मलबार नौदल सराव 2025: इंडो-पॅसिफिकमधील बदलत्या समीकरणांचे प्रतीक

0

इंडो-पॅसिफिकमधील सर्वात महत्त्वपूर्ण बहुराष्ट्रीय सागरी सरावांपैकी एक असलेल्या, ‘मलबार नौदल सरावाच्या’ 29 व्या आवृत्तीचा, पश्चिम पॅसिफिक महासागरातील अमेरिकेच्या गुआम या महत्त्वाच्या लष्करी तळावर प्रारंभ झाला. 10 ते 18 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या नऊ दिवसीय सरावात, ‘क्वाड’ (Quad) समूहाचे चार सदस्य देश- भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांची नौदले सहभागी झाली आहेत.

भारतीय नौदलाचे मार्गदर्शित क्षेपणास्त्रसज्ज जहाज ‘INS सह्याद्री’, या सरावात अमेरिकेच्या ‘USS फिट्झगेराल्ड’, ऑस्ट्रेलियाच्या ‘HMAS बॅलेरॅट’ आणि जपानच्या हेलिकॉप्टर विध्वंसक ‘JS ह्युगा’ यांसोबत सहभागी झाले आहे. भारतीय नौदलाने रविवारी, ‘INS सह्याद्री’ गुआमला पोहोचल्याची पुष्टी केली आणि सांगितले की, ही तैनाती भारताच्या दीर्घकालीन सागरी भागीदारीचे प्रतीक आहे तसेच ही उपस्थिती प्रादेशिक सुरक्षेला बळकटी देण्यासाठी परस्पर कार्यक्षमतेत वाढ घडवण्याच्या भारताच्या बांधिलकीचे पुनरुच्चारण करते.

या सरावाचा हार्बर टप्पा 10–12 नोव्हेंबरदरम्यान होणार असून, त्यामध्ये- ऑपरेशनल नियोजन, संवाद समन्वय, क्रॉस-डेक ओळख आणि अन्य क्रीडा उपक्रमांवर भर दिला जाईल. तर याचा समुद्री टप्पा 13–17 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार असून, त्यामध्ये- संयुक्त फ्लीट ऑपरेशन्स, पाणबुडीविरोधी युद्ध सराव, तोफखाना प्रशिक्षण आणि एकत्रित हवाई ऑपरेशन्ससारख्या गुंतागुंतीच्या नौदल कसरती घेतल्या जातील.

सामरिक संदर्भ आणि महत्त्व

या वर्षीचा मलबार सराव विशेष महत्त्वाचा आहे, कारण गेल्या महिन्यात ‘अमेरिका आणि भारताने प्रमुख संरक्षण भागीदारीसाठी नवीन फ्रेमवर्क’ करारावर स्वाक्षरी केल्यानंतरचे, भारत आणि अमेरिका यांच्यातील हे पहिले मोठे लष्करी सहकार्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे अमेरिकन समकक्ष पीट हेगसेथ यांनी 31 ऑक्टोबर रोजी, मलेशियामध्ये झालेल्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान, या कराराला अंतिम रूप दिले होते. “संरक्षण हा द्विपक्षीय संबंधांचा प्रमुख आधारस्तंभ राहील” यावर त्यांनी शिक्कामोर्तबही केले.

अलीकडील द्विपक्षीय व्यापार तणाव आणि वॉशिंग्टनने इंडो-पॅसिफिक धोरणात केलेले फेरबदल, या पार्श्वभूमीवरही, नवी दिल्लीने मलबार सरावासारख्या व्यासपीठांद्वारे परस्पर लष्करी सहकार्य सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध राजकीय उलथापालथीपासून दूर राहतील, असा स्पष्ट संदेश यातून मिळतो.

दरम्यान, अमेरिकेच्या F-35 फायटर्स आणि B-1 बॉम्बर्ससह, ग्वाल्हेरमध्ये होणारा ‘कोप इंडिया’ (Cope India) हवाई युद्ध सराव स्थगित करण्यात आला आहे. त्याऐवजी, अमेरिकेने भारतीय हवाई दलासोबत मर्यादित “बॉम्बर एकत्रीकरण उड्डाण सराव” करण्यासाठी एक B-1 बॉम्बर तैनात केला आहे.

क्वाड सहकार्याचे बदलते स्वरूप

1992 मध्ये, भारत-अमेरिका यांच्यात द्विपक्षीय सराव म्हणून सुरू झालेला ‘मलबार सराव’, आता क्वाड समूहाच्या सागरी समन्वयाचे प्रतीक बनला आहे. यामध्ये सहभागी झालेले चारही देश, प्रगत सागरी गस्त आणि पाणबुडीविरोधी विमाने चालवतात, जी रिअल-टाइम डेटा शेअर करून समुद्रात एकत्रित ऑपरेशनल हालचाली करण्यास सक्षम आहेत. त्यांचे सुसंगत आणि कार्यक्षम प्लॅटफॉर्म्स आणि संवाद प्रणाली, सामायिक सुरक्षा आव्हानांना एकत्रितपणे तोंड देण्याची सामूहिक क्षमता दर्शवतात.

बीजिंग आजही मलबार सरावाचा उल्लेख “चीनविरोधी” उपक्रम असा करते, परंतु सहभागी देश या दाव्याला नाकारतात. तथापि, हा सराव इंडो-पॅसिफिकमधील चीनच्या आक्रमक धोरणांना प्रत्युत्तर देण्यासाठी क्वाडची वाढती एकजूट स्पष्टपणे दर्शवतो. दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रापासून ते भारतासोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत (LAC) बीजिंगच्या ‘ग्रे-झोन’ डावपेचांविषयी भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश गंभीर चिंतेत आहेत.

गेल्या वर्षीचा मलबार सराव, जो भारताने विशाखापट्टणमच्या किनाऱ्यावर आयोजित केला होता, तो आतापर्यंतच्या सरावांपैकी सर्वात व्यापक स्वरूपाचा होता. मात्र, 2025 मधील सराव गुआम येथे आयोजित केल्यामुळे, या कार्यात्मक खोलीचा विस्तार पॅसिफिक महासागरापर्यंत झाला आहे, ज्यामुळे ट्रम्प प्रशासनाअंतर्गत वॉशिंग्टनमध्ये राजकीय संकेत बदलत असतानाही, क्वाड समूहाची सागरी एकात्मता अधोरेखित होते.

मलबार सराव पुढे नेण्याचा निर्णय घेत, भारत आणि त्याच्या भागीदार देशांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे की : ‘सामरिक विश्वास’ आणि ‘सागरी सहकार्य’ हे इंडो-पॅसिफिक स्थिरतेचे आधारस्तंभ आहेत, जे काही काळापुरत्या आलेल्या राजकीय वाऱ्यांपलीकडेही ठामपणे टिकून राहतील.

मूळ लेखक- रवी शंकर

+ posts
Previous articleभारतात आश्रय दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत हसीनांची युनूस यांच्यावर टीका
Next articleपाकिस्तानची 27 वी घटनादुरुस्तीः मार्शल लॉला आता कायदेशीर मान्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here