संपादकांची टिप्पणी
जम्मू आणि काश्मीरमधील एलओसीवर घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दोन संघटनांचे हे अतिरेकी असून ते पुराव्यातून उघड झाले आहे. Bharatshaktiने 2020-21दरम्यानच्या घुसखोरीच्या घटनांची माहिती घेतली. जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी कारवाया घडवून आणण्यामागे पाकिस्तानची कशी फूस आहे, याचे ठोस पुरावे यातून समोर आले आहेत. पाकिस्तानने भारताविरोधात सुरू केलेल्या छुप्या युद्धाची माहिती देण्यासंदर्भात सुरू केलेल्या लेखमालेचा हा दुसरा भाग आहे.
——————————
पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून अतिरेक्यांना भारतीय हद्दीत घुसवण्याचा प्रयत्न सतत सुरू असून त्यात वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेले 77 अतिरेकी मारले गेले तर, अन्य 12 अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. ही माहिती सरकारने संसदेमध्ये दिली आहे. 2020मध्ये 99 घुसखोरांना यमसदनी पाठवण्यात आले तर, 19 अतिरेक्यांना अटक करण्यात आली. तर, यावर्षी आतापर्यंत सुरक्षा दलांनी 39 अतिरेक्यांचा खात्मा केला. त्यात 10 विदेशी (पाकिस्तानी) अतिरेकी आणि जैश ए मोहम्मदच्या एका कमांडरचा समावेश आहे.
फेब्रुवारी 2021मध्ये शस्त्रसंधी कराराचे पालन करण्याचे भारत आणि पाकिस्तानने ठरविले आणि भारत-पाक सीमेवरील गोळीबाराच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली. त्याचा परिणाम घुसखोरीच्या घटनांवरही होणे अपेक्षित होते. पण पाकिस्तानने भारतामध्ये अतिरेकी घुसवण्याचे धोरण सुरूच ठेवले आहे, असे सुरक्षा दलाच्या सूत्रांनी सांगितले.
दहशतवादविरोधी कारवाईतील एफआयआर आणि जप्त केलेल्या सामग्रीची पाहाणी आणि विश्लेषण केल्यानंतर पाकिस्तानी सैन्य या भागातील दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे उघड झाले.
उरी भागात घुसखोरीचा मोठा प्रयत्न
उरी हल्ल्याला पाच वर्ष होत नाहीत तोच एलओसीवरून भारतात घुसखोरीचा प्रयत्न झाला. अलीकडच्या काळातील हा घुसखोरीचा सर्वात मोठा प्रयत्न असल्याचे मानले जाते. बारामुल्ला जिल्ह्याच्या उरी सेक्टरमध्ये 18 सप्टेंबर 2021 रोजी लष्कर ए तैयबाच्या सहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. तथापि, लष्कराच्या सतर्क जवानांनी त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. यावेळी झालेल्या जोरदार चकमकीनंतर त्यातील चार अतिरेकी अंधाराचा फायदा घेत पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने पळून गेले. तर, उर्वरित दोघे भारतीय हद्दीत घुसण्यात यशस्वी ठरले. दहा दिवसांच्या शोध मोहिमेदरम्यान एका अतिरेक्याचा खात्मा झाला तर, दुसऱ्याला अटक करण्यात आली. या अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याचे नाव अली बाबर पात्रा (वय 19) आहे. अर्ध्यावरच शिक्षण सोडलेल्या अलीने लष्कर ए तैयबाच्या खैबर कॅम्पमध्ये प्रशिक्षण घेतले. अली बाबर पात्राचे प्रशिक्षण व हालचाली (खाली ग्राफिक्समध्ये)
या अतिरेक्याकडून जप्त केलेल्या वस्तू आणि घुसखोरीची पद्धत लक्षात घेता पाकिस्तानच्या मदतीशिवाय हे शक्य नव्हते, हे स्पष्ट होते. सलामाबाद नाला परिसरातून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. 18 सप्टेंबर 2016 रोजी उरी गॅरीसनवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी याच नला परिसरातून अतिरेक्यांनी घुसखोरी केली होती. जप्त करण्यात आलेल्या मोबाइल फोनमध्ये अतिरेक्यांच्या घुसखोरीचा संभाव्य मार्ग सेव्ह करण्यात आल्याचे आढळले. (खालील जीपीएस नकाशा पाहा)
शरणागती पत्करलेल्या दहशतवाद्याचा कबुली जबाब आणि जप्त करण्यात आलेल्या मोबाइल फोन आणि जीपीएस यांच्या विश्लेषणातून हेच स्पष्ट होते की, जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाला पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआय खतपाणी देत असल्याचे स्पष्ट होते. पाकिस्तानकडून एलओसीवर पुरवठा करणारे तीन पोर्टर्स घुसखोरांना मदत करतात. पाकिस्तानी सैन्याच्या सक्रिय सहभागाशिवाय सीमेपलीकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचा प्रयत्न होऊ शकत नाही, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सूत्रांनी दिली.
