दि. ०६ मार्च : हिजाबविरोधी निदर्शनामुळे बावचळलेल्या कट्टरपंथीय इराणी सरकारने गेल्या वर्षभरात ८३४ नागरिकांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावल्याचे मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून समोर आले आहे. गेल्या दोन दशकांत दुसऱ्यांदा इराणमधील मृत्युदंडाच्या संख्येने ८०० चा आकडा पार केला आहे. इराण सरकारने २०१५मध्ये ९७२ जणांना मृत्यूदंडाची दिला होता.
माशा आमिनी या बावीस वर्षीय तरुणीला हिजाब न वापरल्याबद्दल इराणच्या पोलिसांनी अटक केली होती. पोलिसांच्या मारहाणीत माशाचा कोठडीतच मृत्यू झाला होता. त्यानंतर इराणमध्ये कट्टरपंथीय सरकारच्या विरोधात निदर्शने उसळली होती. ही निदर्शने काबूत आणण्यासाठी इराणच्या सरकारने निदर्शनादरम्यान व नंतर सुमारे ८३४ लोकांना मृत्युदंड दिल्याचे पॅरिसमधील ‘टुगेदर अगेन्स्ट डेथ पेनल्टी’ व नॉर्वेमधील ‘इराण ह्यूमन राइट्स’ या दोन संस्थांनी केलेल्या संयुक्त पाहणी अहवालात समोर आले आहे. या ८३४ घटनांपैकी केवळ १५ टक्के घटनाच इराणच्या माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमधून समोर आल्या आहेत. उर्वरित घटना ‘इराण ह्युमन राइट्स’ने त्यांच्या स्वतंत्र स्त्रोतांच्या माध्यमातून खातरजमा करून घेतल्या आहेत.
‘नागरिकांच्या मनात भय उत्पन्न करणे हे कोणत्याही कट्टरपंथीय हुकूमशाही सरकारचे पहिले काम असते. मृत्युदंड अशी भीती पसरवण्यात सर्वात महत्त्वाचे ठरतात. त्यामुळेच हुकूमशाही सरकारकडून अगदी किरकोळ गुन्ह्यासाठीही मृत्युदंड ठोठावण्यात आल्याचे दिसते,’ असे ‘इराण ह्युमन राइट्स’चे संचालक महमूद अमेरी मोघादम यांनी सांगितले. यावर्षी इराणमध्ये सर्वाधिक २२ महिलांना मृत्युदंड किल्ल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. यापैकी १५ महिलांना हत्येच्या गुन्ह्याबद्दल फाशीची शिक्षा दिली गेली आहे. यावरून सरकारविरोधी आंदोलनामध्ये महिलांची मोठी भूमिका असल्याचे स्पष्ट होते, असेही मोघादम यांनी सांगितले. मोहसेन सेकारी व माजेद्रेजा रेनावर्द या दोन महिला आंदोलकांना डिसेंबर २०२२ मध्ये फाशी देण्यात आली. त्यानंतर आंदोलनकर्त्या महिलांना मृत्यूदंड देण्यास सुरुवात झाली. २०२३ मध्ये आणखी आठ महिलांना सुरक्षेला धोका आणि हत्या या दोन गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून फाशी देण्यात आले. या सर्व शिक्षांची अंमलबजावणी अतिशय गोपनीय पद्धतीने करण्यात आली आंतरराष्ट्रीय समुदायाला त्याची खबरबातही लागली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच, सुमारे चारशेच्यावर नागरिकांना अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली फाशी देण्यात आली आहे. यंत्रणेबद्दल भय निर्माण करण्यास हे पुरेसे आहे, असे ते म्हणाले. या वर्षी, २०२४ मध्ये फेब्रुवारी अखेरपर्यंत ८८ जणांना मृत्युदंड दिला गेला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कट्टरपंथीय इस्लामी राजवट असलेल्या इराणमध्ये सरकार विरोधातील नागरिकांचा रोष स्पष्ट झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीवर लोकांनी अघोषित बहिष्कार टाकण्याचे चित्र होते. या निवडणुकीत केवळ २७ टक्के मतदारांनीच मतदान केले. त्यामुळे गेल्या अनेक दशकातील सर्वात कमी मतदान या निवडणुकीत नोंदवण्यात आल्याचे स्पष्ट झाले. कट्टरपंथीय सरकारला हा एक इशाराच मानला जात आहे.
विनय चाटी