व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात, नॅशनल गार्डचे दोन सैनिक जखमी

0
व्हाईट हाऊसजवळ

बुधवारी, वॉशिंग्टनच्या डाऊन टाऊनमधील व्हाईट हाऊसजवळ झालेल्या गोळीबारात, नॅशनल गार्डचे दोन सैनिक गंभीर जखमी झाले. अधिकाऱ्यांनी या घटनेचे वर्णन ‘ठरवून केलेला हल्ला’ (केंद्रित हल्ला) असे केले असून, या हल्ल्यात गोळी लागल्याने जखमी झालेला एक संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या दोन अधिकाऱ्यांनी, नाव उघड न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, तपासकर्त्यांनी संशयित व्यक्तीची ओळख पटवली असून, तो वॉशिंग्टनमध्ये राहणारा 29 वर्षीय अफगाण नागरिक रहमानुल्लाह लकनवाल आहे. हा हल्ला दहशतवादी कृत्याच्या दृष्टीकोनातूनही तपासला जात असल्याचे, एका अधिकाऱ्याने सांगितले.

दुसऱ्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, लकनवाल हा 2021 मध्ये ‘ऑपरेशन अलाइज वेलकम’ अंतर्गत अमेरिकेत आला होता. हा बायडेन यांच्या कार्यकाळात सुरू झालेला एक असा उपक्रम होता, ज्यामध्ये अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेला मदत करणाऱ्या आणि अमेरिकेच्या माघारीनंतर सत्ताधारी तालिबानकडून सूडाच्या कारवाईला बळी पडण्याची शक्यता असलेल्या हजारो अफगाण लोकांना पुन्हा स्थायिक केले जात होते. त्याचवर्षी 8 सप्टेंबर रोजी, वॉशिंग्टन डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याची प्रक्रिया पूर्ण झाली.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, लकनवालने डिसेंबर 2024 मध्ये आश्रयासाठी अर्ज केला होता आणि त्याचवर्षी 23 एप्रिल रोजी, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तीन महिन्यांच्या कावधीनंतर त्याला मंजूरी मिळाली. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही.

या हल्ल्याच्या वेळी, फ्लोरिडा येथील आपल्या रिसॉर्टवर असलेले ट्रम्प यांनी बुधवारी रात्री उशिरा, आधीच रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ जारी केला, ज्यात या गोळीबाराला “वाईट कृत्य, द्वेषाची आणि दहशतवादी कृत्य” म्हटले. त्यांनी सांगितले की, त्यांचे प्रशासन जो बायडेन यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अमेरिकेत आलेल्या सर्व अफगाणांची “पुन्हा तपासणी” करेल.

स्थलांतर (इमिग्रेशन) धोरण

वेस्ट व्हर्जिनिया नॅशनल गार्डचे हे दोन सैनिक, व्हाईट हाऊसपासून काही ब्लॉक्स दूर असलेल्या 17 व्या आणि आय स्ट्रीट्सच्या कोपऱ्याजवळ दुपारी सुमारे 2:15 (1915 GMT) च्या सुमारास ‘उच्च-दृश्यमानता गस्त’ देण्याचे काम करत होते. मेट्रोपोलिटियन पोलीस सहाय्यक प्रमुख जेफ कॅरोल, यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘संशयित व्यक्ती एका कोपऱ्यातून आला आणि त्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला.”

“दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्यानंतर, इतर नॅशनल गार्ड सैनिकांनी हल्लेखोराला पकडले,” असे त्यांनी सांगितले. एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी सांगितले की, “जखमी झालेले दोन सैनिक सध्या स्थानिक रुग्णालयात गंभीर अवस्थेत आहेत.”

“हा एक टार्गेटेड हल्ला आहे,” असे वॉशिंग्टनच्या महापौर म्युरिएल बाउझर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, हल्लेखोराने एकट्यानेच हा हल्ला केल्याचे दिसत आहे.

‘दरम्यान, ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये, आणखी 500 गार्ड सैनिक तैनात करण्याचे आदेश दिले आहेत,’ अशी माहिती संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी पत्रकारांना दिली. ट्रम्प यांच्या वादग्रस्त स्थलांतर (इमिग्रेशन) आणि गुन्हेगारी विरोधी कारवाईचा भाग म्हणून, शहरात आधीच सुमारे 2,200 सैनिक तैनात आहेत, जे डेमोक्रॅटिक नेतृत्वाखालील शहरांवर लक्ष ठेवून आहेत.

अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स, जे बुधवारी केंटकीमध्ये होते, त्यांनी एक्स (X) वर पोस्ट करून सांगितले की, “या गोळीबाराच्या घटनेने, ट्रम्प प्रशासनाचे इमिग्रेशन धोरण योग्य असल्याचे सिद्ध केले आहे.”

“आपल्या देशात राहण्याचा हक्क नसलेल्या लोकांना परत पाठवण्याचे आमचे प्रयत्न वाढवण्याची गरज आहे,” असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.

ट्रम्प प्रशासनाच्या इमिग्रेशन धोरणावरील टीकाकार म्हणतात की, “या धोरणात अवैध, कठोर डावपेच वापरले गेले आहेत आणि त्यात कोणतेही गुन्हेगारी रेकॉर्ड नसलेल्या तसेच कायदेशीररित्या इथे राहणाऱ्या स्थलांतरितांनाही यामध्ये अंदाधुंदपणे कोंडीत पकडले गेले आहे.”

गोंधळाचे दृश्य

व्हाईट हाऊसपासून काही ब्लॉक्सवर असलेले, कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे आवडते जेवणाचे ठिकाण असलेल्या, फॅरगट स्क्वेअरवळ हा गोळीबार झाला. सुट्ट्यांच्या काळात इथल्या पार्कमधील दिव्याचे खांब सजवण्यात आले आहेत , आणि त्याच्या बाजूला फास्ट-कॅज्युअल रेस्टॉरंट्स, कॉफी शॉप तसेच दोन मेट्रो स्टॉप आहेत.

गोळीबारानंतर पादचारी लोकांमध्ये गोंधळ उडाला, त्यामुळे ते रस्त्यावर पळू लागले आणि गोंधळ अधिकच वाढला, असे वर्णन प्रत्यक्षदर्शींनी केले.

माईक रायन (55) यांनी सांगितले की, “ते जवळच दुपारचे जेवण घेण्यासाठी जात असताना त्यांना गोळीबाराचा आवाज ऐकू आला. ते लगेचच अर्धा ब्लॉक दूर पळत गेले आणि तिथे त्यांना पुन्हा गोळीबाराचा आवाज ऐकला.”

“मी जेव्हा घटनास्थळी परतलो, तेव्हा त्यांना रस्त्याच्या पलीकडे नॅशनल गार्डचे दोन सैनिक जमिनीवर पडलेले दिसले, लोक त्यापैकी एकाला उठवण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी, इतर गार्ड्सनी एका व्यकीला (हल्लेखोराला) जमिनीवर दाबून ठेवले होते,” असे रायन यांनी सांगितले.

आणखी एक साक्षीदार एमा मॅकडोनाल्ड यांनी सांगितले की, “गोळीबारानंतर काही मिनिटांतच एका सैनिकाला स्ट्रेचरवर नेत असताना त्यांनी पाहिले, त्याचे डोके रक्ताने माखलेले होते आणि त्याच्या छातीवर स्वयंचलित कॉम्प्रेशन सिस्टीम लावलेली होती.”

ट्रम्प यांनी ऑगस्टमध्ये, सैनिकांची प्राथमिक तैनाती केल्यापासून नॅशनल गार्डचे सैनिक वॉशिंग्टनमध्येच आहेत. या निर्णयाला स्थानिक अधिकाऱ्यांनी त्यावेळी विरोध केला होता आणि डेमोक्रॅट्सनी यावर टीका केली होती. शहरात तैनात असलेल्या गार्ड सैनिकांच्या तुकड्यांमध्ये डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया तसेच लुईझियाना, मिसिसिपी, ओहायो, दक्षिण कॅरोलिना, वेस्ट व्हर्जिनिया, जॉर्जिया आणि अलाबामा येथील तुकड्यांचा समावेश आहे.

रिपब्लिकन असलेल्या ट्रम्प यांनी वारंवार असे सुचवले आहे की, या तैनातीमुळे राजधानीतून गुन्हेगारी नाहीशी झाली आहे, मात्र त्यांचा हा दावा पोलीस विभागाच्या अधिकृत गुन्हेगारी आकडेवारीशी जुळत नाही.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleहाँगकाँगमध्ये भयानक अग्नितांडव; 44 जणांचा मृत्यू, 300 हून अधिकजण बेपत्ता
Next articleनवीन इंजिन MRO सुविधेसह, भारताच्या एअरोस्पेस क्षेत्रात फ्रान्सचा विस्तार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here