नेपाळः नऊ कम्युनिस्ट पक्षांचे विलीनीकरण पण नेतृत्व खंबीर नाही

0
“आपण सर्वांनी एका वेगळ्या पद्धतीने विचार करूया. सर्व कम्युनिस्टांसाठी एक समान व्यासपीठ कोणते याचा शोध घेऊ या आणि एकमेकांना कमी न लेखता पुढे जाऊया.”

नेपाळचे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते झलनाथ खनाल हे यापेक्षा जास्त स्पष्ट बोलू शकले नसते. नेपाळच्या डझनभर कम्युनिस्ट पक्षांनी एकमेकांना कमी लेखण्यात जितका वेळ घालवला आहे तितकाच वेळ त्यांनी त्यांच्या असत्य कथनात घालवला आहे हे उशिरा कबूल केले आहे.

याचे एक उदाहरण म्हणजे माओवादी नेते प्रचंड (पुष्प कमल दहल) आणि सीपीएनचे (यूएमएल)  केपी शर्मा ओली यांच्यातील स्पर्धा. भूतकाळात दोघांनीही एकमेकांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. याचे अगदी अलिकडचे उदाहरण म्हणजे 2023 मध्ये जेव्हा ओली यांनी पंतप्रधान प्रचंड यांचा पाठिंबा काढून घेतला आणि नेपाळी काँग्रेसचे वैचारिक शत्रू शेर बहादूर देउबा यांच्याशी हातमिळवणी केली.

पण बुधवारी काठमांडूमध्ये प्रचंड यांना नव्या एकीकृत नेपाळी कम्युनिस्ट पक्षाचा नेता म्हणून घोषित करण्यात आले. त्यांचे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे सहकारी अनुक्रमे माधव नेपाळ आणि खनाल आहेत. हे दोघेही पूर्वी सीपीएनचे (युनिफाइड सोशालिस्ट) सदस्य होते.

नवीन नेपाळी कम्युनिस्ट पक्षामध्ये नऊ इतर फुटलेले कम्युनिस्ट पक्ष आणि गट (सीपीएन-माओवादी, सीपीएन-युनिफाइड सोशलिस्ट, नेपाळ कम्युनिस्ट पार्टी, सीपीएन-सोशलिस्ट, नेपाळ सोशलिस्ट पार्टी, जनसमाजवादी पार्टी, सीपीएन-माओवादी सोशलिस्ट, सीपीएन कम्युनिझम, सीपीएन-माओवादी आणि देशभक्त समाजवादी मोर्चा) एकत्र आले आहेत.

काठमांडू पोस्टमधील एका वृत्तात असे नमूद केले आहे की “विलीन झालेल्या अनेक गटांना तळागाळातील वर्गाकडून अपेक्षित जनाधार नाही आणि त्यामुळे नव्याने तयार झालेल्या पक्षाचा तात्काळ प्रभाव आणि परिणामकारतेबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.”

ओली यांची अनुपस्थिती मात्र नजरेत भरणारी होती. अर्थात त्यांचा पक्ष सीपीएन (यूएमएल) इतर कम्युनिस्ट पक्षांमध्ये सर्वात मोठा आहे. ते नंतर यात सामील होतील का? याबद्दल अजूनही स्पष्टता नाही. परंतु सप्टेंबरमध्ये नेपाळला हादरवून टाकणाऱ्या जेएनझेड निदर्शनांमुळे त्यांचा पक्ष सत्तेतून बाहेर पडला.

रस्त्यांवर सुरू असणाऱ्या आंदोलनातील रोषापासून वाचण्यासाठी ओली यांना राजीनामा देऊन पळून जावे लागले. अर्थात राजकारणी निर्ढावलेले असले तरी हा अपमान आयुष्यभर त्यांच्यासोबत राहील.

या आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी काही स्पष्ट कारणांमुळे या एकीकरण प्रक्रियेपासून दूर राहणे पसंत केले आहे. अर्थात त्यांना असे वाटते की ते एखादे पद मिळण्यास पात्र असूनही त्यांना ते नाकारण्यात आले आहे.

अर्थात हे देखील खरे आहे की यापैकी बरेच नेते राजकीयदृष्ट्या स्वतःला घडविण्यात अयशस्वी झाले असून कदाचित नवीन पक्ष त्यांचे राजकीय भविष्य पुन्हा जिवंत करू शकेल अशी त्यांना आशा आहे.

मात्र डाव्या शक्तींचे असे एकीकरण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. 2018 मध्ये माओवादी आणि सीपीएन (यूएमएल) एकत्र आले होते पण अवघ्या तीन वर्षांनंतर त्यांच्यात फाटाफूट झाली.

नवीन नेपाळी कम्युनिस्ट पक्षाला आता भविष्यात ओलींसोबत जर कोणत्याही वाटाघाटी करण्याची गरज वाटली तरी त्यात प्रचंड यांनाच फायदा मिळणार आहे. अर्थात सध्या तिथली एकमेव समस्या म्हणजे Gen Z कडून होत असलेला निषेध म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षाच्या पहिल्या फळीत स्वतःला प्रस्थापित करणाऱ्या अनुभवी नेत्यांच्या राजकारणाला मिळत असलेला नकार.

त्या अर्थाने, नेपाळी कम्युनिस्ट पक्षात वयस्कर आणि पहिल्या फळीत त्यांच्या अनेक बदनाम नेत्यांचा भरणा असलेला दिसतो, ज्यामध्ये प्रचंड यांचाही समावेश आहे. पक्षाच्या स्थापनेसोबत “नेपाळी वैशिष्ट्यांसह वैज्ञानिक समाजवाद” बद्दल सुपरिचित घोषणा देण्यात आल्या. त्याचा नेमका अर्थ काय होता हे स्पष्ट करण्यात आले‌ नाही.

प्रचंड याकडे संधी म्हणून पाहतात हे नाकारता येत नाही: तरुण कार्यकर्त्यांनी जुन्या नेत्यांना बाजूला होण्याचे आवाहन केले असले तरी ते 5 मार्च रोजी होणाऱ्या निवडणुका लढवतील असे ते म्हणतात. त्यांचा पक्ष सीपीएन (यूएमएल) सोबत युती करू शकतो. त्याचप्रमाणे, नंतरचा पक्ष त्यांच्या माजी नेपाळी काँग्रेस भागीदाराशी युती करू शकतो.

एक मात्र नक्की की गोष्टी जितक्या मोठ्या प्रमाणात वरवर बदलताना दिसत असल्या तरी मूलभूत परिस्थिती मात्र जैसे थेच राहणार आहे.

सूर्या गंगाधरन

+ posts
Previous articleभारतीय नौदलाच्या ताफ्यात ‘ईक्षक’चा समावेश, जलमापनक्षेत्रात नवा अध्याय
Next articleअमेरिकन शटडाऊनचा 40 प्रमुख विमानतळांना फटका, उड्डाणांमध्ये घट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here