आर्यभट्ट ते गगनयान: भारत-रशिया अंतराळ सहकार्याचे यशस्वी अर्धशतक

0
भारत-रशिया

भारत-रशिया अंतराळ सहकार्य हे गेल्या पाच दशकांमध्ये, जगातील सर्वात महत्त्वपूर्ण भागीदारींपैकी एक म्हणून विकसीत झाले आहे. 1975 मध्ये, रशियाने (तत्कालीन सोव्हिएत युनियन) भारताचा पहिला उपग्रह, ‘आर्यभट्ट’, सोव्हिएत कॉसमॉस-3M रॉकेटमधून प्रक्षेपित केला, ज्यामुळे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. या पायाभूत कामगिरीनंतर, 1984 मध्ये सोयुझ T-11 मधून, राकेश शर्मा यांनी ऐतिहासिक उड्डाण केले, ज्यामुळे ते सोव्हिएत अंतराळ यानातून प्रवास करणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले.

या भागीदारीला अनेक आंतरराष्ट्रीय करारांद्वारे औपचारिक स्वरूप देण्यात आले, ज्यामध्ये शांततापूर्ण हेतूंसाठी अंतराळ संशोधन आणि उपयोगिता वाढवण्यासाठी ISRO आणि ROSCOSMOS यांनी स्वाक्षरी केलेल्या, 2015 च्या ऐतिहासिक सामंजस्य कराराचा (MoU) समावेश आहे. हा सामंजस्य करार उपग्रह नॅव्हिगेशन, प्रक्षेपण वाहन विकास, मानवी अंतराळ उड्डाणासाठी आवश्यक तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग, अंतराळ विज्ञान आणि ग्रहांच्या संशोधनात संयुक्त क्रियाकलाप विकसित करण्यासाठी संधी प्रदान करतो.

सध्याचे प्रमुख उपक्रम

भारताची ‘गगनयान’ मोहीम भारत-रशिया अंतराळ सहकार्याची सर्वोच्च कामगिरी मानली जाते. पंतप्रधान मोदींनी 2018 मध्ये घोषित केलेल्या 1.4 अब्ज डॉलर्सच्या (9,023 कोटी रुपयांच्या) या स्पेस प्रोग्रामचे उद्दिष्ट, तीन भारतीय क्रू सदस्यांना 400 किलोमीटर लो-अर्थ-ऑर्बिटमध्ये 3 ते 7 दिवसांच्या मोहिमेसाठी पाठवणे हे आहे. यामुळे भारत हा अमेरिका, रशिया आणि चीननंतर स्वतंत्र मानवी अवकाश क्षमता प्राप्त करणारा चौथा देश ठरू शकतो.

या मोहिमेसाठी रशिया अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण सहकार्य पुरवत आहे:

अंतराळवीर प्रशिक्षण: चार भारतीय अंतराळवीरांनी 2024 मध्ये, रशियाच्या गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रगत प्रशिक्षण पूर्ण केले असून, आणखीनही काही अंतराळवीर आपली तयारी पूर्ण करत आहेत.

स्पेससूट्स आणि लाइफ सपोर्ट: रशिया कस्टम सोकोल स्पेससूट्स, लाइफ-सपोर्ट सिस्टम आणि आपत्कालीन सुरक्षा उपकरणे पुरवत आहे.

तांत्रिक प्रणाली: रेडिएशन शील्डिंग, क्रू मॉड्यूल, रेंडेव्हस आणि डॉकिंग प्रणाली, तसेच फ्लाइट सूट्समधील रशियन कौशल्ये अंतराळयानाच्या क्षमता वाढवतात.

वैद्यकीय आणि उड्डाण प्रशिक्षण: ROSCOSMOS ची उपकंपनी असलेली ग्लॅव्हकॉसमॉस- सल्लागार सहकार्य, वैद्यकीय तपासणी आणि सर्वसमावेशक अंतराळ उड्डाण प्रशिक्षण पुरवते.

रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी 2024 मध्ये म्हटले होते की, “हे सहकार्य केवळ तंत्रज्ञान हस्तांतरणापुरते मर्यादित नसून, ते भारताच्या अंतराळ भविष्यासाठी पायाभरणी करण्याचे काम करत आहे, ज्यात संयुक्त उपक्रमांमधील खासगी क्षेत्राचा सहभाग आणि स्टार्ट-अप्सचा शोध समाविष्ट आहे.”

