दक्षिण आशियातील बहुतांश देशांमध्ये आर्थिक, सामाजिक आणि राजकीय पातळीवर अस्थिरता पाहायला मिळत आहे. यात सर्वाधिक अडचणीत असलेला देश म्हणजे, श्रीलंका. विदेशी चलनाची गंगाजळी संपुष्टात आल्याने श्रीलंकेत अभूतपूर्व अशी स्थिती निर्माण झाली आहे. आयातीसाठी पैसाच उपलब्ध नसल्याने अनेक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे. विशेषत:, पेट्रोल, डिझेल, गॅस यासारख्या इंधन खरेदीसाठी विदेशी चलनच उपलब्ध नाही. परिणामी महागाईने शिखर गाठले आहे.
दुसरीकडे नेपाळमध्ये काही प्रमाणात आर्थिक अस्थिरताच आहे. कोरोनाचा फटका नेपाळच्या पर्यटन व्यवसायाला बसला आहे. शिवाय, आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पाकिस्तानात देखील राजकीय अस्थिरता बघायला मिळते. तेथील सैन्याने इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवून शाहबाज शरीफ यांना त्या पदावर बसविले आहे. तर, मजबूत अर्थव्यवस्था असलेला देश म्हणून ओळख असलेल्या चीनची देखील कोरोनाने आर्थिक घडी विस्कटलेलीच आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या झीरो कोविड पॉलिसीमुळे तेथील परिस्थिती अवघड बनली आहे. कोरोनाचा एखादा रुग्ण जरी आढळला तरी सर्व काही शट-डाऊन केले जाते. लोक घरात बंद आहेत. यामुळे आर्थिक व्यवहार देखील ठप्प होतात. चीनचे अर्थकारण हे पूर्णपणे निर्यातीवरच अवलंबून आहे. कोरोना काळात त्यावर परिणाम झाला. अशी स्थिती अजून सात-आठ महिने राहील, असे त्यांनाच वाटते.
अशा परिस्थितीत खंबीरपणे उभा आहे तो भारतच. कोरोनाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसला असला तरीही आपली बाजू सावरतानाच अडचणीत सापडलेल्या शेजारी देशांना भारताने मदतीचा हात दिला आहे. चीनच्या प्रभावाखाली येत काही काळापूर्वी भारताला विरोध करणाऱ्या या देशांनाही आता कळून चुकले आहे की, आपल्यासाठी भारत हाच मोठा आधार आहे. मग तो श्रीलंका असो, नेपाळ असो वा मालदीव असो. चीनने आर्थिक मदत करत असल्याचे दाखवून या देशांना भारताविरोधात उभे केले. पण त्यांची ही आर्थिक मदत सावकारी पद्धतीची होती. अशी मदत देताना महत्त्वाची बंदरे, भूभाग आपल्या ताब्यात ठेवण्याचे चीनचे धोरण होते. श्रीलंका, नेपाळ यांच्या हे लक्षात आले. भारत मदत करताना अशा कोणत्याही अटी लादत नाही, हे देखील त्यांच्या लक्षात आले.
मालदीवमध्येही भारताला विरोध असल्याचे चित्र दिसत असले तरी, त्यामागे चीनच आहे. त्यांनी काही राजकीय नेत्यांना हाताशी धरून ही मोहीम सुरू केली आहे. पण बहुतांश जनता आणि अन्य राजकीय नेत्यांचा भारताला पाठिंबा आहे. चीन जशी खेळी श्रीलंका आणि नेपाळमध्ये खेळत होता, तशीच खेळी मालदीवमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. पण तेथील सत्ताधाऱ्यांनी वेळीच जाणले.
एकूणच, दक्षिण आशियातील देशांना भारत हाच एक जवळचा मित्र आहे, जो अडचणीतही खंबीरपणे पाठीशी उभा राहतो आणि या छोट्या देशांना सर्वतोपरी मदत करतो.
सविस्तर मुलाखत पाहा –
Bharat Shakti Marathi या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा.
https://youtube.com/channel/UCPZPza3BQr6nt1Tp8EntiGg