बोंडी हल्ला: हल्लेखोरांनी फेकलेले घरगुती बॉम्ब फुटले नाहीत

0
बोंडी

सोमवारी प्रसिद्ध झालेल्या न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, ऑस्ट्रेलियन पोलिसांनी सांगितले आहे की, बोंडी बीचवर झालेल्या सामूहिक गोळीबारापूर्वी जमावावर घरगुती बनावटीचे पाईप आणि टेनिस बॉल आकाराचे बॉम्ब फेकण्यात आले होते, मात्र ते फुटले नाहीत.

14 डिसेंबर रोजी बोंडी येथील ज्यूंच्या हनुक्का उत्सवादरम्यान करण्यात आलेल्या सामूहिक गोळीबारात पंधराजणांचा मृत्यू झाला तर डझनभर लोक जखमी झाले. या हल्ल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला असून, कठोर शस्त्र कायद्यांची आणि ज्यूविरोधी द्वेष रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलेल्या संशयित बंदूकधारी 50 वर्षीय साजिद अक्रम याच्याकडे सहा बंदुका होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा 24 वर्षीय मुलगा नवीद अक्रम याच्यावर खून आणि दहशतवादासह 59 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बॉम्बस्फोटाचा कट

न्यायालयाने जारी केलेल्या पोलिसांच्या माहितीनुसार, कथित हल्लेखोरांनी अनेक महिन्यांपासून हल्ल्याची योजना आखली होती आणि दोन दिवसांपूर्वी त्यांनी बोंडी समुद्रकिनाऱ्यावरील उद्यानाची पाहणी केली होती.

पोलिसांच्या अहवालात समाविष्ट असलेल्या फोटोंमध्ये, वडील आणि मुलगा ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या न्यू साउथ वेल्स राज्याच्या (ज्यात सिडनी शहर समाविष्ट आहे) एका निर्जन ग्रामीण भागात बंदुकांसह प्रशिक्षण घेताना दिसत होते.

पोलिसांना एका हल्लेखोराच्या मोबाईल फोनमध्ये ऑक्टोबर महिन्यात घेतलेला एक व्हिडिओ सापडला, ज्यामध्ये ते इस्लामिक स्टेटच्या झेंड्याच्या प्रतिमेसमोर बसून हल्ल्याच्या कारणांबद्दल इंग्रजीमध्ये संवाद साधत होते आणि झिओनिस्टांच्या कृत्यांचा निषेध करत होते.

पोलिसांच्या अहवालानुसार, हल्ल्याच्या दिवशी पहाटे 2 वाजण्याच्या (15.00 GMT) सुमारास, हे दोघे कॅम्पसी उपनगरातील एका अल्प-मुदतीच्या भाड्याच्या घरातून ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या लांब आणि अवजड वस्तू एका गाडीत नेत असताना सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये कैद झाले.

नंतर ते संध्याकाळी 5 वाजण्याच्या (08.00 GMT) सुमारास बोंडीकडे रवाना झाले.

पोलिसांचा असा विश्वास आहे की, ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या वस्तूंमध्ये दोन सिंगल-बॅरल शॉटगन, एक बेरेटा रायफल, तीन पाईप बॉम्ब, एक टेनिस बॉल बॉम्ब आणि एक मोठा तात्पुरता बनवलेला स्फोटक पदार्थ होता.

न्यायालयात सादर केलेल्या निवेदनानुसार, पोलिसांनी आरोप केला आहे की, त्या व्यक्तींनी गोळीबार सुरू करण्यापूर्वी बोंडी पार्कमधील गर्दीवर पाईप बॉम्ब आणि टेनिस बॉल बॉम्ब फेकले, परंतु त्या स्फोटक पदार्थांचा स्फोट झाला नाही.

पोलिसांनी सांगितले की, त्यांना नंतर कॅम्पसी येथील घरात शॉटगनच्या एका भागासाठी 3D प्रिंटेड सुटे भाग, बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि कुराणच्या प्रती सापडल्या.

अधिक कठोर शस्त्र कायदे

सामूहिक गोळीबारानंतर, न्यू साउथ वेल्स राज्याच्या संसदेचे अधिवेशन सोमवारी पुन्हा बोलावण्यात आले, जेणेकरून बंदुकीच्या मालकीवर मोठी बंधने घालणारे, दहशतवादी चिन्हे प्रदर्शित करण्यावर बंदी घालणारे आणि निदर्शनांवर मर्यादा घालणारे प्रस्तावित नवीन कायदे मंजूर करता येतील.

राज्याच्या कायद्यानुसार, एक व्यक्ती जास्तीत जास्त चार बंदुका बाळगू शकेल, किंवा शेतकऱ्यांसारख्या विशिष्ट गटांसाठी ही संख्या 10 पर्यंत असेल.

