आपत्कालीन प्रतिसादासाठी ड्रोन्सची क्षमता वाढवण्याकरिता संयुक्त सहकार्य

0
ideaForge
आपत्कालीन प्रतिसाद नेटवर्कमध्ये ड्रोन क्षमता एकत्रित करण्यासाठी, सी-डॅक आणि आयडियाफोर्ज यांनी सामंजस्य करार केला.

‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (C-DAC)’ ने, ‘आयडिया फोर्ज (ideaForge) टेक्नॉलॉजी लिमिटेड’सोबत एक महत्वपूर्ण भागीदारी केली आहे. ‘112’ या देशभरातील आपत्कालीन हेल्पलाईनमागील भारताच्या आपत्कालीन प्रतिसाद समर्थन प्रणाली (ERSS) मध्ये, ड्रोन-आधारित बुद्धिमत्ता समाविष्ट करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. दोन्ही संस्थांनी एका नव्या सामंजस्य कराराद्वारे याला मूर्त स्वरूप दिले आहे.

या सहकार्याअंतर्गत, C-DAC ची ERSS प्रणाली, ideaForge च्या FLYGHT प्लॅटफॉर्मसह एकत्रित केली जाईल, जे Drone-as-a-Service मॉडेलद्वारे उपलब्ध करून दिलेले ऑन-डिमांड ड्रोन नेटवर्क आहे. या एकत्रित प्रणालीमुळे, आपत्कालीन पथकांना जमिनीवरील युनिट्स घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच, तेथील रिअल-टाईम माहिती मिळण्यास मदत होईल. सध्या देशाचा सरासरी प्रतिसाद वेळ ही सुमारे वीस मिनिटे आहे, त्यामुळे हवाई पातळीवरील या जलद माहितीमुळे आपत्कालीन पथकांना वाहतूक कोंडी, कठीण भूभाग आणि संसाधनांच्या मर्यादा यांचा अधिक प्रभावीपणे सामना करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

FLYGHT प्लॅटफॉर्म, सरकारी संस्थांना उपकरणे खरेदी न करता किंवा अंतर्गत ड्रोन ऑपरेशन न चालवता ड्रोन वापरण्याची मुभा देतो. भारतातील विविध सरकारी विभाग आधीपासूनच शहरी देखरेख, वाहतूक निरीक्षण, आपत्ती मूल्यांकन, मॅपिंग, सॅनिटेशन तपासणी आणि पायाभूत सुविधांच्या तपासणीसाठी FLYGHT वापरत आहेत. या प्रणालीच्या ‘वापरा-आणि-पेमेंट करा’ (pay-per-use) मॉडेलमुळे, सार्वजनिक संस्थांना जास्त प्रारंभिक गुंतवणूक न करता हवाई डेटा मिळवणे सुलभ होते.

कार्यात्मक वापराव्यतिरिक्त, सामंजस्य करारामध्ये संयुक्त संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रांचाही समावेश आहे. C-DAC आणि ideaForge स्वदेशी VEGA प्रोसेसर UAV (Unmanned Aerial Vehicle) प्रणालींमध्ये कसा समाविष्ट केला जाऊ शकतो, यावर अभ्यास करतील, तसेच फ्लाइट कंट्रोलरसाठी VEGA-आधारित सिस्टीम-ऑन-चिप डिझाईन्स कशी विकसित करता येतील याचा अभ्यास करतील. याव्यतिरिक्त, स्वायत्त स्वॉर्म ड्रोन, AI-सक्षम विश्लेषण आणि मानवरहित प्रणालींसाठी प्रगत संगणन यांसारख्या प्रकल्पांवर एकत्रितपणे काम करतील. या करारामध्ये सामायिक प्रशिक्षण आणि विकास उपक्रमांचाही समावेश आहे.

आयडियाफोर्जच्या प्रॉडक्ट मॅनेजमेंटचे AGM- सचिन पुकाळे यांच्या म्हणण्यानुसार, ‘FLYGHT ला ERSS शी जोडल्याने आपत्कालीन स्थळांवर ड्रोन स्वयंचलितपणे पाठवणे शक्य होईल. यामुळे जमिनीवरील पथकांना त्यांच्यासमोर येणाऱ्या परिस्थितीचे स्पष्ट चित्र मिळेल.’ ते पुढे म्हणाले की, “हा प्लॅटफॉर्म थर्ड-पार्टी साधनांसह सहजपणे समाकलित करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. तसेच, ड्रोन ताफ्यांच्या मालकीचा किंवा ती व्यवस्थापित करण्याचा भार न उचलता, एजन्सींना थेट डेटा-रेडी अंतर्दृष्टी (माहिती) प्रदान करण्यासाठी डिझाईन केला आहे.”

C-DAC च्या टीमने सांगितले की, हे सहकार्य संस्थेच्या सुरक्षित आणि प्रमाणक्षम डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या कार्याला समर्थन देते. या भागीदारीमुळे, ड्रोनद्वारे एकत्रित केला जाणारा डेटा कार्यक्षमतेने हाताळला जाईल, त्याचे योग्य संरक्षण केले जाईल आणि रिअल-टाईम परिस्थितीविषयी जागरूकता, स्वायत्त कार्यप्रणाली आणि AI-आधारित विश्लेषण यांसारख्या ॲप्लिकेशन्ससाठी वापरला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

हा संयुक्त उपक्रम ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत, स्वदेशी डिजिटल आणि डीप-टेक क्षमतांना बळकटी देण्याच्या भारताच्या व्यापक उद्दिष्टाला हातभार लावतो.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleमेक्सिकोचा भारताला दणका; 50% टॅरिफचा ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका
Next articleUS Clears $686 Million Military Aid to Pakistan as Modi-Trump Hold ‘Warm’ Call

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here