फिलिपाइन्स: ब्राम्होस क्षेपणास्त्राच्या बॅटरीचे अनावरण, भारताचा वाढता प्रभाव

0

फिलिपाइन्स मरीन कॉर्प्सने (PMC) आपल्या 75व्या वर्धापनदिनानिमित्त, आपल्या पहिल्या ऑपरेशनल ब्राम्होस किनारी क्षेपणास्त्र बॅटरीचे औपचारिकरित्या अनावरण केले. या विशेष तैनातीमुळे मनिलाच्या किनारी संरक्षण आधुनिकीकरणात एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेला असून, यामुळे “मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड” या उपक्रमांतर्गत भारताच्या संरक्षण निर्यातीतील महत्वही अधोरेखित झाले आहे.

नव्याने तैनात केलेले, हे किनारी जहाजविरोधी क्षेपणास्त्र (शोर-बेस्ड अँटी-शिप मिसाईल- SBASM) मरीन कॉर्प्सच्या कोस्टल डिफेन्स रेजिमेंटचा भाग आहे. ही क्षेपणास्त्र बॅटरी झांबाल्स, वेस्टर्न लुझोन येथे तैनात करण्यात आली आहे, जे स्कारबरो शोलच्या अगदी जवळ आहे, हा भाग दक्षिण चीन समुद्रातील वारंवार तणाव निर्माण होणारा भाग म्हणून ओळखला जातो.

प्रेसिडेन्शियल ब्रॉडकास्ट सर्व्हिस (RTVM) यांनी प्रसिद्ध केलेल्या दृश्यांमध्ये या बॅटरीची संपूर्ण मांडणी दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये मोबाईल लॉंचर्स, कमांड वाहनं, रीलोडर ट्रक्स आणि सहाय्यक घटक यांचा समावेश आहे.

फिलिपाइन्सच्या आधुनिकीकरण मोहिमेतील महत्वाचा टप्पा

ही तैनाती जानेवारी 2022 मध्ये, भारत-रशिया संयुक्त उपक्रमांतर्गत ‘ब्राम्होस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडसोबत’ झालेल्या 374.96 दशलक्ष डॉलर्सच्या कराराचा भाग आहे. या करारात, ब्राम्होस किनारी जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणालीच्या तीन पूर्ण क्षमतेच्या बॅटरींचा समावेश आहे, ज्यातील पहिली बॅटरी एप्रिल 2024 मध्ये, फिलिपाइन्सला पोहोचली असून, उर्वरित प्रणालींच्या पुरवठ्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रत्येक बॅटरीमध्ये दोन मोबाईल स्वयंचलित लाँचर्स, एक रडार वाहन, एक कमांड आणि नियंत्रण युनिट, आणि एक मिसाईल रिलोडरचा यांचा समावेश असतो. या प्रणालीमुळे फिलिपाइन्स मरीन कॉर्प्सला  विश्वासार्ह सागरी हल्ला क्षमता प्राप्त झाली आहे. प्रत्येक लाँचरमध्ये दोन ब्राम्होस क्षेपणास्त्रे असतात, तर रीलोडर वाहनात अतिरिक्त चार राउंड्स तैनात असतात.

ब्राम्होस हे जगातील सर्वात वेगवान आणि विश्वसनीय क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. ते मॅक 2.8 (ध्वनीच्या सुमारे 2.8 पट वेगाने) क्षमतेने उड्डाण करू शकते आणि सुमारे 290 किमी अंतरावरील लक्ष्यावर अचूक प्रहार करू शकते. हे क्षेपणास्त्र जमीन, समुद्र, हवाई आणि पाणबुडी प्लॅटफॉर्मवरून प्रक्षेपित करता येते, ज्यामुळे त्याच्या वापरकर्त्याला लक्षणीय ऑपरेशनल लवचिकता प्राप्त होते.

दक्षिण चीन समुद्रातील प्रतिबंधक क्षमता वाढवणे

देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर, पहिली ब्राम्होस क्षेपणास्त्र बॅटरी तैनात केल्यामुळे फिलिपाइन्सच्या प्रतिबंधक क्षमतेत मोठी भर पडली आहे, तसेच तिच्या बहुस्तरीय किनारी संरक्षण रचनेच भर पडते. या तैनातीमुळे, पश्चिम फिलिपाइन्स समुद्रातील सततच्या तणावादरम्यान, जिथे देशाला वाढत्या चिनी आक्रमकतेचा सामना करावा लागत आहे, तेथील मनिलाच्या सागरी जागरूकता आणि जलद प्रतिसाद क्षमतेलाही बळकटी मिळते. 