1996 च्या गोळीबारात 35 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जगातील काही सर्वात कठोर शस्त्र नियंत्रण कायदे असले तरी, अधिकाऱ्यांच्या मते बोंडी येथील गोळीबाराने  या कायद्यात असलेल्या त्रुटी अधोरेखित केल्या आहेत.

पोलिसांच्या शस्त्र नोंदणीनुसार, न्यू साउथ वेल्स राज्यात 70 हून अधिक नागरिक असे आहेत ज्यांच्याकडे 100 पेक्षा जास्त बंदुका आहेत. एका परवानाधारकाकडे 298 बंदुका आहेत.

प्रस्तावित कायद्यामुळे पोलिसांना निदर्शने किंवा मोर्च्यांदरम्यान चेहऱ्यावरील आवरण काढण्याचे अधिक अधिकार मिळतील. राज्य सरकारने “ग्लोबलाइज द इंतिफादा” या घोषणेवर बंदी घालण्याची शपथ घेतली आहे, कारण त्यांच्या मते ही घोषणा समाजात हिंसाचाराला प्रोत्साहन देते.

न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर ख्रिस मिन्स यांनी संसदेबाहेर पत्रकारांना सांगितले की, दहशतवादी घटनेनंतर सार्वजनिक सभांवर निर्बंध घालणाऱ्या या कायद्याला विरोध होईल अशी त्यांना अपेक्षा आहे, परंतु समाजाला सुरक्षित ठेवण्यासाठी तो आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“जगभरातील विविध वंश, धर्म आणि ठिकाणांहून आलेल्या आपल्या समाजाला एकत्र जोडण्याची आपली जबाबदारी आहे. आपण हे शांततापूर्ण मार्गाने करू शकतो,” असे ते म्हणाले.

पंतप्रधान अल्बानीज यांनी माफी मागितली

पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना विरोधकांकडून वाढत्या टीकेला सामोरे जावे लागत आहे, ज्यांचे म्हणणे आहे की त्यांच्या सरकारने ज्यू-विरोधी भावनांमधील वाढ रोखण्यासाठी पुरेसे काही केलेले नाही. गोळीबाराच्या घटनेनंतर एका आठवड्यानंतर, रविवारी बोंडी येथे हजारो लोकांनी उपस्थित असलेल्या एका स्मृती कार्यक्रमादरम्यान गर्दीतील काही लोकांनी त्यांचा धिक्कार केला.

सिडनी मॉर्निंग हेराल्ड वृत्तपत्रासाठी 1 हजार 10 मतदारांमध्ये केलेल्या आणि सोमवारी प्रसिद्ध झालेल्या एका सर्वेक्षणानुसार, अल्बानीज यांचे लोकप्रियता रेटिंग डिसेंबरच्या सुरुवातीच्या +6 वरून 15 अंकांनी घसरून -9 वर आले आहे, जे मे महिन्यातील त्यांच्या दणदणीत विजयानंतरचे सर्वात कमी रेटिंग आहे.

अल्बानीज यांनी सोमवारी सांगितले की, हल्ल्यानंतर ज्यू समुदायातील काही लोकांचा राग आपल्याकडे वळत असल्याचे हे आपल्याला समजले आहे. याचवेळी त्यांनी राष्ट्रीय एकतेसाठी आवाहन केले.

“पंतप्रधान म्हणून, माझ्या कार्यकाळात घडलेल्या या क्रूर घटनेची जबाबदारी मला जाणवते आणि ज्यू समुदायाने तसेच आपल्या संपूर्ण राष्ट्राने जे काही अनुभवले आहे, त्याबद्दल मला खेद आहे,” असे ते कॅनबेरा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

अल्बानीज यांच्या सरकारने म्हटले आहे की, त्यांनी वंशद्वेषाचा सातत्याने निषेध केला आहे आणि द्वेषपूर्ण भाषण तसेच डॉक्सिंगला गुन्हेगार ठरवण्यासाठी गेल्या दोन वर्षांत मंजूर केलेल्या कायद्यांवर प्रकाश टाकला आहे. सिडनी आणि मेलबर्नमध्ये वंशद्वेषी हल्ले घडवून आणल्याचा तेहरानवर आरोप केल्यानंतर, या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी इराणच्या राजदूताला देशाबाहेर काढले होते.

सोमवारी अल्बानीज यांच्या सरकारने द्वेषपूर्ण भाषण रोखण्यासाठी प्रस्तावित केलेल्या पुढील उपायांमध्ये, प्रौढांनी मुलांना प्रभावित करून कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न करणे, हा एक नवीन गुन्हा समाविष्ट आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह) 

+ posts
Previous articleबांगलादेश हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नेत्यावर अंत्यसंस्कार
Next articleतैपेईमधील हल्ल्यामागे एकच हल्लेखोर असल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here