पाकिस्तानमध्ये बॉम्बहल्ला आणि गोळीबारात पाच पोलीस ठार

0
पाकिस्तानमध्ये

मंगळवारी, पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा जिल्ह्यात, पोलिसांच्या व्हॅनवर गोळीबार आणि बॉम्बहल्ला करण्यात आला, ज्यामध्ये पाच पोलीस कर्मचारी ठार झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. हा हल्ला अशावेळी झाला आहे, जेव्हा पाकिस्तानमध्ये दहशतवादी हिंसाचार पुन्हा एकदा डोके वर काढत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी गोळीबार करण्यापूर्वी वाहनावर स्फोटक उपकरणांनी हल्ला केला, ज्यामध्ये चार पोलीस अधिकारी आणि चालकाचा मृत्यू झाला. अद्याप कोणत्याही गटाने मंगळवारी झालेल्या या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तथापि,पोलिसांचा संशय पाकिस्तानी तालिबान किंवा टीटीपी गटावर जाण्याची शक्यता आहे. हा गट अफगाणिस्तानातील तालिबान सरकारपासून वेगळा असला तरी त्यांच्याशी संलग्न आहे. ‘डेली सबाह’ने दिलेल्या वृत्तानुसार, अधिकार्‍यांनी मागील हल्ल्यांसाठी याच गटाला जबाबदार धरले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी न्याय

पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या हल्ल्याविरुद्ध निषेध नोंदवला असून, “दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात पोलिसांनी नेहमीच आघाडीची भूमिका बजावली आहे,” असे शरीफ म्हणाले.

तुर्कीमधील ‘डेली सबाह’ या वृत्तपत्राने नमूद केले की, पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आणि खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री सुहेल आफ्रिदी यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. वेगवेगळ्या निवेदनांमध्ये त्यांनी सांगितले की, हल्लेखोरांना न्यायाच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल. तसेच, त्यांनी मृत पोलीस अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या.

पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्ष

खैबर पख्तुनख्वा प्रांतातील करक जिल्ह्यात, जो जिल्हा आतापर्यंत अतिरेकी हल्ल्यांपासून तुलनेने सुरक्षित मानला जात होता, तिथे हा हल्ला नेमका अशावेळी झाला आहे, जेव्हा वाढत्या हिंसाचारानंतर पाकिस्तान आणि शेजारी देश अफगाणिस्तानमधील संबंध पूर्णपणे ढासळले आहेत.

ऑक्टोबरमध्ये, तालिबान सत्तेवर आल्यानंतर झालेल्या त्यांच्या सर्वात भीषण सीमा संघर्षांनंतर, दोन्ही देश युद्धविराम टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. इस्लामाबादने या अतिरेकी कारवायांच्या वाढीसाठी अफगाण भूमीचा वापर करून हल्ल्यांचे कट रचणाऱ्या गटांना जबाबदार धरले आहे. काबुलने हे आरोप फेटाळून लावत पाकिस्तानची सुरक्षा ही त्यांची अंतर्गत समस्या असल्याचे म्हटले आहे. गेल्या आठवड्यात, इस्तंबूलमध्ये झालेली याबाबतची चर्चा कोणत्याही ठोस कराराविना समाप्त झाली.

पाकिस्तानमधील डोंगराळ सीमावर्ती भाग हे ‘तेहरीक-ए-तालिबान’च्या इस्लामी अतिरेक्यांचे माहेरघर आहे, ज्यांनी गेल्या 20 वर्षांपासून पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले आहे.

टीम स्ट्रॅटन्यूज
(रॉयटर्सच्या इनपुट्ससह)

+ posts
Previous articleपाकिस्तान–लिबियामध्ये 4 अब्ज डॉलर्सहून अधिक किमतीचा शस्त्रास्त्र करार
Next articleबांगलादेश: खुलनामध्ये नॅशनल सिटीझन पार्टीच्या (NCP) नेत्यावर गोळीबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here