न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स येथील अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीनमध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. यानंतरच्या काळात त्यांना कोणत्याही प्रकारचे शिक्षण शुल्क भरावे लागणार नाही. वॉल स्ट्रीटचे माजी वित्तपुरवठादार डेव्हिड गॉट्समॅन यांच्या 93 वर्षीय पत्नीने आपल्या वैद्यकीय महाविद्यालयाला 1 अब्ज डॉलर्सची देणगी दिली आहे.
रुथ गॉट्समॅन यांनी दिलेली ही देणगी अमेरिकेतील शैक्षणिक संस्थेला देण्यात आलेली आतापर्यंतची सर्वात मोठी देणगी आहे.
रुथ गॉट्समन या निवृत्त क्निनीकल प्रोफेसर असून, कारकीर्दीची 55 वर्षे त्यांनी ब्रॉन्क्स वैद्यकीय महाविद्यालयात व्यतीत केली. या महाविद्यालयाकडून साक्षरता कार्यक्रम आणि तपासणी चाचण्या चालवल्या. रुथ यांचे पती डेव्हिड एस. गॉट्समॅन यांचे 2022 मध्ये निधन झाले तेव्हा त्यांनी बर्कशायर हॅथवेच्या समभागांची मोठी गुंतवणूक आपल्या पत्नीसाठी ठेवली होती.
“हा निधी आपल्यासाठी ठेवल्याबद्दल पती सॅंडी यांचे आभार मानून डॉ.गॉट्समॅन म्हणाल्या, “या देणगीमुळे नवीन डॉक्टरांना त्यांचे शैक्षणिक कर्ज फेडण्याच्या आव्हानाशिवाय त्यांची कारकीर्द सुरू करता येईल.” हे वैद्यकीय महाविद्यालय न्यूयॉर्क राज्यातील ब्रॉन्क्स येथे असून अमेरिकेच्या अति गरीब भागांपैकी हा एक भाग आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या इथे सर्वाधिक आहेत.
युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन पॉप्युलेशन हेल्थ इन्स्टिट्यूटने केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील 62 परगण्यांपैकी हे शहर आरोग्य सेवांसाठी शेवटच्या क्रमांकावर होते.
विद्यार्थ्यांसाठी या देणगीचे महत्त्व
ही देणगी ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक अत्यंत आवश्यक मदत असून यामुळे अनेकांना शिक्षणासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. तिथे शिकणाऱ्या 30 वर्षीय जेड अँड्रॅडला बालरोग वैद्यकशास्त्रात काम करायचे आहे आणि यासाठी ती तसेच तिच्या वर्गमित्रांसाठी ही देणगी स्वप्नपूर्ती करणारी आहे.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत जेड म्हणाली, “पण मला वाटते की सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावी पिढ्यांवर याचा होणारा मोठा परिणाम. ही देणगी खरोखरच आशेचा किरण आहे.”
महाविद्यालयातील निम्म्याहून अधिक विद्यार्थी न्यूयॉर्कचे असून सुमारे 60 टक्के विद्यार्थिनी आहेत. सध्या 48 टक्के वैद्यकीय विद्यार्थी श्वेतवर्णीय, 29 टक्के आशियाई, 11 टक्के हिस्पॅनिक आणि 5 टक्के कृष्णवर्णीय आहेत.
या देणगीमुळे सर्वच विद्यार्थ्यांची फी माफ झाली असून यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना मदत होईल अशी अपेक्षा आहे.
वैद्यकीय शिक्षणाचा खर्च आवाक्याबाहेर
असोसिएशन ऑफ अमेरिकन मेडिकल कॉलेजेसच्या (एएएमसी) म्हणण्यानुसार, अमेरिकेतील वैद्यकीय शिक्षणाचा खर्च अत्यंत महागडा आहे कारण दर वर्षी 255,000 ते 337,000 दरम्यान फी आकारली जाते. शिक्षणाचा खर्च करण्यासाठी बहुतांश विद्यार्थ्यांना प्रचंड मोठे कर्ज काढावे लागते. एएएमसीच्या दाव्यानुसार 84 टक्के विद्यार्थ्यांनी एक लाख डॉलर किंवा त्याहून अधिक कर्ज घेऊन नंतर शिक्षण सोडले.
देणगीदार म्हणून आपले नाव जाहीर करण्यासाठी गॉट्समन इच्छुक नव्हत्या. त्यांच्या मते, दान कोणी केले हे जाणून घेणे कोणासाठीही महत्त्वाचे नसते. मात्र वैद्यकीय महाविद्यालयाचे पर्यवेक्षक फिलिप ओझुआ यांनी तिचे नाव जाहीर करण्याचा आग्रह धरला.
ओझुआ यांच्या मते, आईन्स्टाईन वैद्यकीय महाविद्यालयासाठी गॉट्समन यांनी काय केले आहे हे जर लोकांना समजले तर त्यांना ते प्रेरणादायी वाटेल आणि ते आपले जीवन इतरांच्या कल्याणासाठी समर्पित करतील. 1955 मध्ये सुरू झालेल्या या वैद्यकीय महाविद्यालयाला सापेक्षवादाचा सिद्धांत मांडणाऱ्या अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आपले नाव देण्यास सहमती दर्शवली होती.
रामानंद सेनगुप्ता