ईशान्य भारतात प्रथमच हवाई दलाच्या भव्य-दिव्य ‘एअर शो’चे आयोजन

0

या आठवड्याच्या अखेरीस, गुवाहाटीच्या आकाशात हवाई गर्जना अनुभवायला मिळणार आहे, कारण भारतीय हवाई दल (IAF) प्रथमच ईशान्य भारतात आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे भव्य प्रदर्शन करणार आहे. भारतीय हवाई दलाच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त, लचित घाट येथे पूर्व हवाई कमांड (ईस्टर्न एअर कमांड) द्वारे या एअर शोचे आयोजन करण्यात येणार आहे, ज्याला विशाल ब्रह्मपुत्रा नदीची नयनरम्य पार्श्वभूमी लाभणार आहे.

पुढील दोन दिवसांत, या प्रदेशात एक अभूतपूर्व हवाई सोहळा अनुभवायला मिळणार आहे, ज्यामध्ये 75 पेक्षा जास्त विमाने आणि 25 हून अधिक हेलिकॉप्टर्स समन्वयित संरचनांमध्ये कसरत करताना दिसतील. या हवाई कवायतींमध्ये, अत्याधुनिक राफेल (Rafale) जेट पासून ते सुखोई-30 MKI, अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आणि प्रचंड आकाराच्या IL-78 मिड-एअर रिफ्यूलर्स (हवेत इंधन भरणारे विमान) सहभागी होतील. हा एअर शो म्हणजे गती, शक्ती आणि अचूकता यांचा दुर्मिळ संगम असेल.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रविवारी, या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहतील, त्यावेळी त्यांच्यासोबत एअर मार्शल सुरत सिंग, पूर्व हवाई कमांडचे कमांडिंग-इन-चीफ देखील असतील.

संरक्षण जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल महेंद्र रावत म्हणाले की, “ईशान्य भारतात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या स्तरावार हवाई दलाचे सादरीकरण होत आहे. यामध्ये हवाई दलातील जवळजवळ सर्व प्रकारची विमाने आणि हेलिकॉप्टर्स आकाशात झेपावतील आणि त्यांच्या थक्क करणाऱ्या कवायती सादर करतील, यानिमित्ताने स्थानिक लोकांना आमच्या ‘आकाश योद्ध्यां’चे थेट दर्शन घडेल.”

या हवाई कसरतींध्ये आघाडीची लढाऊ विमाने, वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर एकाच लयीत उडताना दिसतील, ज्याद्वारे वेग, कौशल्य आणि अचूक समन्वयाची एक सुरेख सुरावट अनुभवायला मिळेल. हे केवळ हवाई दलाचे शक्तिप्रदर्शन नसून, ईशान्य भारतातील तरूणांच्या मनात प्रेरणा जागृत करणे हे याचे उद्दिष्ट आहे. यानिमित्ताने, तरूण पिढीमध्ये हवाई दलातील करिअरच्या संधी, देशभक्ती, शिस्त आणि सेवाभावाचे बीज रोवण्याचा IAF चा प्रयत्न आहे.

“हा केवळ शक्ती प्रदर्शनाचा कार्यक्रम नसून, तरुणांना प्रेरित आणि प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न आहे,” असे लेफ्टनंट कर्नल रावत यांनी सांगितले. “ब्रम्हपुत्रा नदीच्या दोन्ही काठांवर प्रेक्षकांसाठी विशेष जागा निश्चित करण्यात आल्या आहेत, जेणेकरून लोकांना जवळून या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल.”

मंगळवारपासून सुरू झालेल्या सराव उड्डाणांनीच, गुवाहाटीतील नागरिकांमध्ये उत्साह निर्माण केला आहे. जेट विमानांच्या गर्जना आणि आकाशातील झेपांमुळे संपूर्ण शहर उत्साहित झाले आहे. ‘फ्लाइंग डिस्प्ले 2025’ मुख्य कार्यक्रमाचे आयोजन, शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी दुपारी 12.30 ते 2 दरम्यान करण्यात आले आहे. यावेळी लढाऊ विमाने सात हवाई तळांवरून उड्डाण करतील, ज्यात गुवाहाटी, तेजपूर, जोरहाट, चाबुआ, हासीमारा, बागडोग्रा आणि पनागढचा समावेश आहे.

या कार्यक्रमात राफेल, सुखोई-30, मिग-29, मिराज 2000, जग्वार, अपाचे, IL-78, C-17 ग्लोबमास्टर, C-130 हरक्युलीस, MI-17, अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर Mk-I, अँटोनोव्ह AN-32 आणि प्रसिद्ध सूर्यकिरण अॅरोबॅटिक टीम, हे भारतीय हवाई दलाचे शक्तीशाली योद्धे प्रेक्षकांना थक्क करणारा एक अविस्मरणीय अनुभव देणार आहेत.

भारतीय हवाई दलाने नागरिकांना ‘X’ (एक्स) पोस्टद्वारे आमंत्रण दिले आहे:

“भारतीय हवाई दलाच्या 93व्या वर्धापन दिनानिमित्त, आम्ही तुम्हाला ‘IAF फ्लाइंग डिस्प्ले 2025’ मध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण देतो. आकाशातील हवाई दलाची शक्ती आणि अचूकता प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी तयार राहा.”

जेव्हा फायटर जेट्सच्या इंजिनांचे आवाज आकाशात घुमतील आणि ब्रह्मपुत्रेच्या आकाशात विमानांच्या धवल रेषा उमटतील, तेव्हा गुवाहाटी फक्त एक एअर शो नव्हे, तर एक नवा इतिहास रचताना पाहत असेल.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleChina Commissions Aircraft Carrier Fujian, Signalling Its Three-Carrier Era and Growing Naval Ambitions
Next articleHAL–GE Engine Deal Signed as Delays Cloud LCA Tejas Deliveries and Export Prospects

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here