डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स कंपनी ‘टोन्बो इमेजिंग’ IPO जाहीर करण्याच्या तयारीत

0
टोन्बो इमेजिंग
टोन्बो इमेजिंग कंपनीचे उत्पादन

भारतीय संरक्षण क्षेत्रातील टेक स्टार्टअप ‘टोन्बो इमेजिंग‘, आपला प्रथम आयपीओ (IPO) जाहीर करण्याच्या तयारीत असून, बंगळुरूस्थित या कंपनीने बाजार नियामक ‘SEBI’कडे याबाबतचा प्राथमिक मसुदा (ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस-DRHP) सादर केला आहे. संरक्षण क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती करणारी ही कंपनी, ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर (OEM) असून, भारताच्या संरक्षण क्षेत्रात वेगाने होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, कंपनीचे नाव शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

टोन्बो ही तीच कंपनी आहे, जिने भारतीय लष्करासोबत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि ‘उरी सर्जिकल स्ट्राईक’ दरम्यान एकत्र काम केले आहे. टोन्बोने ‘IIFL सिक्युरिटीज’ आणि ‘जेएम फायनान्शियल’ यांची बँकर्स म्हणून नियुक्ती केली असून, पुढील तीन महिन्यांत DRHP येणे अपेक्षित आहे. आपल्या आयपीओच्या माध्यमातून 800-1000 कोटी रुपये उभारण्याचे टोन्बोचे उद्दिष्ट आहे. धोरणात्मक संरक्षण तंत्रज्ञानामध्ये टोन्बो ही जागतिक स्तरावरील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी प्रगत इमेजिंग आणि सेन्सर सिस्टिम्स तसेच इतर अनेक महत्त्वपूर्ण घटकांचे डिझाईन, निर्मिती आणि तैनाती करते.

प्रस्तावित आयपीओ (IPO) हा पूर्णपणे ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) असेल, ज्यामध्ये 2 रुपये दर्शनी मूल्याचे 18,085,246 पर्यंत इक्विटी शेअर्स असतील. या ओएफएसमध्ये, प्रवर्तक विक्री करणाऱ्या भागधारकांकडून 1,960,000 इक्विटी शेअर्स, प्रवर्तक गटातील विक्री करणाऱ्या भागधारकाकडून 339,700 इक्विटी शेअर्स आणि गुंतवणूकदार विक्रेत्या भागधारकांकडून 15,635,046 इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.

पाळत ठेवणे, टेहळणी, टार्गेटची निश्चिती आणि नियंत्रण अनुप्रयोगांसाठी आवश्यक प्रगत सेन्सिंग, प्रोसेसिंग, कम्युनिकेशन आणि मार्गदर्शन प्रणालींची रचना, विकास आणि त्यांची निर्मिती करणे, हे टोन्बो इमेजिंग प्रमुख कार्य आहे. त्यांचा पोर्टफोलिओ ‘इंटरनॅशनल ट्रॅफिक इन आर्म्स रेग्युलेशन’ (ITAR) शी सुसंगत आहे आणि कंपनी आता स्वतंत्र टॅक्टिकल सिस्टिम्सकडून एकात्मिक स्वायत्त प्लॅटफॉर्म सोल्यूशन्सकडे वळण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे.

कंपनीच्या उत्पादनांची श्रेणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममध्ये पसरलेली आहे, ज्यामध्ये दृश्यमान इमेजिंगपासून ते लाँग-वेव्ह इन्फ्रारेडपर्यंतचा समावेश आहे. यामध्ये थर्मल इमेजिंग कोअर्स, वेपन साईट्स, हातातील थर्मल दुर्बिणी, टार्गेटिंग सिस्टिम्स, फायर कंट्रोल सिस्टिम्स, मिसाईल सीकर्स आणि मिसाईल गायडन्स सिस्टिम्स यांचा समावेश आहे, जे रणांगणावरील स्वायत्तता अधिक सक्षम करतात,

30 सप्टेंबर 2025 पर्यंत, टोन्बो इमेजिंगने 266.57 कोटी रुपयांची ऑर्डर नोंदवली असून, 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2025 दरम्यान 71.68 कोटी रुपयांच्या अतिरिक्त ऑर्डर्स त्यांना मिळाल्या आहेत. 30 जून 2025 पर्यंत, कंपनीने एकूण 24 देशांमध्ये 20,000 पेक्षा जास्त सिस्टिम्स तैनात केल्या आहेत, जे त्यांच्या वाढत्या आंतरराष्ट्रीय उपस्थितीला अधोरेखित करते.