ग्लोनास-नाविक एकत्रीकरण

उपग्रह नॅव्हिगेशन प्रणालींसाठी आवश्यक केंद्रांची परस्परांच्या भूभागात स्थापना करणे, हा द्विपक्षीय अंतराळ सहकार्याचा एक मुख्य आधारस्तंभ आहे. ऑक्टोबर 2016 मध्ये स्वाक्षरी झालेल्या करारानुसार, रशियाने त्यांच्या ग्लोनास (जागतिक नॅव्हिगेशन उपग्रह प्रणाली) कडून संपर्क सिग्नल प्राप्त करण्यासाठी बेंगळुरूमध्ये एक केंद्र उभारले, तर ISRO ने रशियामध्ये भारताच्या नाविक (ज्याला आता इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम म्हटले जाते) ची केंद्रे उभारली.

हे एकत्रीकरण नागरिक आणि लष्करी उपयोगांसाठी अचूकता वाढवते, भू-सर्वेक्षणासाठी आणि पाईपलाईन निरीक्षणासाठी पृथ्वी निरीक्षणाला सहकार्य करते आणि लॉजिस्टिक्स तसेच पायाभूत सुविधांचे रिअल-टाइम ट्रॅकिंग सुलभ करते. ग्लोनास-नाविक प्रणाली तेल अन्वेषण आणि ऊर्जा पायाभूत सुविधांच्या निरीक्षणासाठी संसाधन मॅपिंगमध्ये महत्त्वपूर्ण ठरली आहे.

याव्यतिरिक्त, 2007 मध्ये, भारत आणि रशियाने ग्लोनास लष्करी सिग्नल सामायिक करण्यास सहमती दर्शविली होती, ज्यामुळे धोरणात्मक अनुप्रयोगांसाठी प्रगत नॅव्हिगेशन हार्डवेअरचा अधिक प्रभावी वापर करणे शक्य झाले.

चंद्र/ग्रह संशोधन

चांद्र मोहिमा: 2028 मध्ये नियोजित, चांद्रयान-4 मोहिमेत प्रणोदन आणि लँडिंग सिस्टीममध्ये, रशियन तांत्रिक कौशल्याच्या मदतीने चंद्रावरून नमुने गोळा करुन आणण्याचा समावेश असेल. तर, लुना 27 या संयुक्त मोहीमेत भारताच्या रोव्हर तंत्रज्ञानाची – रशियाच्या सिद्ध लँडर क्षमतेशी सांगड घातली जाईल. दोन्ही देशांनी आजवर आपापली स्वतंत्र क्षमता सिद्ध केली आहे; भारताने 2023 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 यशस्वीरित्या उतरवले होते, तर रशियाच्या लुना-25 ने त्याआधीच हा प्रयत्न केला होता (जरी तो अयशस्वी ठरला).

ग्रह संशोधन: रशिया ‘व्हेनेरा-डी’ ही शुक्र मोहीम (2029 साठी लक्ष्यित) विकसित करत आहे, ज्यात शुक्र ग्रहाचे वातावरण आणि पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी ऑर्बिटर आणि लँडर प्रणाली समाविष्ट असेल, यात शुक्र संशोधनातील जागतिक नेतृत्वाच्या रशियन कौशल्याचा फायदा घेतला जाईल. भारत पेलोड विकास आणि संशोधन सहकार्यात सहभागाचा शोध घेत आहे.

मिशन मंगळ: दोन्ही देशांद्वारे मंगळ मोहिमेचा देखील एक आराखडा तयार केला जात आहे, ज्यामध्ये रशिया प्रगत प्रणोदन तंत्रज्ञान पुरवणार आहे. याशिवाय, संयुक्त चंद्र तळ आणि डीप-स्पेस मोहिमांच्या संधींचाही दोन्ही देश अभ्यास करत आहेत.

प्रक्षेपण वाहन तंत्रज्ञान, क्रायोजेनिक इंजिन

रशियाने भारताच्या प्रक्षेपण वाहन विकासासाठी महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान पुरवले आहे. रशियाने ISRO ला पुरवलेले सात क्रायोजेनिक कार्यात्मक युनिट्स आणि ग्राउंड डेमॉन्स्ट्रेटर युनिट्स GSLV MK-I साठी वापरले गेले आणि ते भारताच्या GSLV MK-II आणि III च्या स्वदेशी क्रायोजेनिक टप्प्याच्या विकासासाठीचा पाया बनले.

सध्या, दोन्ही देश सेमी-क्रायोजेनिक रॉकेट इंजिन विकसित करत आहेत, ज्यात या इंजिनांचे उत्पादन आणि विविध उपक्रमांत त्यांचा वापर करण्याच्या सहकार्याची संधी आहे. रॉकेट इंजिनचा विकास, उत्पादन आणि वापर यामध्ये “परस्पर फायदेशीर सहकार्याच्या शक्यता” शोधण्यास भारत आणि रशियाने सहमती दर्शविली आहे.