जप्त करण्यात आलेल्या मोबाइल फोनमधील अतिरेकी आणि त्यांच्या हॅण्डलर दरम्यान झालेले चॅटिंग तसेच जीपीएस डिव्हाइस (पुढील चित्र पाहा) याद्वारे पाकिस्तानचा यातील सहभाग उघड होतो.
काश्मीरमध्ये पिस्तूल वापरण्याचा पाकचा नवा ट्रेण्ड
पाकिस्तानने सध्या काश्मीरमध्ये पिस्तूलचा वापर करण्याची नवी पद्धत अवलंबली आहे. पिस्तूल बाळगणे सुलभ ठरत असून त्याद्वारे नि:शस्त्र पोलीस आणि नागरिकांची हत्या करता येते. भारतीय लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न उधळू लावला तेव्हा हा नवा ट्रेण्ड लक्षात आला. 23 सप्टेंबर रोजी बारामुल्ला जिल्ह्यातील एलओसीवरील उरीजवळच्या रामपूर येथे पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील तीन अतिरेक्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय जवानांनी त्यांचा खात्मा केला. जवानांनी त्यांच्याकडील पाच एके-47 रायफल्स, पाच पिस्तूल आणि पाकिस्तानचे मार्किंग असलेले 69 हातबॉम्ब जप्त केले.
पाकिस्तान सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरोग्य विम्याचे सेहत इंसाफ कार्ड आणि दोन एटीएम कार्ड्स (ही दोन्ही कराचीत मुख्यालय असलेली यूबीएल या खासगी बँकेची आहेत) अतिरेक्यांकडून जप्त करण्यात आली. हे सर्व तन्वीर अहमद बट्टच्या नावे होती. याशिवाय, 10,300 रुपयांच्या विविध पाकिस्तानी चलनी नोटा आणि पाकिस्तानमधील खाद्यपदार्थही या अतिरेक्यांकडे सापडले.
अतिरेक्यांऐवजी अधिकाधिक शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा भारतीय हद्दीत पाठविण्याचे नवे धोरण पाकिस्तानी लष्कराने अवलंबले आहे. त्यामुळेच घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अतिरेक्यांकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे सापडतात. ही नवी पद्धत सुरक्षा दलांनी जाणली आहे.
दरम्यान, घुसखोरीचे सत्र सुरू झाले असून अतिरेक्यांचे सीमेलगतचे लाँचपॅड भरले आहेत. काश्मीर तसेच जम्मूमध्ये घुसखोरी करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सुमारे 150 ते 200 प्रशिक्षित अतिरेकी अद्याप सक्रिय असून त्यापैकी सुमारे 45 टक्के अतिरेकी हे पाकिस्तानी वंशाचे आहेत. एलओसीवर शस्त्रसंधीचे पालन बऱ्यापैकी होत असले तरी, जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सातत्याने सुरू असल्याने गुप्तचर यंत्रणेने सुरक्षा दलांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
(अनुवाद : मनोज शरद)