फिलिपाइन्स मरीन कॉर्प्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ब्राम्होस प्रणाली ही देशाच्या संरक्षण आणि प्रतिबंधक मोहिमेचा मुख्य घटक असेल. ती फिलिपाइन्स सशस्त्र दलाच्या (AFP) आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत इतर निगराणी आणि हल्ला प्रणालींसोबत एकत्रितपणे कार्य करेल.”

भारताच्या संरक्षण निर्यातीतील यशाचा टप्पा

फिलिपाइन्सने ब्राम्होस क्षेपणास्त्र कार्यान्वित करणे, हे भारताच्या निर्यातीमधील मोठे यश आहे, तसेच नवी दिल्लीच्या संरक्षण तंत्रज्ञान पुरवठादार म्हणून वाढत्या क्षमतेचे प्रतीक आहे. रशियाच्या P-800 ओनिक्सपासून प्रेरित ब्राम्होस क्षेपणास्त्राने, गेल्या काही वर्षांत देशांतर्गत विकसित झालेली सर्वोत्तम प्रणाली म्हणून प्रगती केली आहे, ज्यातील बहुतांशी घटक हे भारतीय संरक्षण उद्योगातून उत्पादित करण्यात आले आहेत.

या यशामुळे, विश्वसनीय सामरिक भागीदार आणि निर्यातदार म्हणून भारताची प्रतिमा अधिक बळकट झाली आहे. ब्राम्होस एरोस्पेसने, अन्य दोन देशांसोबत अंदाजे $450 दशलक्ष मूल्याचे अतिरिक्त निर्यात करार केले असून, त्या देशांची नावे मात्र उघड केलेली नाहीत. आसियान आणि अन्य राष्ट्रे जसे की इंडोनेशिया, थायलंड, व्हिएतनाम या प्रणालीचे मूल्यमापन करत आहेत, तसेच लॅटिन अमेरिका आणि मध्यपूर्वेच्या देशांकडूनही याबाबत चौकशी सुरू आहे.

धोरणात्मक परिणाम

फिलिपाइन्सकडून झालेली ब्राम्होसची तैनाती, हा केवळ एक खरेदीचा टप्पा नाही, तर एक मजबूत सामरिक संदेश आहे. यामुळे भारत–फिलिपाइन्स संरक्षण भागीदारीला चालना मिळाली असून, इंडो-पॅसिफिकमधील सुरक्षा समन्वयही दृढ होत आहे, जिथे सागरी लोकशाही असलेले देश, दबाव टाकणाऱ्या वर्तनाविरुद्ध प्रतिबंधक क्षमता बळकट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

भारतासाठी, हे संरक्षण औद्योगिक सहकार्य प्रादेशिक स्थिरता निर्माण करण्यासाठी, भागीदारी वाढविण्यास आणि उच्च-तंत्रज्ञान निर्यातीसाठी नवीन बाजारपेठ उघडण्यासाठी एक धोरणात्मक साधन कसे असू शकते याचे प्रात्यक्षिक म्हणून काम करते. तर, फिलिपाइन्ससाठी जगातील सर्वाधिक विवादित सागरी प्रदेशांपैकी एका क्षेत्रात, विश्वसनीय किनारी संरक्षण क्षमता तयार करण्याची ही महत्वाची संधी आहे.

थोडक्यात, झांबालेसमधील ब्राह्मोसच्या तैनातीमुळे केवळ फिलिपाइन्सची किनारी संरक्षण पोहोच वाढत नाही तर, इंडो-पॅसिफिकमध्ये एक विश्वासार्ह संरक्षण भागीदार म्हणून भारताचे स्थानही मजबूत होते. ही तैनाती तंत्रज्ञान, प्रतिबंधकता आणि राजनयिकता यांना एकत्र जोडते.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleAsim Munir’s Constitutional Coup: Pakistan’s Army Tightens Grip on Power
Next articleMalabar Naval Exercise 2025 Kicks Off Amid Shifting Indo-Pacific Equations

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here