील बेटांभोवतीच्या उड्डाण सुरक्षेवरून यापूर्वीही संघर्ष झाला आहे, ज्यामध्ये संवेदनशील तैवान सामुद्रधुनीमध्ये चीनने नवीन उड्डाण मार्ग उघडल्याबद्दलच्या संघर्षाचा समावेश आहे. तैपेईने सल्लामसलत न करता चीनने एकतर्फी पावले उचलल्याचा निषेध केला होता.

1949 मध्ये माओ त्से तुंगच्या कम्युनिस्टांशी झालेल्या गृहयुद्धात पराभूत झालेले चीन प्रजासत्ताक सरकार तैपेईला पळून गेल्यापासून, चीनच्या किनमेन आणि मात्सु बेटांवर तैवानचे नियंत्रण आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleन्यूयॉर्कमध्ये ममदानी यांचा विजय, डेमोक्रॅट्सना इतर ठिकाणांवरही फायदा
Next articleDefence Export: India’s Next Big Push Toward Global Influence and Self-Reliance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here