संपादकांची टिप्पणी
बांगलादेश हा भारताचा एक जवळचा शेजारी आहे. स्वतंत्र बांगलादेशच्या निर्मितीत भारताने निभावलेली भूमिका ही या दोन देशांच्या नातेसंबंधांमधील नाळ आहे, असं आपण म्हणू शकतो. बांगलादेशात वाढणारी धार्मिक कट्टरता आणि बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत आणि विशेषतः सामरिक क्षेत्रात चीनचा वाढलेला हस्तक्षेप या दोन गोष्टी भारतातील नॉर्थ ब्लॉकसाठी चिंतेचा विषय बनल्या आहेत.
______________
मागच्याच आठवड्याच्या सुरूवातीला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. राष्ट्रपती भवनात झालेल्या औपचारिक स्वागतानंतर माध्यमांशी बोलताना शेख हसीना म्हणाल्या, “भारत हा आमचा मित्र आहे. मी जेव्हा भारतात येते तो माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो. त्यावेळी भारताने आम्हाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून दिलेले योगदान मला आठवते. आमचे संबंध मित्रत्वाचे आहेत. आम्ही कायमच एकमेकांना मदत करत आलो आहोत.” शेख हसीना यांच्या वैयक्तिक आयुष्यात भारताचे एक विशेष स्थान आहे. त्यांचे वडील आणि बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येनंतर भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना दिल्लीत आश्रय दिला होता. पंडारा रोडवर त्यांचे कुटुंब वेगळी ओळख घेऊन राहत होते.
त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश भारत-बांगलादेश संबंध अधिक दृढ करणे हा होता. बांगलादेशातील पुढील निवडणुकांपूर्वीची ही त्यांची शेवटची भेट असावी. 2023मध्ये निवडणुका होणार असून, शेख हसीना पुन्हा निवडून येणे ही भारताच्या दृष्टीने चांगली गोष्ट असेल.
त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाल्यानंतर विविध क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्यावर भर देणार्या सात करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारताच्या सवलतीच्या आर्थिक योजनेअंतर्गत बांगलादेशातील रामपूर येथील मैत्री सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाचे उभय नेत्यांनी संयुक्तपणे उद्घाटन केले. सध्या बांगलादेशी उत्पादनांसाठी भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारांबाबत दोन्ही देशांमध्ये बोलणी झाली असून त्याने बांगलादेशला व्यापार वाढवण्याच्या दृष्टीने फायदा होणार आहे. आसामच्या सिल्चर जिल्ह्यातून बांगलादेशमध्ये जाणाऱ्या कुश्यारी नदीच्या पाणीवाटपाबाबत सुद्धा करार करण्यात आला. संरक्षणविषयक साहित्याच्या खरेदीसाठी भारताने बांगलादेशला 50 कोटी डॉलर्स दिले आहेत. या खरेदी योजनेअंतर्गत सुरूवातीला बांगलादेश ब्रिज लेईंग रणगाडे, बेली ब्रिज तसेच माइन प्रोटेक्टेड वाहने खरेदी करणार आहे. भविष्यात आपल्याला कोणकोणते संरक्षण साहित्य लागेल याची एक यादीही बांगलादेशने भारताकडे दिली आहे. ज्यात हेवी रिकव्हरी वाहने, आर्म्ड् इंजिनीअर रिकान्संस वाहने, फ्लोटिंग डॉक्स आणि दळवळणासाठी लागणारी जहाजे यांचा समावेश आहे. बांगलादेशचे चीनवर संरक्षण सामुग्रीसाठी अवलंबून राहणे कमी व्हावे, हीच भारताची इच्छा आहे.
तिस्ता नदीच्या पाणीवाटपाबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा अद्यापही सुरू न होण्याचे मुख्य कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आहेत. पुढील वर्षी बांगलादेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी हा प्रश्न सुटला तर शेख हसीना यांच्या निवडणूक प्रचाराला खूप बळ मिळू शकते. बांगलादेशी पंतप्रधान प्रत्येक भेटीत तिस्ता पाणीवाटपाचा विषय उपस्थित करत असतात.
