भारतीय बनावटीचे सागरी गस्ती विमान सोमवारी (15 ऑगस्ट 2022) श्रीलंकेतील कटुनायके हवाई दलाच्या तळावर पोहोचेल. श्रीलंकेने यासंदर्भात भारताशी प्रदीर्घ वाटाघाटी केल्या असून त्यानुसार भारताकडून दोन विमाने श्रीलंकेच्या हवाई दलाकडे सुपूर्द केली जाणार आहे, अशी माहिती ‘दी संडे मॉर्निंग’ने दिली आहे.
भारताच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने (HAL) तयार केलेले डॉर्नियर 228 मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट (MPA) श्रीलंकन हवाई दलाच्या कर्मचाऱ्यामार्फत श्रीलंकेला नेले जाईल, असे समजते. श्रीलंकन हवाई दलाने (SLAF) एप्रिल 2022मध्ये प्रशिक्षणासाठी 15 कर्मचारी भारतात पाठवले होते. या सर्वांनी विमान उड्डाण आणि देखभालीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. भारतीय अभियंत्यांच्या देखरेखीखाली एसएलएएफचे प्रशिक्षित ग्राउंड क्रू या विमानाची देखभाल केली जाणार आहे. हे विमान जेव्हा श्रीलंकेत दाखल होईल, त्यावेळी राष्ट्रपती तसेच भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांसह श्रीलंकेचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार असल्याचे समजते.
श्रीलंका 1990च्या दशकाच्या मध्यापासूनच मेरीटाईम पेट्रोल एअरक्राफ्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. श्रीलंका भविष्यात अमेरिकेकडून बीचक्राफ्ट किंग एअर 360ईआर हे सागरी गस्ती विमान देखील घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी, श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयाने ऑस्ट्रेलिया आणि जपानमधून अतिरिक्त लॉकहीड मार्टिन P-3C ओरियन मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्ट घेण्याचा विचार केला होता. पण ही योजना वास्तवात उतरू शकली नाही.
उभय देशांच्या सरकारांमध्ये 2018मध्ये सुरू झालेल्या चर्चेअंती डॉर्नियर 228 श्रीलंकेच्या सशस्त्र दलाच्या सेवेत दाखल होणार आहे. सागरी देखरेख आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने श्रीलंकेने भारताकडून दोन विमाने घेण्याची विनंती केली होती. आपल्या एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोन (EEZ) आणि सभोवतालच्या सागरी सीमांच्या सुरक्षिततेला निर्माण होऊ शकतील असे संभाव्य धोके तसेच सागरी गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या दृष्टीने जागरुकता आणि त्वरित कारवाई करण्याची क्षमता श्रीलंकेला वाढवायची आहे. त्यासाठीच गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेची तयारी सुरू आहे.
भारताकडून दोन डॉर्नियर 228 MPA विकत घेण्यासाठी श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने या वर्षीच्या सुरूवातीला मान्यता दिली. सोमवारी येणारे पहिले MPA भारतीय नौदल फ्लीट एअर आर्ममध्ये सेवेत होते आणि ते पहिल्या दोन वर्षांसाठी नि:शुल्क असेल. एचएएलमध्ये नवीन विमान तयार करण्यासाठी लागणारा उत्पादन वेळ लक्षात घेऊन असा निर्णय घेण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही सरकारमध्ये झालेल्या करारानुसार, श्रीलंका भारताकडून एक नवीन MPA खरेदी करेल, तर त्याच बनावटीचे आणखी एक नवीन विमान भारताने श्रीलंकेला भेट द्यायचे आहे.
श्रीलंका हवाई दलाचे प्रवक्ते, जीपी. कॅप्टन दुशान विजेसिंघे यांनी पुढील आठवड्यात विमानाचे आगमन होत असलेल्या बातमीला दुजोरा दिला. “या विमानाचा प्रभावीपणे उपयोग करून एक्सक्ल्युझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये (EEZ) सागरी आणि तटीय टेहळणी करणे, शोध आणि बचावकार्य, अपघातात सापडलेल्यांना मदत पुरविणे (CASEVAC) आणि श्रीलंकन सर्च अँड रेस्क्यु रिजनमध्ये सागरी प्रदूषण देखरेख आणि नियंत्रणावर श्रीलंकन हवाई दलाचा भर असेल,” असे त्यांनी सांगितले.
भारतीय बनावटीचे MPA हे चायना बे, त्रिंकोमाली येथे असलेल्या श्रीलंका हवाईदलाच्या No.03 मेरीटाइम स्क्वॉड्रनसह सेवेत दाखल होईल अशी अपेक्षा आहे.
(दी मॉर्निंगकडून साभार)