अंतराळ स्थानक

भारताने 2035 पर्यंत, भारतीय अंतराळ स्थानक स्थापित करण्याची योजना जाहीर केली आहे, जेणेकरून लो-अर्थ-ऑर्बिटमध्ये कायमस्वरूपी मानवी उपस्थिती आणि संशोधन अधिक सक्षम होईल. रशियाचे राजदूत अलिपोव्ह यांनी या ध्येयाला “एक नवा टप्पा” असे म्हणत, त्याचे कौतुक केले आणि या प्रकल्पाला रशियाकडून पूर्ण पाठिंबा दिला जाईल, असे वचन दिले.

भारत आणि रशिया BRICS अंतर्गत, व्यापक अवकाश उपक्रमांवर काम करत आहेत, ज्यामध्ये रिमोट सॅटेलाइट समूह प्रकल्प आणि अवकाशातील शस्त्रास्त्र स्पर्धा टाळण्याच्या प्रयत्नांचा समावेश आहे. दोन्ही देश अंतराळ सुरक्षेवर सखोल संवाद कायम राखतात आणि बाह्य अवकाशात शस्त्रांची तैनाती न करण्याच्या रशियाच्या उपक्रमावर सहकार्य दर्शवतात.

अंतराळ विज्ञान

रशियन आणि भारतीय तज्ञ खालील माध्यमांतून अंतराळ विज्ञान संशोधनात व्यापक सहकार्य करतात:

  • रशियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेसमधील संयुक्त प्रकल्प
  • मॉस्को एव्हिएशन इन्स्टिट्यूटमध्ये सहयोगात्मक कार्य
  • अंतराळ औषधे, खगोलशास्त्र, स्पेक्ट्रोस्कोपी, साहित्य विज्ञान आणि नॅनो-तंत्रज्ञान यावर संशोधन
  • चांद्र आणि ऑर्बिट मोहिमांसाठी नवीन कोटिंग्ज आणि संरचनात्मक साहित्याची चाचणी

ऑगस्ट 2025 मध्ये, भारताने औपचारिकपणे रशियन कंपन्यांना त्यांच्या अंतराळ उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आमंत्रित केले आहे, ज्यामुळे उपग्रह दळणवळण, पृथ्वी निरीक्षण प्रणाली, AI-आधारित लॉजिस्टिक्स आणि अंतराळ पायाभूत सुविधांसाठी सायबरसुरक्षा यामध्ये खासगी क्षेत्रांच्या सहभागासाठीच्या संधी उघडल्या आहेत.

धोरणात्मक अनिवार्यता

भारत-रशिया अंतराळ भागीदारी, धोरणात्मक परस्परपूरकता दर्शवते. दोन्ही देशांनी हे जाणले आहे की, अंतराळ सहकार्यामुळे त्यांची भू-राजकीय स्थिती मजबूत होते, तांत्रिक आत्मनिर्भरता सिद्ध होते आणि आर्थिक संधी निर्माण होतात. ही भागीदारी अंतराळ सुरक्षा, उपग्रहांमार्फत पर्यावरणीय निरीक्षण आणि बाह्य अवकाशाचा शांततापूर्ण वापर यावरील ब्रिक्सच्या सहकार्याद्वारे जागतिक आव्हानांना देखील संबोधित करते.

दिशा स्पष्ट आहे: भारताचा अंतराळ क्षेत्र हे हार्डवेअर उत्पादनाकडून – सेवा आधारित उत्पन्नाकडे वाटचाल करत आहे, रशिया भारताच्या बाजारपेठेचा आणि नवोन्मेष परिसंस्थेचा लाभ घेत आहे. दोन्ही देश अंतराळ स्थानके, ग्रहांच्या मोहिमा आणि कक्षेत शाश्वत मानवी उपस्थिती, यासाठीच्या 2030 ते 2040 या कालावधीतील महत्त्वाकांक्षी लक्ष्यांकडे वाटचाल करत आहेत. ही भागीदारी दर्शवते की, धोरणात्मक सहयोगी देश एकत्र संसाधने, कौशल्ये आणि महत्त्वाकांक्षेची सांगड घालून, असे उद्दिष्ट साध्य करू शकतात, जे ते एकएकटे करू शकले नसते.

मूळ लेखिका- हुमा सिद्दीकी

+ posts
Previous articleभारतासोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी रशियाने नवा आराखडा आखला
Next articleA320 पॅनेलमधील दोषांमुळे एअरबसच्या वितरणास विलंब होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here