खुलना-दर्शन मार्गिका आणि परबतपूर-कौनिया ट्रॅक सुरू करण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी रूपशा रेल्वे पुलाचे उद्घाटनही केले. हे सर्व खुलना-मेंगळा बंदर ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाचे महत्त्वाचे भाग आहेत. त्यामार्गे भारताचा ईशान्य भाग बांगलादेशला जोडला जाईल आणि त्यामुळे सिलीगुडी कॉरिडॉरला एक पर्याय उपलब्ध होऊ शकेल. ते भारताच्या ईशान्येकडील राज्यांमधून होणाऱ्या निर्यातीसाठी मोंगा आणि चितगाव बंदर देखील उपलब्ध करून देण्यात येईल.
काही काळापूर्वी, भारताने नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स (NRC) आणि नागरिक सुधारणा कायदा (CAA) जाहीर केल्यावर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. बांगलादेशने आपल्या मंत्र्यांचा दौरा रद्द केला होता आणि शेख हसीना यांनीही या घोषणा अनावश्यक असल्याचे म्हटले होते. मग या सगळ्या शंका दूर करण्यासाठी तत्कालीन परराष्ट्र सचिव हर्ष श्रृंगला (जे बांगलादेशमध्ये भारताचे राजदूत होते) यांनी दोनदा बांगलादेशला भेट दिली. असे असले तरी, एकूणच भारत-बांगलादेश संबंध हे नेहमीच सौहार्दपूर्णच राहिले आहेत.
भारत आणि चीन हे दोन्ही देश बांगलादेशातील एकमेकांच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंतित आहेत. या प्रकरणी चीनची चिंता इतकी गंभीर बनली आहे की, ढाका येथील त्यांचे राजदूत ली जिमिंग यांनी बांगलादेशला क्वाडमध्ये सामील होण्याविरुद्ध इशारा दिला होता. बांगलादेशला 5 लाख कोविड लसींची भेट दिल्यानंतर डिप्लोमॅटिक करस्पाँडंट्स असोसिएशनच्या सदस्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, या क्लबमध्ये (क्वाड प्लस) सामील झाल्यामुळे चीन-बांगलादेश संबंधांवर परिणाम होऊ शकतो. यावर प्रतिक्रिया देताना बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल मोमेन यांनी या वक्तव्यांना “आक्षेपार्ह” आणि “अत्यंत दुर्दैवी” म्हटले होते.
बांगलादेश क्वाड प्लसमध्ये सामील झाल्यास दक्षिण आशियावर आपल्या ताबा प्रस्थापित करण्याचे चीनचे स्वप्न भंग पावू शकते. बेल्ट रोड इनिशिएटिव्हमध्ये चीन हा बांगलादेशला आपला प्रमुख भागीदार मानतो. बांगलादेशातील या प्रकल्पात अनेक चिनी कंपन्या सहभागी आहेत. बांगलादेश देखील सध्या चिनी कंपन्यांच्या भ्रष्टाचार आणि कर फसवणुकीच्या प्रकरणांची चौकशी करत आहे. भारताच्या दृष्टीने विचार करता, बांगलादेशमध्ये चीनचा वाढता प्रभाव म्हणजे पाकिस्तानी प्रभाव वाढणे, हाही त्याचा अर्थ आहे.
आतापर्यंत बांगलादेशने भारत, अमेरिका, जपान आणि चीन यांच्याशी संतुलित संबंध राखले आहेत. या सर्व देशांकडून आपल्या विकासासाठी अधिकाधिक सहकार्य घेत तो पुढे जात आहे. आपल्या भेटीपूर्वी बांगलादेश-चीन संबंधांवर बोलताना शेख हसीना म्हणाल्या, “आमचे परराष्ट्र धोरण अतिशय स्पष्ट आहे – सर्वांशी मैत्री, कोणाशीही शत्रूत्व नाही. जर काही समस्या असेल तर ती चीन आणि भारत यांच्यात आहे. मला तिथे नाक खुपसायचे नाही.” जेव्हा पंतप्रधान मोदी यांनी, दोन्ही देशांतील परस्परांवरील विश्वास नष्ट करण्याचे आणि नुकसान करण्याच्या काही घटकांच्या प्रयत्नांना आळा घालण्याचे आवाहन केले, ते बांगलादेशावरील चिनी प्रभावाच्या संदर्भातच होते.