आर्थिक वर्ष 2025 मध्ये, भारताच्या थर्मल इमेजिंग निर्यातीत टोन्बो इमेजिंगचा वाटा 93% होता, ज्याद्वारे त्यांनी जागतिक सैन्य दले, कायदा अंमलबजावणी संस्था आणि संरक्षण OEMsना पुरवठा केला. आर्थिक वर्ष 2023-2025 या कालावधीत महसूल, एबिटा (EBITDA) आणि पीएटी (PAT) मार्जिनच्या बाबतीत भारतातील सर्वात वेगाने वाढणारी सूचीबद्ध संरक्षण तंत्रज्ञान कंपनी आणि सरकारी तसेच संरक्षण संस्थांना थर्मल इमेजिंग सिस्टिम्स पुरवणारी देशातील सर्वात मोठी पुरवठादार, म्हणून कंपनीची नोंद करण्यात आली आहे.

2003 मध्ये, अमेरिकन संरक्षण विभाग आणि ‘सारनॉफ कॉर्पोरेशन’चा पूर्वानुभव असलेल्या तंत्रज्ञांनी टोन्बो इमेजिंगनेची स्थापना केली. त्यानंतर, प्रवर्तकांच्या खरेदीनंतर 2012 मध्ये संरक्षण-केंद्रित उत्पादन निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये तिचे रूपांतर केले.

ही कंपनी ऑप्टिक्स, सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्समधील आपल्या बौद्धिक संपदेची पूर्ण मालकी स्वतःकडे ठेवते. उत्पादनाचे काम प्रमाणित ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस’ (EMS) भागीदारांकडे सोपवले जात असले तरी, प्रोटोटाइप विकास, सिस्टिम इंटिग्रेशन आणि चाचण्या या कंपनीअंतर्गतच केल्या जातात.

त्यांच्या प्रमुख उपक्रमांमध्ये, भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेसाठी (DRDO) उच्च-कार्यक्षमता असलेल्या ‘EO/IR गिम्बल-आधारित एअरबोर्न सिस्टिम’चा विकास; संरक्षण उत्पादकासाठी प्रगत कॉम्प्युटर व्हिजन क्षमतांसह ‘मल्टी-स्पेक्ट्रल इन्फ्रारेड सीकर आणि कमांड लाँचर युनिट’ची निर्मिती आणि भारतीय सशस्त्र दलांच्या ऑपरेशनल वातावरणास अनुरूप भूदल आणि नौदल अनुप्रयोगांसाठी किफायतशीर ‘फ्री-स्पेस ऑप्टिकल’ (FSO) कम्युनिकेशन सिस्टिमचा विकास, यांचा समावेश आहे.

अरविंद लक्ष्मीकुमार, अंकित कुमार आणि सेसिलिया डिसूझा हे या कंपनीचे प्रवर्तक आहेत. टोन्बोच्या गुंतवणूकदार पोर्टफोलिओमध्ये क्वालकॉम व्हेंचर्स, आर्टिमन, एडलवाईस व्हॅल्यू, सेलेस्टा कॅपिटल II LP, एचबीएल इंजिनिअरिंग, टेनासिटी व्हेंचर्स, इंडिया एक्झिम बँक आणि फ्लोरीनट्री यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश आहे. ‘जेएम फायनान्शियल लिमिटेड’ आणि ‘IIFL कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड’ हे या इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

टीम भारतशक्ती

+ posts
Previous articleचीनकडून विकत घेतले जात आहेत सोशल मीडिया इन्फ्युएन्झर्स
Next articleविमानातील तांत्रिक बिघाडामुळे लिबियन लष्कर प्रमुखांचा अपघाती मृत्यू: तुर्की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here