शेख हसीना यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी दहशतवाद आणि कट्टरतावादाचा सामना करण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्याची सूचना केली. बांगलादेशी समाजातील वाढत्या कट्टरतावादामुळे तेथील हिंदू अल्पसंख्याकांवर परिणाम होत असताना भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. शेख हसीना यांनी बांगलादेशी अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याचे वचन दिले. पाकसमर्थक घटक शेख हसीना यांच्या पक्षासह उदारमतवादी बांगलादेशींवर इस्लामविरोधी असल्याचा आरोप करतात, जे भारतासाठी चिंतेचा विषय आहे.
या घटकांनी अलीकडेच नुपूर शर्मा प्रकरणावर आणि गेल्या वर्षी मार्चमध्ये पंतप्रधान मोदींच्या भेटीदरम्यान भारतविरोधी निदर्शने केली होती. बांगलादेशला इस्लामिक देश बनवणे हे या घटकांचे खरे उद्दिष्ट आहे. दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य केल्याशिवाय त्याचे समूळ उच्चाटन होऊ शकत नाही. परिस्थिती अनियंत्रित होऊ न देणे, हा उपाय बांगलादेशच करू शकतो. बांगलादेशनेही आपल्या भूमीवर कार्यरत असलेल्या भारतविरोधी गटांवर कारवाई करून भारताच्या काही चिंता दूर केल्या आहेत.
भारत-बांगलादेश संबंधांवर परिणाम करणारा आणखी एक घटक म्हणजे इथून भारतात येणारा लोकांचा ओघ. बीएसएफ तस्करांबरोबरच सीमा ओलांडणाऱ्यांवरही गोळीबार करते. परिणामी होणारे मृत्यू बांगलादेशला त्रासदायक ठरतात. अशा घटना कमी झाल्या असल्या तरी त्या पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. कारण सीमेवरील अनेक भागांतून लोकांची ये-जा सुरूच आहे.
रोहिंग्या निर्वासितही दोन्ही देशांमधील मोठी समस्या आहेत. बांगलादेशात सध्या 11 लाख निर्वासित आहेत. भारत त्यांच्या देखभालीसाठी निधी पुरवतो, पण त्याहून अधिक काही करण्यास तयार नाही. त्यामुळे म्यानमारवरही त्याचा थोडाफार प्रभाव पडतो. परिणामी बांगलादेशला चीनची मदत घ्यावी लागली आहे. एवढेच नाही तर, रोहिंग्या निर्वासितांना आलेल्या मार्गाने बांगलादेशात परत पाठवण्याचाही भारत प्रयत्न करत आहे. येथे राहणाऱ्या काही रोहिंग्यांना भारत स्वीकारेल, अशी आशा शेख हसिना यांनी व्यक्त केली, मात्र भारत यासाठी तयार नाही.
शेख हसीना सत्तेत असताना भारत-बांगलादेश संबंध बऱ्यापैकी सुधारले आहेत. तरीही, दोन गोष्टी भारताच्या चिंतेचे कारण बनल्या आहेत – एक म्हणजे बांगलादेशवरील चीनचे वाढते कर्ज आणि दुसरे म्हणजे समाजातील वाढता कट्टरतावाद. सध्या शेख हसीना यांनी इस्लामवाद्यांपासून अंतर ठेवले आहे तसेच भारत-बांगलादेश आणि भारत-चीन संबंधही त्या उत्तम प्रकारे हाताळत आहेत. त्यामुळे बांगलादेशात त्यांचे पंतप्रधानपदी राहणे भारताच्या दृष्टीने हितकारक आहे.
(भाषांतर – आराधना जोशी)